तळेगांव पुराण

प्रस्तावना

तळेगांवात जागा घ्यायचे तीर्थरूपांना कसे सुचले ही परंपरावादी उत्तर भारतीय म्हणतात तशी 'संजोग की बात' होती.

चाळिशी गाठेपर्यंत स्वतःची जागा घेण्याचा विचारही न करणारी (विचार करायला न परवडणारी) अशी तीर्थरूपांची पिढी. त्यात दोन गोष्टींची भर पडली होती.

एक म्हणजे बॅंकेतल्या फिरत्या नोकरीमुळे एक गाव असे धरून ठेवलेले नव्हते. कोंकणात वर्षाला दोन वेळा जात असलो तरी परत तिथे स्थायिक व्हायला जाणे होणार नाही हेही ठरलेले होते. मूळ गांवची वडिलोपार्जित मालमत्ता ती अशी की सात भावंडांपैकी जास्तीत जास्त एकाला पुरे पडेल. झालेही तसेच. तिथे राहणारे काका आणि पुढली पिढी अजूनही पूजा सांगणे, लग्ने लावणे, आरोग्यसेवक/ग्रामसेवक म्हणून काम करणे अशा बहुविध धांदोट्या लावूनच गोधडी पुरी करतात.

दुसरे म्हणजे चाळिशी गाठता गाठता वडिलांनी मॅनेजर पदही गाठले होते. त्यामुळे दर बदलीच्या गावी 'मॅनेजर्स क्वार्टर्स' दिमतीला हजर असत.

आम्ही खानदेशात एका तालुक्याच्या गावी तेव्हा होतो. तिथले एक कुटुंब चहूबाजूंनी परिचित होते. थोरला मुलगा माझ्याबरोबरचा, धाकटा माझ्या धाकट्या भावाबरोबरचा, आणि काकू आईबरोबर महिला मंडळात.

चौथी बाजूच जरा कमकुवत होती - तिकडचे कुटुंबप्रमुख कॉलेजात प्राध्यापक (डबल एमए - इंग्रजी आणि पाली) होते. माझे वडील मॅट्रीक पास. बॅंकांचे राष्ट्रीयीकरण होण्याआधी मॅट्रीक पास हे तिथे नोकरी मिळवायला पुरेसे होते. मग पदोन्नती कामानुसार.

प्रोफेसरसाहेब घरी अगदीच अबोल. त्यांनी पुढे इतिहास संशोधनात पस्तीसेक वर्षे कष्ट करून चाळीसेक पुस्तके लिहिली. मराठयांचा इतिहास (छत्रपती शिवाजी ते पेशवाईचा शेवट) यावर ते एक अधिकारी गणले जात. पण वर्णितो आहे त्या काळात ते वाचन-चिंतन यातच मग्न असत. त्यांचे मूळगाव माहीत नाही, पण त्यांचे एक भाऊ लोणावळ्यास रेल्वेत मोठे हुद्देदार होते एवढे आठवते. लोणावळा स्टेशनशेजारी फायरप्लेस असलेला बंगला क्वार्टर म्हणून मिळण्याइतके मोठे. सासर (काकूंचे माहेर) तळेगांवला. म्हणजे दोन्ही मावळांत.

मावळ शब्दाची भौगोलिक नि सांस्कृतिक उत्पत्ती रोचक आहे. समुद्राला साधारण समांतर असा सह्याद्री. त्या सह्याद्रीला जुन्नर ते भोर या सुमारे सव्वाशे किमी मध्ये सह्याद्रीला काटकोनात पूर्वेकडे पसरलेल्या छोट्या डोंगररांगा. त्या डोंगररांगातील खोऱ्यांचा पश्चिमेकडचा भाग (मावळतीचा भाग) म्हणून मावळ. ही मावळे एकूण चोवीस असल्याचे मानले जाते. 'गुणि बाळ असा' या अंगाईत गोविंदाग्रज 'ही शांत निजे बारा मावळ थेट, शिवनेरी जुन्नरपेठ' म्हणतात. ती बारा आणि मावळ-भोर-वेल्हे तालुक्यांतील बारा असा हिशेब लावतात. एकूण काय, त्या काळी कोंकण अस्तित्वात वा खिजगणतीत नव्हते. नाहीतर मावळ हे नांव कोंकणपट्टीला खरे लागू पडते.

