मांबा, सिंबा, मांबा --- १

    रोआल्ड डाल याचे आई वडील नॉर्वेजियन.त्याचा जन्म १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये झाला व शिक्षणही तेथेच झाले. तो वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी  शेल ऑइल कंपनीत कामाला लागला आणि कंपनीने  त्त्याला एकदम आफ्रिकेतच  पाठवले."गोइंग सोलो" हे त्याचे त्या काळातील अनुभवावर आधारित पुस्तक अगदी भन्नाटच म्हणावे असे आहे. रोआल्ड हा त्याच्या मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल जास्त प्रसिद्ध आहे."गोइंग सोलो" हे मधील हे अनुभव तसेच भन्नाट म्हणता येण्यासारखे आहेत. ते अनुभव त्याच्याच शब्दात देत आहे.कंसातील टिप्पणी माझी.
 
    " आफ्रिकेमध्ये दार एस सलाम बंदरातील एवढ्या मोठ्या शेल कंपनीचा कारभार पहाणारे आम्ही फक्त तिघे इंग्रज होतो आणि त्यात सगळ्यात कनिष्ठ व वयाने लहान मीच होतो.आमच्या हाताखाली एक स्वयंपाकी त्याला आम्ही पिग्गी म्हणत असू  तर सलिमु हा माळी कामासाठी देण्यात आला होता.त्याशिवाय प्रत्येकास एक स्वीय सहाय्यक दिलेला होता.माझ्या सहाय्यकाचे नाव एमदिशो असे होते.तो चांगला उंचापुरा ,तगडा आणि मृदू बोलणारा होता. आफ्रिकेतील ही जमात अतिशय शूर समजली जात असे कारण अतिशय ताकदवान "मसाई" जमातीच्या टोळ्यांनाही त्यांनी टोळीयुद्धात हरवले होते. एमदिशो माझ्यावर जिवापाड प्रेम करत असे अर्थात माझेही त्याच्यावर तेवढेच प्रेम होते.   या मंडळींना इंग्लिशचा गंधही नसे अर्थातच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वाहिली मलाच शिकणे भाग होते.आणि तशी ती भाषा  सोपी  असल्याने स्वाहिली-इंग्लिश कोशाच्या सहाय्याने व थोड्याफार मेहनतीने मी त्यावर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले.
     शेल कंपनीच्या ग्राहकांना भेटण्यासाठी  मला बरेच वेळा दौऱ्यावर जावे लागे आणि एम्दिशो त्यावेळी माझ्याबरोबरच असे.त्या खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यावरून स्टेशन वॅगनमधून प्रवास करणे  म्हणजे  एक दिव्यच होते. पण तरीही हे दौरे मला आवडत कारण प्रवासात अनेक  प्राणी पहायला मिळत.त्यात अगदी निर्भयपणे आमच्या पाठोपाठ झाडांचे शेंडे कुरतडत येणारे जिराफ असत तर कित्येक वेळा मोठमोठे हत्ती ,पाणघोडे,झेब्रे ,काळवीट आणि क्वचित रुबाबदार सिंहांचे कळपही दिसत. फक्त एका प्राण्याला मात्र मी वचकून असे आणि तो म्हणजे येथील भयानक साप.त्या गचाळ रस्त्यावर कधी कधी ते अचानक आमच्या गाडीसमोरून सरपटत जाताना दिसत.त्यावेळी  चुकूनही गाडी वेगाने नेऊन त्याच्यावरून जाऊ न देणे हा एक अगदी महत्त्वाचा नियम पाळणे शहाणपणाचे असे. विशेषत: जर गाडीला वर छप्पर नसेल तर हे फारच महत्त्वाचे कारण गाडीच्या पुढील चाकाच्या धक्क्याने साप उडून अगदी पुढ्यात येऊन पडण्याचा धोका असे.
   टांगानिकामधील काळा माम्बा हा साप तर फारच भयानक असतो.(सापाविषयी साधारण समजूत अशी आहे की त्याला दिसत नाही आणि आपण होऊन कोणावर हल्ला करत नाही पण) हा असा एकच साप आहे की तो माणसाला मुळीच घाबरत नाही आणि स्वत: होऊन हल्ला करण्याची शक्यता असते आणि त्याच्या चाव्यात सापडणे म्हणजे केवळ मरणच.ही माहिती एमदिशोकडून मिळाल्यामुळे मी त्याविषयी फारच दक्ष असे.एक दिवस आमच्या दार एस सलाममधील घराच्या स्नानगृहात मी दाढी करत उभा होतो.आणि तोंडाला फेस चोपडून खिडकीतून सहज बाहेर बागेत नजर टाकली.बागेत सलिमू पोर्चमधील वाळू सारखी करत होता. आणि त्याच्या मागे माझे लक्ष गेले आणि मी एकदम गारठलोच, कारण त्याच्या मागच्या वाळूवरून चांगाला सहा फूट लांब आणि माझ्या मनगटाच्या जाडीचा मांबा विलक्षण चपळाईने येत होता.त्याने सलिमुला पाहिले होते आणि त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीनेच तो येत होता.
