सरशी

ऑगस्ट स्ट्राईंडबर्गच्या "द स्ट्रॉन्गर" ह्या स्वीडिश नाटकाच्या इंग्रजी भाषांतराचे स्वैर मराठी भाषांतर
इंग्रजी भाषांतर व प्रस्तावना: एडविन ब्यॉर्कमन

प्रस्तावना

स्ट्राईंडबर्गच्या नाटकांपैकी "द स्ट्रॉन्गर" सर्वात लहान आहे. तो त्याला "सीन" (नाट्यप्रवेश) म्हणत असे. ही केवळ एक घटना आहे. वॉडव्हिलमध्ये ह्याला "स्केच'", व फ्रेन्च लोक "क्वार्ट द ह्युर" असे म्हणतात. त्यातील दोन पात्रांपैकी एक संपूर्ण नाटकात काहीच बोलत नाही. त्यामुळे हे छोटेसे नाटक एकभाषित होते. तरीही त्यात स्ट्राईंडबर्गच्या नाटकांच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक असलेली सारी नाट्यमय उत्कटता आहे. त्यात मानसिक संघर्ष भरलेला आहे, व त्या संघर्षामुळे पाहता पाहता माणसांची नियती बदलताना दिसते. सौ. 'क'ची काही मिनिटांची, वरवर पाहता निरुद्देश पण प्रत्यक्षात अशुभसूचक, बडबड तीन आयुष्ये आपल्यासमोर उघड करते. आणि शेवटी जेव्हा ती आपला नवरा आपलाच असल्याच्या विजयोन्मादात निघते तेव्हा आपल्याला तिच्याविषयी, तिच्या नवऱ्याविषयी, आणि तिच्या प्रतिस्पर्धी स्त्रीविषयी त्रिखंडात्मक कादंबरी वाचून मिळेल एवढी माहिती असते.

छोटी असली तरी सौ. 'क'ची भूमिका "तारके"ला शोभेल अशी आहे. परंतु अलौकिक प्रतिभावान विचक्षण नटीला मात्र कु. 'ख'ची मूक भूमिका अधिक भावेल. एक गोष्ट नक्की: फार थोड्या भूमिका नटीकडून ह्या भूमिकेइतक्या अक्कलहुशारीची, कसबाची, व कल्पकतेची मागणी करतात. सौ. 'क'ची ही मूक प्रतिद्वंद्वी स्ट्राईंडबर्गला रेखाटायला आवडणाऱ्या रक्तशोषक पात्रांपैकी एक आहे. प्रकाशझोत सातत्याने आणि निर्दयपणे तिच्यावरच आहे.

"द स्ट्रॉन्गर"चे प्रकाशन सर्वप्रथम १८९० साली स्ट्राईंडबर्गच्या फुटकळ लिखाणांच्या "थिंग्ज प्रिंटेड ऍन्ड अनप्रिंटेड" ह्या संग्रहात झाले. काही वर्षांपूर्वी, १९०६ सालच्या उन्हाळ्यात, जेव्हा मी ह्या देशासाठी एका स्ट्राईंडबर्ग संग्रहाची जुळवाजुळव करत होतो तेव्हा हे इंग्रजी रूपांतर केले होते. त्या वेळी ते न्यू यॉर्क इव्हिनिंग पोस्टच्या साहित्यिक पुरवणीत प्रकाशित झाले होते.

पात्रयोजना

सौ. क: एक विवाहित नटी
कु. ख: एक अविवाहित नटी

स्थळ: केवळ महिलांसाठी असलेल्या उपाहारगृहाचा एक कोपरा; दोन लहान लोखंडी टेबले, एक लाल सोफा, आणि काही खुर्च्या.

[टोपी व हिवाळी कोट परिधान केलेली सौ. क प्रवेश करते. तिच्या हातात सुंदर जपानी टोपली आहे. ]
[कु. ख बसलेली आहे. तिच्या पुढ्यात बीअरची अर्धी रिकामी बाटली आहे. ती एक सचित्र साप्ताहिक वाचत आहे. अधूनमधून ते बदलून दुसरे घेत आहे. ]

सौ. क: मिली! कशी आहेस? ख्रिस्मस ईवला एखाद्या गरीब अविवाहित पुरुषासारखी अशी एकाकी बसली आहेस.

