माम्बा,सिंबा,माम्बा---२

डालचा दुसरा अनुभव सिंहासंबधीचा आहे.
    " काळ्या माम्बाच्या त्या प्रसंगानंतर महिन्याभरातच मला एका दौऱ्यावर एमदिशोबरोबर जावे लागले.त्या दौऱ्यात माझा मुक्काम तबोरा शहरात पडला.तबोरा दार एस सलामपासून अंतर्भागात ४५० मैल अंतरावर आहे.आणि १९३९ मध्ये ती अगदी लहान वसाहत होती पण टांगानिकाच्या संदर्भात ते महत्त्वाचे ठाणे असल्यामुळे ब्रिटिश डिस्ट्रिक्ट ऑफिसरची तेथे नियुक्ती केलेली होती. तबोरा शहरात त्यावेळी रॉबर्ट सॅनफोर्ड हा डिस्ट्रिक्ट ऑफिसर होता. त्यादिवशी माझा मुक्काम त्याच्याकडेच होता. संध्याकाळच्या वेळी रॉबर्ट व त्याची पत्नी यांच्याशी घराच्या व्हरांड्यात बसून मी गप्पा मारत बसलो होतो व जवळ रॉबर्टची दोन मुले खेळत होती.अचानक त्याचा सहाय्यक एमदिशो "सिंबा मालक सिंबा "असे ओरडत धावत आला. स्वाहिली भाषेत सिंहाला सिंबा म्हणतात. (सिंहा व सिंबा या उच्चारसाम्यावरून स्वाहिली संस्कृतपासून तयार झाली की संस्कृत स्वाहिलीपासून?कारण सर्व मानवजातीचा उगम आफ्रिकेपासून झाला असे म्हणतात.) "मालक बघा बघा भला मोठा सिंबा आपल्या स्वयंपाक्याच्या बायकोला खातोय "
   रॉबर्ट तडक घरात जाऊन आपली शक्तिशाली बंदूक काढून त्यात गोळी बसवत बाहेर आला. आणि मला घेऊन व्हरांड्यातून बाहेर पडत "त्या पोरांना आत घेऊन जा" असे बायकोकडे पहात म्हणाला. एम्दिशो बाहेर उड्या मारत घराच्या मागील बाजूस बोट दाखवत,"स्वयंपाक्याच्या बायकोला सिंबा उचलून घेऊन गेला.तो तिला खातोय आणि तो त्याचा पाठलाग करून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतोय." असे सांगत होता. घराच्या मागील बाजूस नोकरांना रहाण्यासाठी जागा दिलेली होती आणि नोकरांपैकी  चार पाचजण त्याच्याच सुरात सूर मिळवून मागील बाजूस बोट दाखवून "सिंबा सिंबा"असा गिल्ला करत होते. "कोठे आहे सिंबा ?" रॉबर्टने विचारले पण त्यांनी काही उत्तर देण्यापूर्वीच त्याला शे दीड्शे पावलावर एक भलामोठा पिंगट रंगाचा सिंह दिसला.स्वयंपाक्याच्या बायकोच्या कमरेला त्याने आपल्या जबड्यात पकडले होते. त्यामुळे तिचे डोके व हात एका बाजूस लोंबत होते तर पाय दुसऱ्या बाजूस. तिच्या अंगावरील पोषाक लाल पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांचा होता. आमच्या इतक्या जवळून चालला होता तरी अगदी शांतपणे आपल्या धीर गंभीर चालीने तो आमच्यापासून दूर जात होता.आणि त्याच्यामागे वीस पंचवीस पावलांवर स्वयंपाकी पळत मोठ्या धीराने उड्या मारत दोन्ही हातांनी जोरात टाळ्या वाजवत व तोंडाने "सिम्बा ,सिम्बा सिम्बा माझ्या बायकोला सोड,माझ्या बायकोला सोड "असे ओरडत त्याचा पाठलाग करत होता.
    ते दृश्य जसे कारुण्यपूर्ण होते तसेच विनोदीही दिसत होते.तेवढ्यात रॉबर्ट बंदुक हातात घेऊन वेगाने स्वयंपाक्याच्या पाठोपाठ पळत पळत जाऊ लागला आणि मोठ्याने ओरडून त्याला ,"पिंगो ( स्वयंपाक्याचे नाव),पिंगो,बाजूला सरक जमिनीवर पड म्हणजे मला गोळी घालता येईल" असे सांगत होता पण पिंगो काही तिकडे लक्ष देत नव्हता आणि सिंहही कोणाकडेच लक्ष न देता आपल्याच चालीने मोठ्या ऐटीत   कुत्र्याने एकादे आवडलेले हाडूक तोंडात पकडून धावावे तसा त्या  बाईला तोंडात धरून चालत होता.
