जेव्हा तुझ्या बटांना

       केतनने नेहमीप्रमाणे हाय टाकलं. जाईने उत्तर दिलं. तीही ऑनलाईन होती. बरेच दिवस ते ऑनलाईन बोलत होते.   जाईची ब-यापैकी माहिती त्याला कळली होती. तिच्या आवडीनिवडी कळल्या होत्या. एकदा भेटून मनात तुंबलेला प्रश्न तिला विचारायचा होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर केतनने विचारलं.
       "कधी भेटायचं ?"
       "भेटू रे."
       
        हे जाईने तिस-यांदा तरी ऐकवलं होतं. आता मात्र केतन वैतागला.
        "भेटू रे, भेटू रे खूप दिवस चाललंय तुझं. नक्की सांग. आपण असं किती दिवस चॅटिंग करणार ? गेले दोन आठवडे तू टाळत आहेस.एकदा भेटूच ना. नाहीतर मैत्रीला काय अर्थ आहे ?समोरासमोर भेटावंस वाटत नाही का तुला ?"
       केतनच्या एकदम झालेल्या सरबत्तीने तिकडून खूप वेळ काही उत्तरच आलं नाही. केतनला वाटलं, रागावली की काय. उगीच एवढं ताडकन बोललो.
      "बरं,रविवारी चालेल."
       अखेर जाईने होकार दिला. चला, अर्धीलढाई जिंकली, केतनला वाटून गेलं.
       "चालेल."
       बागेत भेटीची वेळ ठरली. केतनचे पुढचे सगळेच दिवस आनंदात गेले. जाईच्या आवडीनिवडी व स्वभावही एव्हाना कळल्याने जाईच्या रुपाचा त्याने अंदाज बांधला होता. काळे लांब केस, पाणीदार डोळे, फुलाफुलांचा पंजाबी पेहराव, तिची मेन्टेन्ड फिगर, हातात छोटीशी पर्स. याच रुपात ती आपल्याला भेटणार, असा त्याचा कयास होता. तिचं ते रुप मनातल्या मनात पसंत पडलेलं आहेच. चॅटिंग करताना स्वतःच्या केसांचं वर्णन तिनं बरेचदा केलं होतं. आज मोकळे सोडलेत, उद्याबांधणार आहे. आता केस वाढवायचं ठरवलंय वगैरे वगैरे. तिच्या वर्णनावरून केस कसे असतील, याची कल्पना केतन सतत करे. आता तिच्या होकाराने ते प्रत्यक्ष बघायला मिळणार होते. आता तिला भेटायचं आणि विचारायचं, असा त्याचा मनसुबा होता.  जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा...हे गाणं त्याचं आवडतं गाणं झालं.
       केतन वेळेआधी पोचला. लांबून जाई येताना दिसली. त्याच्या हृदयाची धडधड वाढत गेली. हसू फुलत गेलं. त्याच्या मनातली छबी जवळपास सगळीच्या सगळी त्याच्यासमोर उभी होती. दोघंही बाकावर बसले. आता जाई त्याच्याजवळ होती. त्याच्या डावीकडे. जाईच्या डोक्यावर नवी फॅशनेबल टोपी होती. केसबांधलेले होते.
      "बोल."
      "बरं वाटलं. तू आलीस. नुसत्या ऑनलाईन गप्पांनी काही होत नाही. माणूस जन्माला आलाय तो समोरासमोर बोलण्यासाठी. पूर्वीचे लोक काय ऑनलाईन बोलत होते ?"
      "बरोबर."
      "विषयाला लगेच हात घालावा की, थोड्यावेळाने ?" केतन विचार करू लागला.
       जाईने विचारलं,
      "काय चाललंय तुझं ? मास्टर्स ना ?
      "हो."
      "पुढे काय विचार आहे? "
      "नोकरीच."
      जाई बराच वेळ काहीच बोलली नाही. केतन काही बोलणार तेवढ्यात जाईने टोपी काढली. बांधलेले केस मोकळे केले. केतनकडे न पाहता नीट विंचरले. पुन्हा बांधले व अर्थपूर्ण नजरेने केतनकडे पाहिले.
     केतनला धक्का बसलेला होता. जाईच्या डाव्या बाजूची एक जाडजूड बट पांढरी होती. त्याच्या मनातल्या छबीला हे रुप मिळतं जुळतं नव्हतं. बाकी सगळं अपेक्षेप्रमाणे होतं पण बट ?
     केतनला काय करावं आणि काय बोलावं, सुचेना.
     "बोल. तू काहीतरी बोलायला, विचारायला मला बोलवलंस ना ?"
     "हो."
     "मग, विचार."
     केतन गप्प होऊन राहिला होता. आपण काय काय चित्रं उभी केली आणि...
      "ही तुझी एकच बट..." केतन कसनुसं म्हणाला.
      "हो. मला एका औषधाची अँलर्जी आली होती. त्यामुळे फक्त एकाच बाजूची बट अशी पांढरी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलंय की,या बाजूचे केस पांढरेच वाढतील. तसबिरी फसव्या असतात केतन. मग, ती मनातली चित्रं असोत किंवा खरे फोटोज. माणसं खरी. जेव्हा ती अशी समोर भेटतात ना तेव्हा खरं खुरंचित्र दिसतं. मी मुद्दामच तुला भेटणं टाळत होते. माझा चेहरा पाहिल्यावर तुझं काय होईल, मला माहीत होतं. तुम्हा मुलांच्या तारूण्याच्या कल्पनेत एखादं जरी वेगळेपण आलं तरी तुमची पंचाईत होते. तुझ्या मनातली ती तरूणी पार म्हातारी होऊन गेली ना ? तुझ्या मनात जो प्रश्न आहे तो आता तू मला विचारणार नाहीस. बरोबर ?
      केतनला सगळे वाहते क्षण स्तब्ध झाल्यासारखे वाटले.

(समाप्त)