[कु. ख क्षणभर पेपरातून वर बघते, मान डोलवते, आणि पुन्हा वाचू लागते. ]

सौ. क: तुला अशी उपाहारगृहात एकटी बघून मला खरंच खूप वाईट वाटतय. तेही ख्रिस्मस ईवला. एकदा मी पॅरिसमध्ये एका लग्नाला गेले होते. वधू कॉमिक वाचत बसली होती, तर वर साक्षीदारांबरोबर बिलियर्ड्स खेळत होता. तेव्हाही मला इतकंच वाईट वाटलं होतं. मनात विचार आला, ज्याची सुरुवातच अशी ते लग्न टिकणार कसं? तूच विचार कर, लग्नाच्या दिवशी तो चक्क बिलियर्ड्स खेळत होता! आता तू म्हणशील की ती कॉमिक वाचत होती. पण ते वेगळं, ग.

[वेट्रेस एक कप ड्रिंकिंग चॉकलेट सौ. कपुढे ठेवून निघून जाते. ]

सौ. क: [थोडे घोट घेऊन मग टोपली उघडते, व ख्रिस्मसच्या भेटवस्तू दाखवते. ] हे बघ मी माझ्या मुलांसाठी काय घेतलय. [एक बाहुली उचलते. ] कशी आहे? लिसासाठी घेतली आहे. ही डोळे फिरवते, मान वळवते. बघितलीस? छान आहे की नै? आणि ही कार्लसाठी बुचाची पिस्तुल. [कु. खच्या दिशेने झाडते. ]

[कु. ख दचकते. ]

सौ. क: घाबरवलं का मी तुला? मी तुला खरंच गोळी घालीन असं वाटलं की काय? तुझ्या मनात माझ्याविषयी असा विचार आलाच कसा? हो, आता तू जर मला गोळी घातलीस तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. मी तुझ्या मार्गात आडवी आले होते नं एकदा. मला माहीत आहे, तू ते कधीच विसरणार नाहीस. पण माझाही नाइलाज होता. तू अजूनही असंच समजतेस की मी कट करून तुला रॉयल थिएटरमधून बाहेर काढलं होतं. तुला वाटत असलं तरी मी तसं काहीही केलं नव्हतं. अर्थात, मी कितीही सांगितलं तरी तुझा विश्वास बसणार नाही. तू मलाच दोषी मानणार. [टोपलीतून भरतकाम केलेली सपातांची जोडी काढते. ] ह्या माझ्या नवऱ्यासाठी. ह्यावरची ही ट्युलिपची फुलं मी स्वत: भरली आहेत. मला ट्युलिप अजिबात आवडत नाहीत. त्याला मात्र सगळ्यावर ट्युलिप हवीत.

[कु. ख उपरोधमिश्रित कुतूहलाने वर्तमानपत्रातून वर तिच्याकडे पाहते. ]

सौ. क: [प्रत्येक हातात एक सपाता घालून] बॉबची पाउलं केवढी लहान आहेत बघ. तू त्याचं चालणं पाहायला हवस. इतकं डौलदार आहे म्हणून सांगू. अर्थात, तू कधी त्याला सपाता घातलेलं पाहिलं नाहीस, म्हणा.

[कु. ख मोठ्याने हसते. ]

सौ. क: इथं बघ, तो आला. [असे म्हणत सपाता मेजावरून चालवते. ]

[कु. ख पुन्हा हसते. ]

सौ. क: मग तो चिडून अस्से पाय आपटतो: "त्या स्वयंपाकिणीला साधी कॉफी करता येत नाही. " किंवा: "ती मुलगी माझ्या अभ्यासिकेतील दिवा दुरुस्त करून घ्यायला विसरलीय. मूर्ख कुठली. " मग थंड वाऱ्याचा झोत येतो आणि त्याचे पाय गारठतात. "कडाक्याची थंडी पडलीय पण ह्या गाढवांना घर गरम कसं ठेवायचं ते काही ठाऊक नाही. " [ती एका सपातीचा तळवा दुसरीच्या पृष्ठभागावर घासते. ]

