एकाच ईश्वराची लेकरे.

                                                               एक भिकारी होता. तो मोठ मोठ्या नगरांमध्ये वेगवेगळ्या युक्त्या वापरून चांगली भीक मिळवायचा. 

                           असाच एकदा तो एका मोठ्या नगरात भीक मागत फिरत होता. लवकरच तो एका मोठ्या नगरशेटाच्या वाड्यासमोर आला. 
नगरशेट एक भला आणि दानशूर माणूस म्हणून प्रसिद्ध होता. तो फार दयाळूही होता. कोणाही भिकाऱ्याला अथवा गरजू माणसाला तो तसाच परत पाठवीत नसे. त्याची कीर्ती या भिकाऱ्याने ऐकली होती. या शेटकडे आपले काम नक्की होईल याची खात्री असल्याने तो त्याच्या 
वाड्याच्या मुख्य दरवाज्यासमोर आला. दरवाजे नेहमी उघडे ठेवायचे अशा हुकुमामुळे सेवकांनी ते उघडे ठेवले होते. शेट आतमधल्या बैठकीवर बसून काहीतरी कामाचे कागदपत्र पाहात होते. तेवढ्यात भिकाऱ्याची आर्त हाक ऐकू आली. .....
                                                                "दान करा शेट सावकार , दान करा. पुण्य लागेल. ".   त्याचे बोलणे ऐकून शेट उठून दरवाज्याजवळ 
आले. तेव्हा भिकारी म्हणाला, " शेट साहेब , आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे, सबब आपण आता एकमेकांचे सख्खे भाऊच झालो. "   शेट हसून 
म्हणाले, " अगदी बरोबर, तुझे म्हणजे खरे आहे. ". त्यावर तो भिकारी म्हणाला, " तर मग आता मला आपल्याजवळीळ संपत्तीतला वाटा द्यावा, अशी माझी विनंती आहे. " .... थोडा विचार करून शेट म्हणाले, " हो, ना! खरंच की" .   असे म्हणून त्यांनी कनवठीचा एक रुपया काढून त्याला 
दिला. ते पाहून भिकारी म्हणाला, " आपल्याजवळ गजांत लक्ष्मी आहे, मग माझा वाटा एवढाच कसा ? " ..... त्यावर शेट म्हणाले, " अरे जगातले 
सगळेच  जण आता माझे भाऊ झाल्याने त्यांना त्यांचा वाटा द्यावा लागेल . त्यांचा वाटा बाजूला काढल्याने तुझा वाट्याला माझ्या संपत्तीतला एवढाच भाग येतो. तो मी तुला दिला. तो तू स्वीकारावास हे बरे.  " असे म्हणून शेट परत फिरले आणि बैठकीवर बसून कागदपत्र पाहू लागले. 
                                                              भिकारी काहीच न बोलता सूज्ञपणे फक्त एक रुपया घेऊन निघून गेला.