संस्कृत दिनाच्या निमित्ताने !

        भारतीय परंपरेत नारळीपौर्णिमा हा पवित्र दिवस आहे.रक्षाबंधनाचा  म्हणजे भाऊ बहीण या नात्याच्या सन्मानाचाही दिवस आहे. तो जसा रक्षाबंधन म्हणून ओळखला जातो तसाच अलिकडे "संस्कृत दिन" म्हणूनही ओळखला जाऊ लागला  आहे,
         श्रावणातली पौर्णिमा हा संस्कृत दिन म्हणून पाळला जातो.ही प्रथा वेदकाळी नव्हती कारण त्यावेळी निदान भारतात तरी सर्व किंवा बरेच लोक संस्कृत भाषाच बोलत असावेत, पण आता मात्र संस्कृत बोलणाऱ्या लोकांची संख्या कमी होत असल्यामुळे आपल्या त्या संस्कृतीची ओळख राहावी  म्हणून हा दिन पाळावा असा आदेश १९६९ मध्ये जारी करण्यात आला.श्रावण पौर्णिमा हा दिवस ठरवण्याचे कारण असे सांगण्यात आले की त्या दिवशी प्राचीन भारतात शिक्षण सत्र सुरू होत असे.
   संस्कृत भाषा हा विषय आमच्या अभ्यासक्रमात होता.त्यावेळी आठवी ते अकरावी ही चार वर्षे तो शिकावा लागे.पण बऱ्याच विद्यार्थ्यांना तो अवघड वाटे त्यामुळे मध्ये काही काळ त्याला वैकल्पिक विषय करण्यात आले. माझ्या मुलांच्या काळात संस्कृत पूर्ण (१००) किंवा हिंदी(५०) संस्कृत(५०) असे विकल्प होते पण त्या काळात मी  औरंगाबादला असताना त्याच्या शाळेत पूर्ण संस्कृत शिकवण्याची सोय नव्हती त्यामुळे माझ्या मोठ्या मुलाला हिंदी संस्कृत असेच घ्यावे लागले.मी शाळेत जाऊन माझ्या मुलाची पूर्ण संस्कृतची तयारी करून घेतो असे सांगितल्यावर त्यासही शाळेव्ह्या व्यवस्थापनाची  तयारी नव्हती व त्याला त्यानी दिलेले कारण मजेशीर होते ते म्हणाले,"मग हिंदीच्या तासाला तो काय करणार?" त्या काळात तो हिंदी शिकला असता तर माझी काही हरकत नव्हती पण त्यासही त्यांची हरकत होती असे दिसले व शेवटी त्याला संस्कृत पूर्ण घेता आले नाही. धाकट्या मुलाच्या वेळी मात्र पूर्ण संस्कृत मुलांना अधिक गुण मिळवून देण्यास सहाय्यक होतो व त्यामुळे आपले अधिक विद्यार्थी उच्च गुणांसह उत्तीर्ण होऊ शकतात याची कल्पना शाळेस आली असावी किंवा शाळेतील हिंदीए प्राध्यालक निवृत्त झाले असावेत, त्यामुळे त्याला मात्र पूर्ण संस्कृत घेता आले.
     सध्या संस्कृत विषय अभ्यासक्रमात आठवी ते दहावी या तीन वर्षात आहे आणि बहुतेक विद्यार्थी कमी लिहून जास्त गुण मिळवण्याचा विषय म्हणून त्याच्याकडे बघतात आणि दहावीनंतर त्याकडे ढुंकूनही पहात नाहीत याला फक्त संस्कृत विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अपवाद.त्यांच्यापैकीही किती जणांना अस्खलित संस्कृत बोलता अगर लिहिता येईल याविषयी शंकाच आहे.प्रयत्न केल्यास ते शक्य आहे पण तशी आवश्यकता व रुची या दोनही गोष्टींचा अभावच दिसतो.
    भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रभाषा कोणती भाषा करावी या विषयावर तज्ञांची मते विचारात घेता संस्कृत हीही भाषा सुचवली गेली होती. ११ सेप्टेम्बर १९४९ या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी असा ठराव मांडला होता व त्यास डॉ.बाळकृष्ण भगवंत केसकर व निझामुद्दिन अहमद यांनी पाठींबा दर्शवला होता.द.भारतातील अकरा संसद सभासदांनीही मान्यता दिली होती. त्यांच्या मते संस्कृत भाषा एक मूळ भारतीय भाषा आहे जी सर्व भारतीय एका काळी बोलत होते. हिंदीवर जसा द.भारतीयांनी बहिष्कार टाकला (व अजूनही त्रिभाषासूत्रीचा अंगिकार त्यानी केलेला नाही,)तसा बहिष्कार टाकण्याचे कोणालाच कारण नव्हते.संस्कृत ही समजायला व वापरायला अवघड भाषा आहे असे सर्वसामान्य लोकांना वाटले असते पण इस्रायलने हिब्रू भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार केल्यावर त्या भाषेत सर्व आवश्यक साहित्य निर्मिती केली तसेच संस्कृतचे झालेही असते. अर्थात ही जर तरची भाषा झाली.  
        मराठी  भाषेत मला जाणवलेली उणीव जी संस्कृत भाषेचा वापर करूनच पूर्ण होते ती म्हणजे शब्दाची जोडणी व रूपांतर करण्याची सोय.इंग्रजी भाषेत ती उणीव नाही त्या भाषेत अनेक प्रकारचे जोडशब्द व रूपांतरित शब्द करता येतात पण मराठीत विशेषत: तांत्रिक लिखाण करताना मला ती उणीव फारच भासली व त्यासाठी संस्कृत भाषेचाच आधार घ्यावा लागला.१९६० मध्ये मराठीत अर्थशास्त्राचा अभ्यास करताना अनेक कल्पना व्यक्त करणे संस्कृतमध्येच उदा उपभोक्त्याचे उपभोगाधिक्य (Consumer’s surplus) शक्य आहे असे दिसले.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेले इंग्रजी साठीचे प्रतिशब्द अभियंता,दिग्दर्शक, महानगर,नगरसेवक, वगैरे सर्व संस्कृत भाषेतूनच घ्यावे लागले व ते नंतर सर्वसामान्य जनतेनेही व्यवस्थित स्वीकारले.अगदी तुकाराम,चोखामेळा अश्या संस्कृत भाषेचा गंध नसणाऱ्या संतांच्या अभंगात संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर दिसतो.आता उलटी गंगा सुरू झाली आहे म्हणजे संस्कृत तर सोडाच पण आपल्याच मराठी भाषेतही  छोट्या छोट्या कल्पना  आपल्याला व्यक्तच करता येत नाहीत आणि त्यासाठी इंग्रजीची मदत घेणे अधिक सोयिस्कर वाटू लागले आहे.
    कोणतीही भाषा शिकणे हे आवड,आवश्यकता व निकड यावर अवलंबून आहे त्यापैकी आवड हा मुद्दा विचारात घेतला असता कोणतीही भाषा शिकावी ही आवड फारच कमी लोकांना असते त्यामुळेच महाविद्यालयीन शिक्षणात भाषेचा अभ्यासक्रम फारच कमी विद्यार्थी निवडतात.व काही वेळा अनिवार्य विषय असतानाही काहीतरी थातुरमातुर अभ्यास करून त्यात उत्तीर्ण होतात.माझा नातू तर याचा पुढे काही उपयोग नाही तर त्याचा अभ्यासच कशाला करायचा असे म्हणतो.शिक्षणाचा इतका मर्यादित विचार करायचा नसतो हे त्याला पटवणे मला जमले नाही.
    संस्कृतप्रमाणेच इतरही भाषादिन आहेत का याचा शोध घेतल्यावर आपल्या मराठीचा दिन कुसुमाग्रजांचे निधन १९९९ मध्ये झाल्यावर म्हणजे २००० सालापासून सुरू झाला.कुसुमाग्रजांनी मराठीची दीनवाणी अवस्था मांडण्यात पुढाकार घ्रेतल्यामुळे असेक कदाचित ! म्हणजे भाषा दीन झाल्यावर असे "दिन " करायची पाळी येत असावी का?तरी त्या अगोदर माधव ज्यूलियन व अलीकडे सुरेश वैद्य यांनी अतिशय जोरकस काव्यात मराठीचे थोरपण वर्णन केले आहे.
