नकारात्मक पत्रकारिता

आजच्या सकाळामधील ही बातमी पाहा.


एका दैनिकाचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार श्री० चं० प० भिशीकर ह्यांनी ९१व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


प्रमुख पाहुणे डॉ० आनंद यादव ह्यांनी ह्या प्रसंगी 'भिशीकर हे विसावे शतक पाहिलेले आणि समग्र दृष्टिकोन असलेले पत्रकार आहेत' असे गौरवोद्गार काढले.


त्या वेळी बोलताना श्री० भिशीकर म्हणाले -


"आयुष्यात नकारात्मक भूमिका घेतली तर काही उभे करता येत नाही. दुर्दैवाने आजच्या पत्रकारितेमध्ये ही नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. एकविसाव्या शतकातील पत्रकारांनी त्याचा विचार करायला हवा."


"सध्याची पत्रकारिता विविध साधनांमुळे अधिक वेगवान झाली आहे; पण त्यात दोष पाहण्याची दृष्टी अधिक आढळते. आपण समाजातील फक्त उणेच बघत राहिलो, तर समाजात काहीही विधायक उभे राहणार नाही. याबाबत 'सकाळ'चे संस्थापक डॉ० नानासाहेब परुळेकर यांचे उदाहरण मी कायम समोर ठेवले. त्यांनी समाजात विधायक उभे करण्यावर अधिक भर दिला."


"पत्रकाराने स्वतःमध्ये अहं निर्माण होऊ दिला, तर तो या क्षेत्रातील त्याचे कर्तव्य पार पाडू शकणार नाही. समाजावर संस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडतानाच पत्रकारांनी भारतीयत्वाचा विसर पडू देता कामा नये. त्याचप्रमाणे साधनांचा उपयोग करून गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत."


मनोगती हो, ह्या बद्दल आपल्याला काय वाटते? वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि विश्वव्यापी जाळे (इण्टरनेट) इत्यादी माध्यमांत नकारात्मक लेखन करून पत्रकार काय साध्य करत असतील बरे? कृपया आपली मते नोंदवावीत ही विनंती.


आपला
(आवाहक) प्रवासी