तर या काकूंच्या माहेराकडून मिळालेल्या माहितीआधारे तळेगांवला साडेचार-पाच गुंठ्यांचे प्लॉट्स मिळताहेत ही बातमी कळाली. प्रोफेसरांनी एक प्लॉट घेतल्याचीही बातमी कळाली. वडिलांनी तडफेने पुण्याची एक खेप केली आणि व्यवहार पक्का करून आले. त्यावेळी भाऊकाका नुकतेच सैन्यातून निवृत्त झाले होते (नोकरीत असताना झालेल्या एका अपघातामुळे ते सैन्यातल्या नोकरीसाठी अधू झाले होते. अपघात रजेवर असताना खाजगी प्रवासात झाल्याने सैन्यदल त्यांना झेपेल असे काम देण्यास बांधील नव्हते). त्यांनीही एक प्लॉट घेण्याची तयारी केली.

पुढे कळालेली गंमत अशी की पुण्याच्या काही बाजूंना तेव्हा इतका पडेल भाव होता की आम्ही तळेगांवला मोजलेल्या किंमतीत (हजार रुपये गुंठा) पुण्याच्या त्या भागांतही प्लॉट्स मिळत. कर्वेनगर, सहवास सोसायटी हे ते भाग.


पायाभरणी

प्लॉट घेतल्यावर तीनेक वर्षे अशीच गेली. आणि घर बांधायची घाई सुरू झाली.

काका तोवर देहूरोडला एका अर्ध-लष्करी आस्थापनेत नोकरीला लागले होते आणि देहूगांवात राहत होते. त्यांच्या प्लॉटवर एक दोन खोल्यांचे आऊटहाऊस बांधावे, तिथे काकांनी रहायला यावे आणि देखरेखीखाली त्यांचे नि आमचे घर बांधून घ्यावे असा मोठा बेत होता.

त्यांचे आऊटहाऊस बांधून घेण्याच्या कामावर मी मुकादमी केली. बारावीची परीक्षा झाली होती. काकू आणि चुलतभावंडे सुटीला कोल्हापुराला (काकूचे माहेर) गेली होती. माझी स्वयंपाकाची आवड तोवर सवयीत परावर्तित होऊ लागली होती. त्या देहूगांवच्या वास्तव्यात ती सवय घट्ट होऊन गेली. कारण काका स्वयंपाक करीत तो मिलिटरी परेडच्या थाटात. दणकावून. प्रश्न विचारायला जागा नाही. मग पोळ्या कच्च्या आहेत की जळालेल्या हे विचारायचे नाही. त्या मिलिटरी मेसमधून सुटण्यासाठी मी जिवापाड खपून स्वयंपाक हाती घेतला.

दोघांचा डबा करून झाला की मी काकांबरोबर देहूरोड गाठी. तिथून एकतर पीसीएमटी (ऍम्युनिशन फॅक्टरी खडकी ते वडगांव) वा एखादा ट्रक पकडून तळेगांव. प्लॉट हमरस्त्याहून साताठशे मीटरवर होता. बस मिळाली तर प्लॉटपासून शेसव्वाशे मीटरवर भंडारी हॉस्पिटलपर्यंत पोहोचता येई. प्लॉटवर बांधकाम करायला नि करवून घ्यायला वडिलांच्या ओळखीच्या एका कंत्राटदाराचा खानदेशातून आणलेला धना नामे एक बांधकाम मजूर होता.