[कु. ख खळखळून हसते. ]

सौ. क: घरी येऊन त्याला सपाता शोधाव्या लागतायत. मेरीनं त्या कपाटाखाली ढकलल्या आहेत. जाऊ दे, आपल्याच नवऱ्याची टर उडवणं बरं नव्हे. खूप चांगला आहे तो. अगदी गोड आहे. तुलाही असा नवरा मिळायला हवा. हसतेस काय? काय चुकीचं बोलले मी? आणि, बरं का, तो माझ्याशी एकनिष्ठही आहे. ठाऊक आहे मला. त्यानं स्वत: तसं सांगितलय मला. फिदीफिदी हसायला काय झालं? मी दौऱ्यावर असताना त्या मेल्या बेटीनं त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. शोभतं का हे असं वागणं? [थोडं थांबून] बॉबनं हे स्वत: मला सांगितलं, दुसऱ्या कोणाकडून ऐकावं लागलं नाही ह्याचा मला आनंद आहे. आणि बेटी एकच नाही काही! का कोणास ठाऊक, पण सगळ्या बाया माझ्या नवऱ्याच्या मागे असतात. त्यांना वाटत असेल की त्याच्या सरकारी हुद्द्यामुळे तो त्यांना नाटकात काम मिळवून देऊ शकेल. कदाचित तूही प्रयत्न केला असशील. तूही त्याला मोहपाशात अडकवण्याचा प्रयत्न केलाच होतास की. माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. पण मला हेही माहीत आहे की त्याला तू पसंत नाहीस. मला तर असं वाटत आलय की तुझ्या मनात त्याच्याविषयी आकस आहे.

[विराम. दोघी गोऱ्यामोऱ्या होऊन एकमेकींकडे पाहतात. ]

सौ. क: अमेलिया, आज संध्याकाळी आमच्या घरी येशील ना? निदान माझ्यावर रागावलेली नाहीस हे दाखवण्यासाठी ये. का ते नेमकं सांगता येणार नाही, पण तू माझी वैरीण असणं बरं नाही वाटत. कदाचित मी त्या वेळी तुझ्या आड आले होते म्हणून [हळूहळू] किंवा—माहीत नाही. खरंच माहीत नाही.
 
[विराम. कु. ख शोधक नजरेनं सौ. ककडे बघते. ]

सौ. क [विचारपूर्वक]: आपली पहिली भेट किती विचित्र होती, नाही? अग, आपण पहिल्यांदा भेटलो न, तेव्हा मला तुझी भीती वाटत होती. इतकी की तुला नजरेआड होऊ देण्याची हिंमत नव्हती मला. मी कोठेही जाण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्याजवळच असायचे. तुझी शत्रू होण्याची छाती नव्हती—म्हणून तुझी मैत्रीण झाले. पण तू जेव्हा जेव्हा माझ्या घरी यायचीस तेव्हा विसंवादी सूर लागायचा, कारण माझ्या नवऱ्याला तू पसंत नव्हतीस. त्याचा मला त्रास व्हायचा. त्यानं तुझ्याशी मैत्रीचं नाटक तरी करावं ह्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण तुझा साखरपुडा होईपर्यंत त्याला राजी करू शकले नाही. मग तुम्ही दोघं एवढे घट्ट मित्र झालात जणू काही आधी आपल्या खऱ्या भावना दाखवण्याचं तुमच्यात धाडस नव्हतं, तेव्हा ते सुरक्षित नव्हतं. अन्‌ नंतर—! मला मत्सर वाटला नाही. अजबच आहे, नाही? मला आमच्या मुलाच्या बाप्तिस्म्याचा प्रसंग आठवतोय. तू धर्ममाता झाली होतीस. मी माझ्या नवऱ्याला तुझं चुंबन घ्यायला लावलं. त्यानं घेतलं खरं, पण तुम्ही दोघं अतिशय गोंधळला होतात. हे मला त्या वेळी जाणवलं नाही. नंतरही नाही. पण आता जाणवतय! [आवेगाने उठते. ] तू बोलत का नाहीस? आता का दातखीळ बसलीये? इतका वेळ मीच बोलत्येय, आणि तू नुसती माझ्याकडे टक लावून पाहत्येस. कोषातून रेशीम काढावं तसं तुझ्या नजरेनं माझ्या अंतरंगातील हे विचार बाहेर काढले. मला जरा विचार—कदाचित वाईट विचार—करू दे. तू तुझं ठरलेलं लग्न का मोडलस? त्यानंतर आमच्या घरी एकदाही का आली नाहीस? आजही तुला आमच्याकडे का यायचं नाहीये?
 
