मी कापसाप्रमाणे झालो सुमार हल्ली!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
*******************************

मी कापसाप्रमाणे झालो सुमार हल्ली!
का वाटतो भुईला माझाच भार हल्ली?

मी आजकाल देतो आहे मलाच खांदा........
लावीत कोण नाही मज हातभार हल्ली!

होतात दोस्त कोणी, होतात यार कोणी........
फसवायचे निघाले नाना प्रकार हल्ली!

नाकारल्याप्रमाणे होकार रोज येती........
मी मोजतो कुठे रे, माझे नकार हल्ली?

कातर असायची ती तिन्हिसांज आजवरती.........
मन कातरीत माझे बसते दुपार हल्ली!

केली कृपा फुलांनी, झालीत ती दयाळू.........
मज जाणवू न देता करती प्रहार हल्ली!

शहरे कशी म्हणावी? घनदाट जंगले ही......
रानातल्याप्रमाणे होते शिकार हल्ली!

इतके जगून झाले, डोळे मिटून जगतो........
माझे जिणेच झाले आहे जुगार हल्ली!

बांधू कसे कळेना मन दावणीस माझे..........
येती मनामधे या भलते विचार हल्ली!

तारा कुणीच नाही छेडीत काळजाच्या!
टाचून ओठ बसते माझी सतार हल्ली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१