राहण्याचा प्रश्न त्याने अगदीच सोपा करून टाकला होता. काकांच्या आऊटहाऊसला ऍस्बेस्टॉसच्या पत्र्याचे छत असणार होते. त्यातल्या एका पत्र्याची एक बाजू त्याने एका दोनफुटी दगडावर रेलून ठेवली. आणि याप्रकारे तयार झालेल्या बिळाला घर म्हणून जाहीर केले. पाऊस येण्याचा संभव नव्हता (एप्रिलचे दिवस; तेव्हा अवकाळी पावसाची एवढी रेलचेल नव्हती).

त्या बिळाबाहेर रचलेले तीन दगड ही त्याची चूल. जेवणाचा प्रश्नही तो अशाच सोपेपणाने सोडवीत असे. एकदा मी त्याचा स्वयंपाक पाहिला. चूल पेटवून त्याने त्यावर ऍल्युमिनमचे एक पातेले ठेवले नि त्यात निम्मे पातेले पाणी ओतले. त्या पाण्याला उकळी आल्यावर त्याने त्यात मीठ, भरपूर तिखट घातले नि अख्खी वांगी त्यात सोडली. वांगी शिजल्यावर त्याने भाजी झाल्याची जाहीर केले.

पुढे नंतर दुर्गा भागवतांचे बिनतेलाच्या फोडणीबद्दलचे लेखन वाचले. पण हा बिनफोडणीचा स्वयंपाक एकमेवाद्वितिय. मी एकच घास खाण्याच्या प्रयत्न केल्यावर जो ठसका बसला...

माझे काम गरजेप्रमाणे वाळू, विटा वा सनला (सिमेंटला एक अत्यंत फडतूस पर्याय; सिमेंट मिळण्यासाठी तपश्चर्या करावी लागण्याचे ते दिवस होते. त्या तपश्चर्येला 'ऑप्शन' देऊ पाहणाऱ्या अंतुलेंची नुकतीच गच्छंती झाली होती) आणून देणे आणि जे होते आहे ते आपल्याला नीट कळते आहे असा आव आणणे एवढेच होते. पहिल्या कामासाठी बैलगाडी (टेम्पो वा तत्सम वाहन परवडण्यासारखे नव्हते, आणि बैलगाड्या सहजी उपलब्ध असत) आणि दुसऱ्या कामासाठी माझी अभिनयाची आवड (तोवर दोन नाटकांतून कामे केली होती) कामी आली.


गांवकहाणी

तेव्हांही गांवभाग आणि स्टेशनभाग असे दोन भाग होते. यांत अनेक गंमती दडलेल्या होत्या.

पहिली गंमत म्हणजे मूळ गांवात असलेल्या स्टेशनाचे नांव घोरावाडी. आणि गांवापासून मुंबईच्या दिशेला तीनेक किमी दूर स्टेशनला नांव गांवाचे - तळेगांव. पुढची गंमत म्हणजे तळेगांवातल्या मूळ घराण्यांपैकी एक म्हणजे भेगडे. पण तळेगांवची सरदारी दाभाडे घराण्याला गेल्याने या भेगडेंनी 'आयडेंटिटी' साठी झगडतांना बहुतेक ब्रिटिश रेल्वे अधिकाऱ्यांशी संधान साधून आधीच्या स्टेशनला आपले नांव देऊन घेतले. पण ते झाले 'भेगडेवाडी' ऐवजी 'बेगडेवाडी'. अर्थात 'खडकी'च्या 'किरकी'पुढे हे काहीच नव्हे. त्यापुढची गंमत म्हणजे 'बेगडेवाडी'च्या फलाटतक्त्यावर वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत मूळ नांव होते ते 'शेलारवाडी'. म्हणजे कुणी शेलारमंडळी देखील 'आयडेंटिटी' साठी जागृत होती. आणि त्यांनी वरपर्यंत जाण्याचा खर्च करण्यापेक्षा फलाटतक्ता रंगवणाऱ्याचा (आणि स्टेशनमास्तरचा) खर्च उचलला असावा. आता तार्किकदृष्ट्या पाहिले तर घोरावाडी हे नांव बेगडेवाडी (शेलारवाडी) या स्टेशनला द्यायला हवे होते, कारण ते स्टेशन घोरवडेश्वरच्या पायथ्याशी आहे. आणि ते नांव घोरवाडी - घोरवडेश्वरची घोरवाडी - हवे. अजून तळेगांवातली जुनी माणसे घोरावाडीला घोरवाडीच म्हणतात.

