कशी जिरवली.

                                एका नगरात दोन श्रीमंत व्यापारी राहत होते. ते एकमेकांना खाली पाडण्याची एकही संधी सोडत नसत. एकाचे नाव होते. 

लक्ष्मीकांत व दुसऱ्याचे नाव होते वत्सराज. दोघांपैकी लक्ष्मीकांत थोडा जास्त गर्विष्ट होता. एक दिवस  मागचे सर्व विसरून वत्सराज लक्ष्मीकांताला भेटावयास गेला. तो  महालाच्या दरवाज्याजवळ आलेला पाहून लक्ष्मीकांताने आपल्या नोकरास बोलावून सांगितले, " जा, 
वत्सराजाला मी घरात नाही, बाहेर गेलो आहे असे सांग. "   नोकर म्हणाला, " पण शेटजी आपण तर घरी आहात मग असे सांगून कसे चालेल? "  त्यावर शेटजींना राग आला आणि म्हणाले, " जेवढे सांगितले आहे तेवढेच कर, स्वतःचे डोके वापरू नकोस ". नोकर चुपचाप दरवाज्याजवळ 
आला आणि  वत्सराजांना म्हणाला, "   शेटजी आमचे शेटजी बाहेर गेले आहेत , सबब आपण नंतर याल तर बरे होईल. "   खरंतर वत्सराजाने 
महालाच्या गवाक्षातून लक्ष्मीकांत घरी असल्याचे पाहिले होते. त्यामुळे तो नोकराच्या उत्तराने अचंबित झाला व निघून गेला. त्यानेही मग 
लक्ष्मीकांतला घरी आल्यावर असेच  सांगण्याचे ठरवले. या घटनेला काही दिवस उलटले. लक्ष्मीकांत विसरूनही गेला. लक्ष्मीकांताच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न ठरले. संबंध नगरात बोलावणी गेली. पण काही खास लोकांकडे लक्ष्मीकांत स्वतः गेला. तसेच त्याने वत्सराजाकडे स्वतः जाण्याचे ठरवले. 
                                वत्सराजाच्या महालाच्या मुख्य दरवाज्याजवळ लक्ष्मीकांत आलेला त्याने पाहिला. तो कशासाठी आला आहे हे त्याला माहित होतं. " आहेत का शेट घरात ? " अशी हाक ऐकून नोकर दरवाज्या उघडण्या पुढे झाला. त्याला अडवीत वत्सराज म्हणाला, " थांब . तू जाऊ नकोस. मीच जातो दरवाज्या उघडायला. "     ते ऐकून नोकर म्हणाला, " पण शेटजी मी असताना आपण ही तसदी का घेता ?  " त्यावर वत्सराज  समजूतीने म्हणाला, " तुला कळणार नाही " . असे म्हणून नोकराला पाठवता वत्सराजाने स्वतःच दरवाज्या उघडला . हसरा चेहरा करून , हातात निमंत्रण पत्रिका घेऊन नमस्कार करीत उभ्या सलेल्या लक्ष्मीकांताला तो म्हणाला, " आमचे शेट घरात नाही, आपण नंतर याल  तर बरे होईल. "   हे ऐकून लक्ष्मीकांत म्हणाला, " अरेच्या , तुम्ही स्वतः समोर येऊन , तुम्हीच  घरात नसल्याचे कसे काय सांगता. काहीतरीच. "  मग वत्सराज म्हणाला, " काय हरकत आहे ? मी तर त्या दिवशी तुझ्या नोकराच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ,तू घरात असतानाही निघून गेलो .  आत्ता तर मी स्वत; सांगतोय,  तरी विश्वास बसत नाही ? "     आपली चूक कळून क्ष्मीकांत वरमला आणि चुपचाप निघून गेला.