जरी नेहमी, जगभर फिरतो मुलगा माझा!

गझल
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८=२४मात्रा
***************************************************

जरी नेहमी, जगभर फिरतो मुलगा माझा!
हृदयी माझ्या स्पंदन करतो मुलगा माझा!!

काळजामधे खोल, मुळे पसरली तरूची......
तीच ओल घेऊन डवरतो मुलगा माझा!

सात समुद्रापार करोनी सुगंध येतो.......
वसंत होऊन तो बहरतो मुलगा माझा!

कुठून येतो शब्दांना, लडिवाळपणा हा?
लेखणीतुनी या पाझरतो मुलगा माझा!

घरी यायची वाट पाहतो तो अन् मीही........
नजरेतून जणू भिरभिरतो मुलगा माझा!

पोर कालचे पोरच वाटे अजून मजला........
तसाच अजुनीही कुरबुरतो मुलगा माझा!

जुन्या स्मृतींचा घरभर करतो मीच पसारा........
किती सहज तो घर आवरतो, मुलगा माझा!

पादाक्रान्त नवी शिखरे तो सहजच करतो........
किती लीलया तो झालरतो मुलगा माझा!

कधी कधी भावनाविवश मी मधून होतो........
भक्कम असूनही गांगरतो मुलगा माझा!

नाकाच्या शेंड्यावर येतो राग मधूनच.........
अजून रुसला की, गुरगुरतो मुलगा माझा!

तीच कालची शिकवण पुरते त्याला, जी तो.......
अजून अंथरतो, पांघरतो मुलगा माझा!

लटपटते वार्धक्य कधी हे मधेच माझे.......
उतार वय माझे सावरतो मुलगा माझा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१