महिन्याभरात दोन खोल्यांचे घर तयार झाले. 'घर पहावे बांधून' का म्हणतात ते नीट कळाले.

मग मी शिक्षणासाठी महाराष्ट्र सोडून दूर गेलो. वर्षभराने विचार बदलून परत पुण्याला आलो तोवर दोन्ही घरे (आमचे नि काकांचे) बांधकामाच्या वेगवेगळ्या स्थितींत पोहोचली होती. तोवर काका आऊटहाऊसमध्ये रहायला आले होते नि देखरेख करीत होते.

पस्तीसेक वर्षांपूर्वी आई-वडील तळेगांवला स्थायिक झाले. अशा रीतीने अखेर आमच्या घराण्याची थोरली पाती तळेगांवकर झाली (वडील सगळ्यांत थोरले). मी तीनेक वर्षांपूर्वीपर्यंत पुणेकरच होतो.

पण माझे तळेगांवला 'राहणे' असे त्याआधीच तुकड्या-तुकड्यांत सुरू झाले होते. सुरुवातीला काकाच्या दोन खोल्यांच्या आऊटहाऊसमध्ये. मग घरे बांधून झाल्यावर.


गोनीदा

त्यातल्या पहिल्या राहण्यात माझी गोनीदांशी प्रत्यक्ष ओळख झाली. त्याआधी मी त्यांच्याशी थोडीशी पत्रमैत्री केली होती. मग एकदा त्यांच्यासमोर उभा राहून आणि त्यांनी तोवर पाठवलेली तीन पत्रे (कार्डे) हातात धरून 'मीच तो' असे जाहीर केले. गोनीदा तसेही अगदीच साधे होते. प्रत्यक्ष बोलणे हे पत्रमैत्रीचाच पुढला अध्याय असल्यासारखे ते बोलायला लागले. महत्वाचे म्हणजे त्यांचा ग्रंथसंग्रह आणि वस्तूसंग्रह यांच्याशी सलगी करता आली. तेही मनापासून पुस्तके काढून हाती ठेवीत. निकोलाओ मनुचीचे पुस्तक त्यांनी असे हाती ठेवून वाचायला दिल्याचे आठवते. तसेच एकदा त्यांचा पाषाणसंग्रह आणि शस्त्रसंग्रहदेखील फडताळांतून काढून निगुतीने दाखवला होता.

गोनीदा तेव्हा अजून सत्तरीला टेकायचे होते. चांगले हिंडतेफिरते होते. नंतर तब्येत खालावत गेल्यावर ते पुण्याला हलले आणि आमच्या भेटी थांबल्याच. त्यांच्याबरोबर डोंगरकिल्ले पालथे घालायचे जमले नाही.


जा ये (जा जा नि ये ये)

तळेगांवकरांच्या दैनिक व्यवहारांशी बरीचशी निगडित अशी गोष्ट म्हणजे पुण्यापर्यंत दळणवळणाचे साधन. खाजगी वाहने परवडणारी लोकसंख्या आणि खाजगी वाहनांची उपलब्धता या दोन्ही गोष्टी तेव्हां अत्यल्प होत्या. सार्वजनिक वाहनांचे दोन प्रकार. रेल्वे नि बस.

