हुषार बबन

                                                एकदा एक न्यायाधीश निवृत्त झाले. त्यांना त्यांचा गाव खूप आवडे. ते गावी आले आणि बंगला बांधून राहू लागले.  एक दिवस ते गावातल्या पोस्ट ऑफिसात गेले. पोस्ट मास्तरांना म्हणाले, " मास्तर, मी आता आपल्या गावात राहायला आलो आहे, जर माझे काही टपाल आल्यास मला ते वेळेवर मिळेल याची काळजी घ्या. "    मास्तर न्यायाधीश महाराजांना ओळखत होते. एवढी मोठी व्यक्ती आपल्या गावात  राहायला आल्याचा त्यांना अभिमान वाटला.  ते उठून उभे राहिले आणि त्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांची ओळख करून दिली व  मनापासून म्हणाले, " न्यायाधीश महाराज,  आपण आमच्या गावात राहायला येऊन गावाचा मान वाढवला आहे. आपले टपाल अगदी लगेचच  मिळेल याची मी मी देतो. आपण काळजी करू नये. "     मग  न्यायाधीश महाराज समाधानाने घरी गेले. .... त्याच गावात बबन नावाचा एक  चलाख आणि चुणचुणित तरूण राहत असे. त्याला थोडेफार इंग्रजी वाचता येत होते. त्यामुळे त्याला पोस्टमनची नोकरी गावातच मिळाली. लवकरच तो कामावर रुजू झाला. पहिल्याच दिवशी पोस्टमास्तर म्हणाले, " हे बघ बबन, तू तसा  हूषार आहेस, तुला इंग्रजीही वाचता येते, त्यामुळे दिलेली पत्रे त्याच दिवशी वाटून होतील याची दक्षता घे. "     बबन स्तुतीने खूश झाला. तो खरोखरीच त्या दिवसाची पत्रे त्याच दिवशी वाटू लागला. त्यामुळे मास्तर खूष असत. 

                                              तसे न्यायाधीश महाराज सामाजिक कार्याबद्दल प्रसिद्ध असल्याने एक दिवस त्यांचे एक पत्र आले. पत्त्यावर 
नावापुढे कोणीतरी "जज्ज " असे इंग्रजीत लिहिले होते. बबन जवळ त्यांचे  पत्र वाटण्यास दिले होते. बबनने नाव जुडगे असे  वाचले .पण जुडगे नावाचे गृहस्थ न सापडल्याने  त्यांचे पत्र देता आले नाही. बबन त्या दिवशी मास्तरांना म्हणाला, " मास्तर , सगळी  पत्रे वाटून झाली. पण "जुडगे " नावाचे गृहस्थ न सापडल्याने ते पत्र मात्र देता आले नाही. "   मास्तरांनाही नाव नवीन वाटले, त्यांनी ते पत्र न्याहाळले . तेव्ह ते म्ह्णाले " अरे हे जुडगे नाही "जज्ज " असे लिहिलेलं आहे. " त्यांना अतिशय राग आला. त्यांनी बबनला एक कानफटात दिली. मोठ्या माणसाचे पत्र परत आणलेले त्यांना आवडले नाही.  मग ते ओरडले , " यू फूल ........ "   ते  ऐकून बबन नम्रतेने म्हणाला, " आम्ही कसले फूल , फूल तर तुम्ही , आम्ही फक्त त्या फुलाच्या पाकळ्या. "   असे म्हंटल्यावर मास्तरांना हसावे की रडावे ते कळेना.