मी चा शोध आणि मुक्ती (४)

आतापर्यंत एकजात सर्व सिद्धांनी मी  चा शोध घ्यायला सांगितला आहे आणि आध्यात्मिक भाषेत याला स्वरूपाचा शोध म्हटलंय. या स्वरूपाची एकसोएक लक्षण सांगितली गेली आहेत. सर्व साधकवर्ग, स्वतःमध्ये या लक्षणांच्या प्रकटीकरणाची आस धरून आहे आणि इतरेजन हे आपलं काम नाही, म्हणून त्या भानगडीतच पडत नाहीत. चंद्रावर जायला जेवढं साहित्य निर्माण करायला लागलं असेल त्यापेक्षा कित्येकपट अधिक साहित्य या मी च्या शोधावर निर्माण झालंय. 

प्रत्येकाची अशी ठाम धारणा आहे की मी आहेच. साधकवर्ग या मी मध्ये, आध्यात्मिक लक्षणं प्रकट होण्याच्या मागे आहे आणि इतरांनी त्या मी शी जुळवून घेतलं आहे, इतकाच काय तो फरक. पण वस्तुस्थिती अशी आहे की मी असा कुणीही नाही, ती प्रत्येकाची एक भ्रामक धारणा आहे.  या भ्रामक धारणेपासून सुटका म्हणजे मुक्ती आहे.  मी चा शोध घेणं व्यर्थ आहे आणि मी हटवण्याचा प्रयत्नही व्यर्थ आहे. मी आहे या भ्रामक धारणेपासून फक्त सुटका होण्याचा अवकाश आहे की मग जगण्यात बेहद्द मजा आहे.

जे लिहिलंय ते केवळ वाचून आणि त्यावर मनन करून कुणीही त्या भ्रामक धारणेतून मुक्त होऊ शकतो; कारण मुक्ती हीच वास्तविकता आहे.  शांतपणे वाचा :

एका अपत्याचा जन्म होतो, ही शारीरिक प्रक्रिया आहे आणि ती निसर्गत: घडते. मग त्या बालकाचं नांव ठेवलं जातं (समजा संजय). वास्तविकात संजय असा कुणीही नसतो, ती एक व्यावहारिक सोय आहे. सगळे जण त्या बालकाला संजय म्हणून हाक मारायला लागतात. त्या बालकाला ही तुझी आई, हे बाबा, भावंडं असतील तर हा भाऊ, ती बहीण असं सांगितलं जातं, हा सुद्धा समाज व्यवस्थेचा भाग असतो. वास्तविकात असा कुणीही कुणाचा काहीही नसतो. या सर्व भानगडीत त्या बालकाची अशी धारणा होते की संजय असा कुणी तरी आहे, (सगळे तशी हाक मरतायत म्हणजे) तो मीच आहे आणि तो देहात आहे !  वयात आल्यावर त्याचा विवाह होतो आणि ही गुंतागुंत आणखी वाढत जाते. बालकानं कल्पना केलेला संजय कुणाचा तरी पती होतो, यथावकाश एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा पिता होतो. थोडक्यात, सगळे त्याच्याशी तो संजय आहे आणि तोही इतरांशी आपण संजय आहोत या भ्रामक धारणेतून अहोरात्र वागत राहतात. या भ्रामक कल्पनेतून सुटका न होताच एक दिवस त्या बालकाचा मृत्यू होतो; सगळ्यांना वाटतं संजय गेला आणि संजयलाही शेवटापर्यंत वाटत राहतं की आपलं मरण ओढवलं ! 

कुठेही आणि केव्हाही  नसलेला एक संजय निर्माण होतो, जगतो आणि मरतो. वास्तवात संजय असा कुणीही नव्हता, सध्या सुद्धा नाही आणि कधीही असू शकत नाही; पण एका देहातून ही भ्रामक धारणा जगते आणि विलीन होते.  या भ्रमातून सुटका म्हणजे मुक्ती आहे. 

मुक्तीसाठी फक्त आपण नाही, (म्हणजे मी असा कुणीही नाही) आणि संजय असा तर कुणी नाहीच नाही, इतका उलगडा होण्याचा फक्त अवकाश आहे.  मी चा शोध घेणं, त्याचा उलगडा होण्यासाठी किंवा स्वरूपप्राप्तीसाठी वेगवेगळ्या साधना करणं; हे निव्वळ अज्ञान आणि पर्यायानी कालापव्यय आहे. 

आता या क्षणी तुम्ही केवळ कल्पना करून पाहा की देहात कुणीही नाही. खर तर ती वास्तविकता आहे, पण उलगडा झाल्यावर जगण्यात येणाऱ्या खुमारीची तुम्हाला झलक मिळेल. त्या उलगड्यासरशी तुमची मृत्यूची भीती संपेल कारण देह जाईल पण आत मरणारा कुणीही नाही. 

आपल्या देहात कुणीही नाही म्हणजे कुणाच्याच देहात कुणीही नाही. तस्मात, सर्व नाती-गोती केवळ कल्पना आणि धारणा आहेत. जीला आपण पत्नी समजतो तो देह आहे, पण याही देहात कुणी आणि त्याही देहात कुणी नाही, त्यामुळे कुणी पती नाही आणि कुणी पत्नी नाही. कुणी कुणाची आई किंवा बाप नाही आणि आपणही कुणाचे बाबा किंवा आई नाही. म्हणजे व्यावहारात नातीगोती संपणार नाहीत, पण तुम्ही त्या सर्व गुंत्यातून एका क्षणात मोकळे व्हाल ! पत्नीला घटस्फोट न देता, तुम्ही त्या मानसिक ओझ्यातून मुक्त व्हाल.  आणि मजा अशी की ती तुम्हाला पती मानते या तिच्या धरणेचा तुमच्यावर काहीही परिणाम होऊ शकणार नाही. थोडक्यात, नाती जशीच्या तशी राहतील पण त्यांचं ओझं शून्य होईल.  संतांनी संसाराकडे पाठ फिरवायला सांगितली, संसार असार आहे असं सांगितलं याचं कारण, त्यांच्या अज्ञानामुळे त्यांना ती वास्तविकता वाटली ! जे नाहीच त्याच्याकडे पाठ कशी फिरवणार ? 

तर सारांश असा की मी आहे आणि तोही देहात आहे हा सार्वत्रिक भ्रम आहे. या भ्रमातूनच प्रत्येक जण एकमेकाशी अहोरात्र व्यावहार करत असल्यानं, तो भ्रम प्रत्येकाला वास्तविकता वाटतो आहे. सर्व संतांनी या  मी चा एकतर शोध घ्यायला सांगितला आहे किंवा त्याला अहंकार समजून तो घालवायचा खटाटोप करण्यासाठी अनेकानेक साधना सांगितल्या आहेत आणि भारंभार ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. या सर्व साधना व्यर्थ आहेत आणि ते सर्व ग्रंथ निरूपयोगी आहेत. 

मी ही प्रत्येकाची व्यक्तिगत आणि भ्रामक धारणा आहे. ती धारणा, हा लेख केवळ शांतपणे वाचला तर संपेल. आणि एकदा त्या भ्रामक धारणेतून सुटका झाली की मुक्ती आहे. मुक्ती ही वास्तविक आणि बाय डिफॉल्ट स्टेट आहे. मुक्तीसाठी साधना करणं म्हणजे जे आहे तेच साधण्याचा व्यर्थ प्रयास आहे. आणि हे समजणं म्हणजे स्वरूपाचा उलगडा आहे.