पुणे-लोणावळा लोकल हा रेल्वेचा एक भाग/प्रकार. पण 'लोकल' हा शब्द फसवा होता. विशेषतः मुंबईकरांसाठी. पुणे-लोणावळा लोकल म्हणजे साधी पॅसेंजर रेल्वेगाडी होती. लाकडी फळ्यांची बाके नि वरती सामान ठेवायला आणि/वा झोपायला बर्थ. ही गाडी हळूहळू प्लॅटफॉर्म सोडे. नीट वेग पकडेपर्यंत ड्रायव्हरला पुढल्या स्टेशनसाठी ब्रेक मारणे सुरू करावे लागे. त्यामुळे पुणे-लोणावळा या साठेक किमीच्या प्रवासाला जवळपास दोन तास लागत. तशी मुंबईहून आणलेली एक लोकल होती. तिला आदराने 'युनिट लोकल' असे संबोधले जाई.

काही लोकल या लोणावळ्यापर्यंत जाण्याऐवजी तळेगांवहूनच परत फिरत. त्या तळेगांवमधल्या ऑर्डनन्स डेपोमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या सवलतीसाठी होत्या असे मानले जाई. त्या लोकलच्या वेळांना तळेगांव ते लोणावळा हा प्रवास कुणीच करू इच्छित नाही हे कुठल्या आधारावर ठरवले गेले कुणास ठाऊक. तशीच एक पुणे-देहूरोड लोकलही असे. पण ती लौकरच बंद झाली. पुणे-तळेगांव लोकल अजूनही दिवसाला चार आहेत.

पूर्वी लोकलची गर्दी इतकी माफक असे की ड्रायव्हर नि गार्ड मानवतावादी कनवाळू दृष्टीकोन बाळगून असत. घोरावाडी स्थानकाजवळ दुचाकी लावून पुण्याला जायचे असेल तर वाहनतळ रेल्वेरूळ ओलांडून पलिकडे होता. एकदा भावाबरोबर मी लूना दामटीत गेलो तर लोकल फलाटाला लागताना दिसली. आता पलिकडे जाऊन लूना लावून येईपर्यंत लोकल सुटणार हे नक्की होते. तरीही भाऊ म्हणाला "तू ये लूना स्टॅंडवर लावून, मिळेल लोकल". 'आशा अमर असते' या उक्तीला अनुसरून मी लूना लावून पळत आलो नि लोकल मिळाली. मग भावाने 'अमर आशा' उक्तीचा फुगा फोडला. "भाऊ लूना लावून येतोच आहे, जरा थांबा" असे सांगितल्याने गार्डरूपी महात्म्याने लोकल पाऊणेक मिनिटे थांबवली होती.

पुण्याहून तळेगांवला येताना जवळजवळ निम्मी गर्दी चिंचवडला उतरे. उरलेल्यांतली निम्मी देहूरोडला. मग पुढे निवांत.

एकदा गंमत झाली. पॅसेंजररूपी लोकलच्या काळातली चाळीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. रात्री भरत नाट्य मंदिरात 'भावबंधन' पाहून रमतगमत चालत मी शिवाजीनगरला पोचलो नि पहाटे चारची पहिली लोकल पकडली. डब्यात दोनचारच माणसे. मी वरच्या बर्थवर डुलकी मारावी म्हणून लवंडलो. डोळा लागला. जाग आली तो सकाळचे सहा. नि लोकल लोणावळा स्टेशनला उभी. ती परत पुण्याला जाईल तेव्हा उतरू म्हणून बसून राहिलो. परत पेंग आली, तिची डुलकी आणि पुढे झोप झाली. जाग आली तो सकाळचे आठ. लोकल पुणे स्टेशनला उभी. अखेर नऊ वाजता निम्मी झोप लोकलमध्ये वसूल करून घोरावाडीला उतरलो.

