साधी आणि सोपी आध्यात्मिक उकल

आपण निर्वस्तू आहोत पण आपल्याला आपण व्यक्ती असल्याचा भास होतोय हा एकमेव आध्यात्मिक उलगडा तुमच्या आयुष्याचे सगळे प्रश्न एका झटक्यात सोडवतो. ही निर्वस्तू जोपर्यंत उलगडत नाही तोपर्यंत कुणालाही, कोणत्याही परिस्थितीत स्थायी स्वास्थ्य लाभणं असंभव आहे.

आपण निर्वस्तू आहोत ही वास्तविकता आहे आणि तो फक्त उलगडा आहे; त्यामुळे जगातल्या कोणत्याही साधनेनं तो होण्याची शक्यता शून्य ! सर्व साधना या क्रिया आहेत आणि क्रियेतून क्रियाशून्य निर्वस्तूचा उलगडा होईल ही अपेक्षा व्यर्थ आहे. 

निर्वस्तूचा उलगडा न होण्याचं कारण प्रत्येक जण अहोरात्र व्यक्ती म्हणूनच जगतोय आणि सभोवतालच्या सर्व व्यक्ती तो भ्रम सतत कायम करतायत. व्यक्तित्व ही जगण्याची सोय आहे आणि ती जगायला उपयोगी कल्पना आहे पण ती वस्तुस्थिती नाही.

निर्वस्तूची चार वैशिष्ट्य आहेत : सर्वव्यापकता, क्रियाशून्यता, जाणण्याची अंगभूत क्षमता आणि अपरिवर्तनीयता. या चारही वैशिष्ट्यांचा अंगीकार करून तसं जगणं तुम्हाला मुक्त आणि स्वच्छंद करतं. 

थोडक्यात. सकाळी डोळे उघडता क्षणी आपण क्रियाशून्य आहोत, जी हालचाल होतेय ती शरीराची आणि सूक्ष्म पातळीवर विचारांची होतेय, आपल्याला ती समजते आहे पण खुद्द आपण जराही हालत नाही. घरून ऑफिसला किंवा फिरायला गेलो तरी ती फक्त दैहिक हालचाल होते, आपण जसेच्या तसे असतो. शरीर अंतर कापतं, आपण निरंतर आहोत.

एकदा ही क्रियाशून्यता कळली की तिची प्रचिती कामात पण यायला लागते. विचार मेंदूत सरकतात, देह तदनुसार काम करतो पण आपल्यात कणमात्रही फरक पडत नाही. कामाचा ताण आला तरी ती मेंदू किंवा शरीर थकल्याची आपल्याला होणारी जाणीव आहे, खुद्द आपल्यात काहीही बदल घडत नाही.

अशा प्रकारे क्रियाशून्यता, जाणीव आणि अपरिवर्तनीयता यांचं भान जीवनात कमालीचं स्वास्थ्य आणतं कारण स्वास्थ्याचा अर्थ आपण शरीरांतर्गत व्यक्ती आहोत या भ्रमापासून सुटका आहे.  हे स्वास्थ्य दीर्घकाल टिकणं म्हणजे आपण निर्वस्तू आहोत याचा उलगडा होत जाणं !

या निर्वस्तूच्या भानात जगण्याची कला तुम्हाला एकदा साधली की सर्वव्यापकतेचा अनुभव आपसूक येतो. सध्या आपण देहात आहोत असा सार्वत्रिक भ्रम आहे, तो प्रत्येकाला आपण विवक्षित ठिकाणी आहोत अशी ठाम समजूत करून देतो. पण आपण देहात नसून आपल्याला देहाची जाणीव आहे हा उलगडा तुमचा देह तरल करत नेतो. 

अशा प्रकारे निर्वस्तूच्या उलगड्यातून जगतांना, एक दिवस अचानक तुमच्या लक्षात येतं की देहात कुणीही नाही ! कुणाच्याही देहात कुणीही नाही.  ही विस्मयकारक उकल तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती आणि दुसऱ्याच्या मृत्यूचा शोक या दोहोतून एकाच वेळी मुक्त करते. 


अशा स्वस्थ आणि तरल चित्तदशेत जगतांना तुम्हाला लक्षात येतं की आपला स्थान निर्देश असंभव आहे, आपण सार्वत्रिक असलो तरी स्थानबद्ध नाही. तद्वत, आपण कालबद्ध नसून कालरहित आहोत कारण काल हा प्रकाश विभ्रम आहे आणि वेळ ही मानवी कल्पना आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे दिवस-रात्रीचा कालाभास होतो आणि वेळ ही प्रक्रिया मापनासाठी मानवानं योजलेली संकल्पना आहे, ती जगण्यासाठीची सोय निश्चित असली तरी घड्याळापलीकडे तिची वास्तविकता शून्य आहे.