पाय दिन

  आजचा दिवस दोन महत्वाच्या गणिताशी संबंधित घटनांचा आहे त्यापैकी एक १३९ वर्षापूर्वी घडली ती म्हणजे प्रसिद्ध गणिती आइन्स्टाइन यांचा जन्म. १४ मार्च १८७९ हा तो दिवस.आइन्स्टाईन हे सैद्धान्तिक भौतिकीशास्त्रज्ञ होते.सापेक्षतावादाच्या सिद्धान्तामुळे ते प्रसिद्धीस आले व शेवटपर्यंत आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेने व विशिष्ट विचारप्रणालीनेही जगातील एक महान व्यक्तिमत्व म्हणूनही प्रसिद्ध पावले. 
     दुसरी घटना म्हणजे ३० वर्षापूर्वी आजचा दिवस पाय (Pi ) दिवस म्हणून समजण्यात यावा असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक लॅरी शॉ यांनी सुचवले (आजची तारीख ३-१४ (१४ मार्च ) ही पाय या संख्येचे पहिले तीन आकडे असल्यामुळे) व तसा तो सान फ्रान्सिस्को संशोधन विज्ञान संग्रहालय (Exploratorium science museum ) या संस्थेत साजरा करण्यात आला व जगातील सर्व गणिती व गणितभक्त आजही तो साजरा करतात.
      आमच्या गणिताच्या शालेय अभ्यासक्रमात सुरवातीस वर्तुळाचा व्यास व परीघ यांचे गुणोत्तर म्हणून जो गुणक शिकवण्यात आला तो २२/७ असा होता त्याला पाय म्हणतात हे महाविद्यालयात गेल्यावर (इंग्रजी माध्यम सुरू झाल्यावर ) कळले. आजकालच्या विद्यार्थ्यांना शालेय गणितातच Π चा परिचय होतो.भूमिति व त्रिकोणमितीत या गुणक स्थिरांकाचा उपयोग करावा लागतो.गणिताच्या या शाखांमध्ये व विज्ञानातही अल्फा बीटा गॅमा डेल्टा इ. ग्रीक मुळाक्षरांचा उपयोग केला जातो.
         भारतीय गणितशास्त्रात इ.स.पू.३००० वर्षापूर्वीचे लिखित मजकूर सापडत नसल्यामुळे पाय हे अक्षर माहीत होते की नाही हे समजत नसले तरी वर्तुळाचा व्यास व परीघ यांचे विशिष्ट गुणोत्तर ऋग्वेदकाली त्यांना माहीत होते असे वेदांगे आणि सुलभसूत्रांमधून आढळते.आर्यभट्ट (इ.स.४७६) यांनी ३.१४१६ असे ते गुणोत्तर काढले होते व ते २२/७ पेक्षा अधिक बरोबर होते.आर्यभट्ट शाखेचे आणखी एक गणिती माधव (१३४० इसवी) यांनी ११ दशांश स्थळापर्यंत पाय ची अचुक किंमत वर्तविली होती. 
       आपल्या भारतीय गणितींनी केलेल्या गणितशास्त्रातील कर्तृत्वाचा अभिमान आपल्याला अवश्य हवा पण त्याचबरोबर आज पाय दिनादिषयी इन्डियन एक्स्प्रेसमधील चार ओळीच्या बातमीपलीकडे या दिवसाविषयी काहीही वाचायला मिळत नाही.मलाही गुगलवर नेहमीप्रमाणे संचार करताना सुरवातीसच आजच्या दिनविशेषमध्ये पहायला मिळाल्यामुळे कळले.उलट अमेरिकेत ३० वर्षे हा दिवस गणितजगतात तर साजरा होतोच पण निरनिराळ्या मॉल वगैरेमध्ये विशेष प्रकारचे केक वगैरे करून हा दिवस साजरा करतात.मुख्य म्हणजे जनतेत गणित विषयाविषयी अधिक जागृति निर्माण करणे हे महत्वाचे कार्य यातून साधते.याच पार्श्वभूमीवर आपल्या वृत्तपत्रात पुण्यातील रुग्णालयात वैद्यकीय पदवीधर डॉक्टरने मंत्रतंत्राचा उपचार आपल्या रुग्णावर केला कारण त्याचा विश्वास म्हणे त्या पद्धतीवर होता. त्यात रुग्णास प्राण गमवावे अशी खेदजनक बातमी वाचायला मिळावी हे दुर्दैवच !
      काही इतर देशांना मात्र हा दिवस पाय दिन म्हणून साजरा करणे अयोग्य वाटते कारण अमेरिकन दिनांक लिहिण्याच्या पद्धतीत आजचा दिवस ३.१४ असा लिहिला जातो पण इतर देशात (आपल्याकडेही)  दिनांक दिवस-महिना-वर्ष अश्या पद्धतीने लिहिण्याचा प्रघात असल्याने आजचा दिनांक  १४-३ असा म्हणजे पाय या चिन्हाच्या किंमतीचा नसतो. त्याऐवजी पाय दिन २२ जुलै (२२/७) ला साजरा करावा कारण २२/७ ही पायची एक किंमत आहे (जी आम्ही गणितात वापरत होतो) असे त्यांचे मत आहे. असे असले तरीही कोणत्याही निमित्ताने विज्ञानाधिष्ठित दिवस साजरा करणे ही गोष्ट समाजास विज्ञानाभिमुख बनवण्यास उपयोगी ठरणार हे उघडच आहे.
     प्रिन्स्टन जेथे आयुष्याचा मोठा काल आइन्स्टाइन यांनी  काढला त्यांचा हा जन्मदिवस असल्याने आणखी मोठ्या  प्रमाणावर तो तेथे साजरा करतात.
   आजचा दिवस आणखी एका दु:खद घटनेने लक्षात ठेवावा लागणार आहे ती म्हणजे थोड्याच वेळापूर्वी गेली ५४ वर्षे मोटर न्यूरॉन डिसीजने व्हीलचेअरला खिळून राहूनही आपल्या संशोधन कार्यात खंड न पडू देणारे महान अमेरिकन वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे दु:खद निधन ! ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम या त्यांच्या पुस्तकाने सामान्य वाचकास एक अवघड विषय अतिशय सुलभ करून दाखवला व त्या पुस्तकाच्या लक्षावधी प्रती खपल्या.वैज्ञानिक अंतराळात एक तेजस्वी तारा म्हणून अनंत काळपर्यंत ते चमकत रहातील यात शंकाच नाही.