घोरावाडी स्टेशनची एक गंमत म्हणजे दोन रेल्वेमार्ग (मुंबईकडे जाणारा नि मुंबईकडून येणारा) हे वेगवेगळ्या पातळीवर आहेत. मुंबईकडे जाणारा मार्ग वरती नि मुंबईकडून येणारा मार्ग खालती. म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाच्या रुळांच्याही खालच्या पातळीवर मुंबईकडून येणाऱ्या मार्गाचा फलाट. त्याखालच्या पातळीला रूळ. त्यामुळे मुंबईकडून येताना फक्त घोरावाडीचा फलाट उजव्या बाजूला येतो. दारात पाय सोडून बसणाऱ्या मंडळींसाठी हे धोकादायक होते. एरवी कुठल्याही प्रवासात फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दारात जाऊन पाय सोडून बसणे हा हवा खाण्याचा निवांत मार्ग होता. घोरावाडीच्या फलाटाने काही तंगड्या तुटल्याची वदंता होती.

लोकलच्या वेळा हेही एक वेगळेच प्रकरण होते. मुंबईकराला स्वप्नातही कळू शकणार नाही असे हे अतर्क्य वेळापत्रक आले कुठून?

तर रेल्वे खाते आपल्या सोयीने आणि सवडीने लोकल सोडेल. लोकांनी आपापल्या कामांच्या वेळा त्याप्रमाणे जुळवून घ्याव्यात असा साधा मामला होता. अजूनही तसाच आहे. रविवारचे निमित्त साधून 'मेगाब्लॉक' जाहीर करणे हा रेल्वेखात्याचा आवडता खेळ. 'पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी' असे त्याचे कारण दिले जाते. फक्त लोकल गाड्याच देखभाल-दुरुस्तीत अडथळा आणतात, बाकीच्या पॅसेंजर/एक्स्प्रेस/मालगाड्या रेल्वेमार्गाला तोशीस न देता धर्मराजाच्या रथाप्रमाणे तरंगत जातात हे तर्कशास्त्र पुणे-लोणावळा टप्प्यातले सर्व प्रवासी बिनतक्रार मान्य करतात.

रस्ते प्रवासाला अडीच पर्याय. पीमटी (पुणे म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट - पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत) आणि पीसीएमटी (पिंपरी चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत) असे दोन आणि काही निवडक गावांसाठी एसटी बसेस हा अर्धा. त्यातल्या देहूगांवच्या एस्टीमधून मी बऱ्याचदा प्रवास केला आहे. संध्याकाळी पाच नि रात्री नऊ अशा दोन बसेस शिवाजीनगर बस स्थानकामधून सुटत. नाशिकफाटा-भोसरी-मोशी-चिखली-देहू असा मार्ग. एक ते दीड तास लागे. तशाच एस्टी बसेस काळे कॉलनी, डुडुळगांव, पवनानगर, कामशेट अशा गावांसाठी सुटत (किमान शिवाजीनगर एस्टी स्टॅंडच्या फलाटांवर ती नावे होती).

पीमटी बसेस मनपाहून सुटत. दिवसाला चौदा-पंधरा, म्हणजे साधारण तासाला एक. आणि पीसीएमटीच्या बसेस पुणे स्टेशनजवळच्या साधू वासवानी चौकातून सुटत. त्या दर अर्ध्या तासाला एक म्हणजे दिवसाला अठ्ठावीस-तीस. त्या डबल डेकर असत आणि तळेगांवला जायला नीट दीड-पावणेदोन तास घेत. पण घाई नसेल तर पावसाळ्याच्या दिवसांत वरच्या डेकवर सर्वात पुढल्या बाकावर बसून शेंगा खात नि पुस्तक वाचीत तळेगांवपर्यंत जाणे हे एक सुंदर पर्यटन होई.

पीएमटीच्या आणि पीसीएमटीच्या बसेसचे जाळे तेव्हा चांगलेच पसरलेले होते. मग त्या विस्ताराला नख लावण्याचे सूत्रबद्ध प्रयत्न सुरू झाले आणि यशस्वीही झाले. मध्ये दोन्हींचे एकत्रीकरण करून पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था करण्यात आली. त्यांनी तत्परतेने पुणे-तळेगांव बहुतेक बसेस बंद करून टाकल्या.

