कोंबडीचे प्रेमगीत

प्रेरणा : पृथ्वीचे प्रेमगीत  (तात्यासाहेब, बालकाला क्षमा करा. )

युगामागुनी चालली रे युगे ही

करावी किती, कोंबड्या, वंचना

कितीदा करू पार रस्ता अशी मी

कितीदा करू प्रीतिची याचना

 
खुराड्यातले ना उमाळे उसासे

न ती आज अंगास आता पिसे

विझोनी अता यौवनाच्या मशाली

खुडुक जाहले, एक अंडे नसे

 
परी खांब रस्त्यावरी तो विजेचा

अविश्रांत राही उभा सोबती

पकडण्या तुला मार्ग ओलांडते मी

पळे तू पुढे आणि मी मागुती

 
किती कोंबडे ते नटोनी थटोनी

शिरी टाकिती माझिया अक्षता

तुर्‍यावाचुनी पण तुझ्या, कुक्कुटा रे

मला वाटते विश्व सारे वृथा

 
तुवा सांडलेले कुठे पोल्ट्रि फार्मात

वेचून स्वादिष्ट धान्यकणऽ

मला मोहवाया बघे कावळा हा

करू जात मजला व्यभीचारिणऽ

 
निराशेत फ्रस्ट्रेट होऊन बैसे

ऋषींच्या कुळी तो विफल पोपटऽ

पिसाटापरी चोच चोचीत घालुन

करी आर्जवे पारवा लोचटऽ

 
पिसारा पिसांचा उभारून दारी

पहाटे उभा मोर करण्या छळ

करी प्रीतिची मागणी बेशरम

पंख पंखावरी ठेवुनी कोकिळ

 
मिठी घालुनी कोंबड्याला परी मी 

घेऊ गळ्याशी कसे पारवे

शहारून येते कधी अंग; तूझ्या

स्मृतीने उले अन्‌ सले तंदुर

 
गमे की तुझ्या सोबती आरवावे

मिळोनी गळा घालुनीया गळा

तुझ्या लांब चोचीतली बिडि प्यावी

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

 
अमर्याद रस्ता मध्ये कोंबड्या अन्‌

असे खास मी कोंबडी सज्जनऽ

परी त्यास ओलांडल्यावाचुनी रे

घडावे कसे आपले मीलनऽ