दर्शनी अण्णा हजारे नाव आहे!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
***************************************************

   दर्शनी अण्णा हजारे नाव आहे!
एक ते आदर्श खेडेगाव आहे!!

पद, प्रतिष्ठा अन् उपाध्या गौण सारे;
शुद्ध चारित्र्यास येथे भाव आहे!

नेहरू, गांधी, अटलजी वाजपेयी!
आज त्यांचे फक्त उरले नाव आहे!!

दंगली जातीय अन् या जाळपोळी;
राजकारण हे नव्हे.....हा डाव आहे!

तेलगी, "आदर्श", स्पेक्ट्रम, कैक गफले!
माणसांची ही अघोरी हाव आहे!!

मॉल, मल्टीप्लेक्स, ई बैंकिंगसेवा.....
माणसा! प्रगती तुझी भरधाव आहे!

परग्रहावर जायची करतात भाषा!
पाहिला कोणी धरेचा ठाव आहे?

वल्गनांनी, घोषणांनी, कान किटले!
देशसेवा दूर....नुसता आव आहे!!

पाच वर्षांनीच येतो कळवळा तो......
कळवळ्याचा फक्त आविर्भाव आहे!

आज आखाडी अमावस्या असावी;
कोंबडीला, बोकडाला भाव आहे!

मार तू आता हतोडा......ऎक माझे!
हीच आहे वेळ, जेव्हा ताव आहे!!

स्वप्न साकारेल जे जपलेस तूही.....
तू खडा तर टाक.... तुजही वाव आहे!

काळजाला एक आहे चोरकप्पा....
मी जिथे एकेक जपला घाव आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१