      इतर भाषांपैकी उडिया भाषा दिन मार्च ११ या दिवशी साजरा करण्याचे ओरिसा शासनाने २०१५ पासून ठरवले आहे. पूर्व बंगाल आताचा बांगला देश)ज्यावेळी पाकिस्तानात असल्यामुळे उर्दूच फक्त राष्ट्रभाषा असा फतवा निघाल्यावर त्याला पूर्व बंगालमधील जनतेने मोठ्या प्रमाणात विरोध केला व २१ फेब्रुआरी या दिवशी अनेक जणांना हौतात्म्य पत्करावे लागले या पार्श्वभूमीवर तो दिवस "बंगाली भाषा दिन" किंवा मातृभाषा दिन किंवा भाषा हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात.मलयालम दिन १ नोवेम्बर, पंजाबिदा बोलि दिवस २३ फ़ेब्रुआरी,उडिया भाषा दिवस ११ मार्च,आसामी भाषा दिवस १९ मे यासही बंगालीसारखाच इतिहास आहे अशी माहिती जालावर उपलब्ध आहे.
     गुजराथी भाषा दिन २३ ऒगस्ट या दिवशी आहे.खरे तर असा दिवस साजरा करण्याचे कारण कळत नाही कारण गुजराती जेथे जातील तेथील भाषा गुजरातीच आहे अश्या पद्धतीने वागतात.मला अमेरिकेत कोणी गुजराती बोलणारा भेटला तर सुरवात,"सूं छे ?" नच करत असे. याबाबतीत   एका गुजराथी जोडप्याची माहिती वाचून मोठे कौतुक वाटले. राजकोट येथील गौरव पन्डित आणि त्याची पत्नी हे ते जोडपे ! गौरवने नडियादमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी तर शीतलने कम्प्यूटर ऍप्लिकेशनमधील पदवी त्याच महाविद्यालयात घेतली होते व त्याच काळात परस्परांवर अनुरक्त होऊन त्यांनी विवाह केला होता. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यावर ती आठ महिन्याची होताच त्यांनी गोल्डमन साक्समधील लठ्ठ पगारच्या नोकऱ्या १५ वर्षाच्या कार्यकालानंतर सोडून आपल्या आठ महिन्याच्या ताशीला(ताशी तिचे नाव)आपली भाषा शिकता यावी म्हणून आपल्या जन्मग्रामी २०१५ साली भावनगर मध्ये येऊन राहिले व अठरा महिने राहून परत गेले.या काळात तिला सर्व गुजराती परंपरा व भाषा यांचे बाळकडू मिळेल अशी योजना त्यानी केली. आता ते परत अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.
    या जोडप्याला माझे स्वतःचे दोन अनुभव सांगण्यासारखे आहेत. माझा भाचा अमेरिकेतच आहे व त्यालाही एक मुलगी आहे. तिचा जन्म तेथेच झाला . त्यानंतर सतत मराठी ते बोलतात आणि मराठी संस्कार तिच्यावर करतात त्यामुळे ती भारतात येते तेव्हां आमच्याशी अस्खलित मराठीत बोलते. याउलट माझा भारतात जन्मलेला नातू चार वर्षाचा असताना माझ्या मुलास अमेरिकेत जावे लागले‍ जाण्यापूर्वी नातू अस्खलित मराठी बोलत असे.  अमेरिकेतही शाळेत जाऊ लागण्यापूर्वीही त्याचे संभाषण मराठीतच चाले पण शाळेत जाऊ लागताच त्याला तेथे व्यक्त होणे सोपे जावे म्हणून मुलाने त्याच्याशी इंग्रजीत बोलायला सुरवात केली आणि काही दिवसांनी तो मराठी बोलणे विसरूनच गेला म्हनजे आम्ही दोन वर्षानंतर  अमेरिकेत गेल्यावर तो आमच्याशीही मराठीत न बोलता इंग्रजीतच बोलू लागला. ती त्याची संवय मोठ्या कष्टाने घालवावी लागली . आता भारतात परत आल्यावर मात्र तो मराठी चांगले बोलू लागला हे आमचे भाग्य !