[कु. ख बोलण्याच्या तयारीत असताना. ]

सौ. क: नाही, आता तू काही बोलण्याची गरजच नाही. सगळं कसं स्पष्ट दिसतय मला. हे कारण होतं तर. हो! आता साऱ्या गोष्टींचा ताळमेळ लागतोय. निर्लज्ज! मला तुझ्यासोबत बसण्याची इच्छा नाही. [आपल्या वस्तू घेऊन दुसऱ्या टेबलावर जाऊन बसते. ] तुला आवडतात म्हणून मला पसंत नसणारे ट्युलिप मी त्याच्या सपातांवर भरायचे. [सपाता जमीनीवर फेकते. ] आम्ही उन्हाळे डोंगरावर थंड हवेच्या ठिकाणी घालवायचे. का? तर तुला समुद्राचा खारा गंध सहन होत नाही म्हणून. माझ्या मुलाचं नाव इस्किल ठेवलं गेलं. का? कारण ते तुझ्या वडिलांचं नाव होतं. मी तुझ्या आवडीच्या रंगाचे कपडे पेहरायचे, तुला आवडणारी पुस्तकं वाचायची, तुला पसंत असणारे पदार्थ खायचे, तुला पसंत असणारी पेयं प्यायची! जसं हे चॉकलेट! शी! किती भयंकर आहे हे सगळं! तू सर्व लादलस माझ्यावर-अगदी तुझ्या वासनाही. एखाद्या किड्य़ानं सफरचंद पोखरत जावं तसा तुझा आत्मा माझ्यात पोखरत गेला, माझं स्वत्व नष्ट करत खोल, अगदी खोल शिरत गेला. शेवटी उरलं फक्त बाह्य आवरण आणि थोडी काळी धूळ. मला तुझ्यापासून लांब पळून जायचं होतं पण पळता येईना. एखाद्या सापाप्रमाणे तू आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी मला भुरळ घालायचीस, जखडून ठेवायचीस. माझे पंख फडफडायचे पण मी खाली ओढले जायचे. मी पाण्यात असायचे. माझे पाय बांधलेले असायचे. जितकी हात मारायचे तितकी अधिक खोल बुडायचे. खोल, अगदी खोल, तळाशी. अन्‌ तिथे तू माझी वाट पाहत असायचीस. एखाद्या अजस्र खेकड्यासारखी, मला आपल्या नांग्यांमध्ये पकडण्यासाठी. आता मी तिथे आहे! लाज नाही वाटत? संताप, संताप येतो मला तुझा! पण तू, तू नुसती बसून आहेस. अबोल, शांत, बेपर्वा. अमावास्या असो की पौर्णिमा; ख्रिस्मस असो की उन्हाळा; इतर माणसं सुखी असो की दु:खी. तुला द्वेषही करता येत नाही आणि प्रेमही करता येत नाही. मांजर उंदराच्या बिळासमोर दबा धरून बसते तशी तू बसलेली आहेस! सावजाला ओढून बाहेर काढता येत नाही, त्याचा पाठलाग करता येत नाही, पण त्याची वाट पाहता येते तुला. तू ह्या कोपऱ्यात बसतेस. तुला माहीत आहे, तुझ्यामुळे लोकांनी ह्या कोपऱ्याला 'उंदीर पकडण्याचा पिंजरा' असं नाव दिलय? इथं बसून तू वर्तमानपत्रं वाचतेस. हे बघायला की कोण अडचणीत आहे, कोणाला नाटकातून काढून टाकणार आहेत. इथे बसून तू तुझ्या बळींवर नजर