  रॉबर्ट आणि स्वयंपाकी दोघेही सिंहापेक्षा अधिक वेगाने धावत होते आणि सिंह मात्र अगदी आरामात या कसल्याच गोष्टीचे भान नसल्यासारखे आपल्याच धुंदीत चालला होता.त्या सिंहाला गोळी घालण्याचे धाडस रॉबर्टला होत नव्हते कारण त्याच्या तोंडातील बाईलाच ती लागण्याची भीती त्याला वाटत होती सिंह जंगलाने वेढलेल्या डोंगराळ भागाकडे चालला होता आणि जंगल इतके दाट होते की एकदा का तो त्यात शिरला की त्याचा पत्ता लागणे शक्य नव्हते.धाडशी स्वंयंपाकी सिंहाच्या अगदी जवळ पोचला होता तर रॉबर्ट त्याच्यामागे तीस चाळीस पावलांवर होता.शेवटी त्याने बंदूक वर उचललीच.सिंहाच्या तोंडात बाई असल्यामुळे तो बार भरणार नाही असे मला वाटत होते,पण गोळी झाडल्याचा आवाज आला आणि सिंहाच्या पुढेच थोड्या अंतरावर ती आपटून धूळ उडाली.गोळीचा आवाज सिंहाने ऐकला आणि धूळ उडाल्याचे पण पाहिले आणि आपल्यामागे शस्त्रधारी माणसे येत आहेत ही जाणीव त्याला झाली आणि तोंडातल्या बाईला सोडून त्याने एकदम जोरात पळ काढला.हळू चालणाऱ्या सिंहाच्या वेगात  एकदम एवढी वाढ झाल्याचे मी प्रथमच पहात होतो.त्यामुळे रॉबर्टच्या बंदुकीतून दुसरी गोळी सुटण्यापूर्वीच तो जंगलात पार दिसेनासा झाला होता.
   "प्रथम स्वयंपाकी, त्याच्या पाठोपाठ रॉबर्ट आणि त्याच्या मागून मी असे आम्ही तिघेही  त्याच्या बायकोपर्यंत पोचलो आणि आमच्या नजरेस जे दृष्य पडले त्याच्यावर माझा विश्वासच बसेना.सिंहाच्या जबरदस्त जबड्यात सापडून तिच्या कमरेचे व पोटाचे अगदी दोन तुकडे झाले असण्याची भीती मला वाटत होती,पण अगदी सहजपणे उठून बसत ती आपल्या नवऱ्याकडे हसून बघत होती.
"कुठंकुठं इजा झाली आहे तुला?" काळजीयुक्त स्वरात रॉबर्टनं विचारलं,"त्या म्हाताऱ्या सिंहाने मला जराही इजा पोचवली नाही.मी अगदी मेल्यासारखी त्याच्या तोंडात राहिले आणि त्याने माझे कपडेदेखील फाडले नाहीत.’असे म्हणून ती सिंहाच्या लाळेने ओले झालेले आपले कपडे झटकत उभी राहिली.स्वयंपाक्याने आपल्या बायकोला मिठीच मारली आणि दोघांनी आनंदाने आफ्रिकी पद्धतीने थोडे नृत्यही केले.
"तुला थोडा ओरखडाही नाही उठला ?"रॉबर्टने विश्वास न बसून पुन्हा विचारले,"खरच नाही मालक आपल्या पिलांना जसे तोंडात पकडून नेतात अगदी तसेच त्याने मला पकडले होते."
   रॉबर्ट आणि माझी  या विषयावर बरीच चर्चा झाली.प्रथम त्या सिंहाला शोधून ठार मारावे असे रॉबर्टला वाटत होते, इतर शिकाऱ्यांनाही त्यानी विचारले पण सिंहाने स्वयंपाक्याच्या बायकोला अगदी ओरखडाही काढला नाही यात हे काय गूढ होते हे कोणीही उकलू शकले नाही आणि म्हणून त्या दयाळू सिंहाला सोडून द्यावे असा विचार त्याने केला. (पुढे चालू)