   मी धावतच खिडकीपाशी गेलो आणि बाहेर डोकावत स्वाहिलीमध्ये जवळ जवळ किंचाळलोच, "सलिमू सांभाळ, तुझ्यामागे मोठा साप आहे" साप अगदी एकाद्या धावपटूच्या वेगात पुढे येत होता आणि सलिमूने मागे वळून पाहिले तेव्हां तो त्याच्यापासून साधारण पंधरा पावलांच्या अंतरावर होता.मला काही करता येणे तर शक्यच नव्हते आणि सलिमूलाही फारसे काही करता येईल असे दिसत होते कारण त्याने पळण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी मांबाने त्याच्या मागे अगदी शर्यतीत भाग घेणाऱ्या घोड्याच्या वेगाने धावत त्याला केव्हांच गाठले असते. आताही तो पाच सेकंदातच त्याला गाठण्याची शक्यता दिसत होती.
   मी अगदी जीव मुठीत धरून पहात राहिलो.सलिमू वळून माम्बाकडेच पहात होता.आता त्याने खूप वाकून एक पाय मागे घेऊन धावण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या धावपटूप्रमाणे पवित्रा घेतला होता वाळू सारखी करण्यासाठी त्याच्या हातात असलेले लांब दांड्याचे दाताळे त्याने वर, पण खांद्याच्या वर जाणार नाही अशा बेताने उचलले होते आणि ते चार पाच सेकंद तो अगदी स्तब्ध राहून  त्याच्याकडे अगदी वेगाने येत असलेल्या त्या काळसर्पाकडे अगदी निश्चलपणे पहात राहिला.सापाचे त्रिकोणाकृती डोके वर उचललेले मला दिसत होते आणि पोर्चच्या जमिनीवर तो सरपटत असताना बारीक दगडगोट्यांवर घासणाऱ्या त्याच्या सरपटणाऱ्या शरीराचा अस्पष्ट आवाजही मला ऐकू येत होता.
   अजूनही ते दृष्य माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे आहे. बागेत पडलेली ती सकाळची कोवळी उन्हे, पार्श्वभूमीला असलेले भरभक्कम बाओबाब (आफ्रिकेतील विशेष प्रकारचे) वृक्ष,सलिमू त्याच्या खाकी अर्धी चड्डी आणि सदरा या वेषात अनवाणी पण मुळीच न घाबरता निश्चलपणे दांताळे उगारून उभा आणि समोरून आपला फणा उभारून रोरावत येणारे ते कृष्णवर्णी सापाचे धूड.सलिमू थांबून पहात होता,अगदी मुळीच न हालता आणि आवाजही न करता.माम्बा त्याच्यापासून पाच फुटापर्यंत येईपर्यंत तो तसाच थांबला आणि तो येताक्षणीच "धडाम" करुन फावड्याचा प्रहार त्याने माम्बाच्या लांबीच्या  बरोबर मध्यावर त्याने केला आणि त्याच अवस्थेत त्याने आपल्या शरीराचा सर्व भार टाकत फावडे  धरून ठेवले.आणि नंतरही उड्या मारत त्याने फावड्यावरील दाब वाढवण्याचा प्रयत्न केला.त्या सापाच्या शरीरात फावड्याचे दात घुसून तेथून रक्ताची धार वहाताना दिसत होती.माझ्या अंगावर कपडे नाहीत याचीही पर्वा न करता मी तसाच माझी गोल्फची काठी घेऊन बाहेर धावलो.
   मी बाहेर पोचलो तेव्हां तो त्याच अवस्थेत सापाला तडफडत ठेऊन उभा होता,"मी काय करू (तुला मदत करण्यासाठी)?" असे मी स्वाहिलीत त्याला विचारल्यावर "मुळीच काही करू नका, साहेब आणि जवळही येऊ नका जे काय करायचे ते मलाच करू द्या "असे तो म्हणाला आणि त्याने फावड्याचे दात सापाच्या शरीरातून उपसून काढून जरा दूर उडी मारली.त्याच्या आघातामुळे साप त्याच जागी वळवळत राहिला पण माझ्यावर हल्ला मात्र करू शकला नाही.पुन्हा एक जबरदस्त पवित्रा घेत सलिमूने दुसरा घाव त्वेषाने बरोबर सापाच्या टालक्यात घातला आणि त्याची वळवळ एकदम बंद झाली.सलिमूने एक मोठा हुंकार भरला आणि स्वत:च्या कपाळाला हात लावला आणि तो माझ्याकडे पाहून म्हणाला,"असान्ति ब्वाना (धन्यवाद मालक) असान्ति साना( खूप खूप धन्यवाद)" एकाद्याचा प्राण वाचवण्याची अशी संधी क्वचितच मिळते त्यामुळे पुढे कधीही सलिमूला पाहिल्यावर मला त्या आठवणीने मोठा आनंद मिळ्त असे."