ठेवतेस, योजना आखतेस, त्यांच्यावर अधिराज्य गाजवतेस. बिचारी अमेलिया! तुला माहित्येय, तरीही मला तुझी कीव येते, कारण तू दु:खी आहेस. घायाळ आहेस म्हणून दु:खी आहेस, म्हणून तुझ्यात एवढा द्वेष भरला आहे. मला तुझा राग यायला हवा, पण नाही येत. खरंच नाही येत. कारण तू क्षुद्र आहेस. आणि बॉबविषयी म्हणशील, तर त्या प्रकाराचा मला मुळीच त्रास होत नाही. काय फरक पडतो त्यानं? तू किंवा आणखी कोणी मला चॉकलेट प्यायला शिकवलत तर त्यात काय मोठंसं? [चमचाभर चॉकलेट पीते; मग काहीतरी महत्त्वाचे सांगितल्याचा आविर्भावात] चॉकलेट तब्येतीला चांगलं असतं म्हणतात. अन्‌ तुझ्याकडून जर मी चांगलं नेसायला शिकले असेन तर उत्तमच आहे की! माझ्या नवऱ्यावरची माझी पकड आणखी घट्ट झाली. माझा फायदा झाला आणि तुझा तोटा. एकूण असं दिसतय की तो आता तुझा राहिलेला नाही. तुझी इच्छा होती की मी त्याच्यापासून विभक्त व्हावं. तू तुझं ठरलेलं लग्न मोडलस तसं. आता तुला त्याचा पश्चाताप होतोय. पण मी कधीच तसं करणार नाही. मी इतक्या संकुचित मनाची नाहीये. दुसऱ्या कोणाला नको असलेलंच मी का घेऊ? कदाचित, शेवटी मीच आता तुझ्याहून वरचढ ठरले आहे. तुला माझ्याकडून काहीच मिळालं नाही. तू फक्त दिलंस. अन्‌ म्हणून जे चोराच्या बाबतीत घडलं तेच माझ्या बाबतीत घडलं. जागी झालीस तेव्हा जे तुझ्याकडं नव्हतं ते माझ्याकडे होतं. तुझ्या हाती सारं काही बेकार आणि बिनमोलाचं ठरण्याचं दुसरं कारण काय? तुला पुरुषाचं प्रेम टिकवता आलं नाही. तिथे तुझी ट्युलिप, तुझ्या वासना कामी आल्या नाहीत. तुला पुस्तकांतून माझ्याप्रमाणे जगण्याची कला शिकता आली नाही. तुझ्या वडिलांचं नाव देण्यासाठी एखाद्या लहानग्या एस्किलला जन्म देता आला नाही. अन्‌ तू सदा सर्वकाळ सगळीकडे गप्प का असतेस ग? गप्प, अगदी गप्प? मला वाटायचं की त्यात तुझी शक्ती आहे. कदाचित सत्य हे असेल की बोलण्यासारखं तुझ्याकडे कधीच काही नव्हतं, कारण तुला विचार करणं जमायचं नाही. [उठून सपाता उचलते. ] मी आता घरी जात्येय. ट्युलिप घेऊन जाते. तुझी ट्युलिप. तुला दुसऱ्यांकडून काही शिकणं जमलं नाही. वाकता आलं नाही, आणि म्हणून तू वाळक्या काटकीसारखी मोडलीस, व मी मोडले नाही. तू मला जे जे शिकवलस त्याबद्दल मी आभारी आहे, अमेलिया. माझ्या नवऱ्यावर मला प्रेम करायला शिकवल्याबद्दल आभारी आहे. आता मी घरी जात्ये—त्याच्याकडे! [जाते. ]

(पडदा पडतो. )