स्वप्न होते कोवळे अन्‌ वय जरी निष्पाप होते

स्वप्न होते कोवळे अन्‌ वय जरी निष्पाप होते
भंगण्याचे ह्यास, त्याला वाढण्याचे शाप होते

ठरवुनी काही कधीही चूक केली जात नाही
तोल सुटतो, भान जाते, सर्व आपोआप होते

का तुम्हाला वाटते, माझ्यात विष त्याने भिनवले?
माझिया गात्रातही लाखो अनावर साप होते

रक्तरंजित पावले होणार हे ठरलेच होते
उंबर्‍यावर स्वागताला कंटकांचे माप होते

कोण कुठली मृण्मयी, मीरेस येथे विष मिळाले
कृष्णभक्तीचे जिच्या हातून घडले 'पाप' होते