आता दिवसातून काही तळेगांव कात्रज बसेस उरल्या आहेत. त्यातल्या काही पुण्यात न शिरता बायपासने थेट कात्रज गाठतात. काही बाणेर/पाषाण/कोथरूडला आत शिरतात. ही सगळी सांगोवांगीची माहिती. पीएमपीएमलने प्रवास करण्याची हिंमत आता उरलेली नाही.

त्यातल्यात्यात अजूनही वेळ गांठता आली तर लोकलचा पर्यायच ठीक आहे. दोनतीन लोकल पुणे स्टेशनऐवजी शिवाजीनगरपर्यंतच जाऊन परततात. त्यामुळे शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी-डेक्कन या परिसरात काम असेल तर ते सोयीचे पडते. आणि फर्स्ट क्लासचे तिकीट काढले (सेकंड क्लास चे दहा रुपये, फर्स्ट क्लासचे ऐंशी रुपये) तर कुठल्याही लोकलला बसायला जागा मिळते. आणि तशीही सेकंड क्लासमधली गर्दी ही कुठल्याही मुंबईकराला तुच्छतेने हसायला भाग पाडेल. महालक्ष्मीला परेलला घुसून पार्ल्याला उतरणे वा परेलला घुसून मुलुंडला उतरणे ही परीक्षा ज्यांनी दिली आहे त्यांना पुणे-लोणावळा लोकलच्या 'गर्दी'तून प्रवास करणे हा शुद्ध अपमान वाटेल.


गांवातल्या गांवात अर्थात राष्ट्रभाषेत 'अंदरूनी यातायात'

गांव म्हणून तळेगांव तसे छोटेखानी होते. आता जरा मध्यमखानी झाले आहे. गांव माफक ते मध्यम चढ-उतारांनी भरलेले. मूळ गांवभागात हिंडायला दोन पाय बहुधा पुरेसे पडतात. आणि बाजारपेठेतल्या गल्लीबोळांतून चारचाकी नेणे तसेही अगदीच धाडसी ठरते. गांवातून स्टेशनभागात जायचे असेल, दमणूक झाली असेल वा सामानाची/माणसांची ने-आण करायची असेल तर स्वयंचलित दुचाकी पुरी पडते. चारचाकी अगदीच मोठे सामान वा जास्ती माणसे असतील तर. तळेगांवात अद्याप वाहतूक सिग्नल नाही. गर्दीच्या वेळेला स्टेशन चौकात पोलिस उभे राहून नियंत्रणाचा प्रयत्न करतात. तसेच वन-वे वा नो-पार्किंग या गोष्टींना इथे कुणी मोजीत नाही. एवढेच कशाला, तळेगांवातले रस्ते एकमेकांना रक्तवाहिन्यांसारख्या अनेकानेक गुंतागुंतीच्या फाट्यांनी जोडले आहेत. त्यामुळे काही कार्य असले - घरचे, पक्षाचे वा धर्माचे - तर सरळ कार्यस्थळासमोर मांडव घातला जातो. वाहतूक पाण्यासारखी आपली वाट शोधते.

स्टेशनभाग बराच विस्तारला आहे. हायवे (स्वराजनगरी), कातवी, आंबी, वराळे, माळवाडी असा अर्धगोलही आता स्टेशनभागातच मोडते. तिथे वाहनावाचून पर्याय नाही. हे सगळे सांगोवांगी. मी पहिल्यापासून गांवभागातला असल्याने स्टेशनभागात आजही जाणे अगदीच कामानिमित्त महिन्यातून चारदोन वेळेसच होते. गांवभागही तसा विस्तारला आहे, पण तो हायवेपर्यंतच. पूर्वी मारुती मंदिर ही गांवभागाची वेस होती (पीसीएमटीच्या डबल डेकर तिथपर्यंतच येत). आता मारुतीमंदिर ते हायवे या किलोमीटरभरात आणि हायवेच्या बाजूबाजूने एकीकडे सोमाटणे फाट्याच्या खिंडीपर्यंत आणि दुसरीकडे पार्श्व-प्रज्ञालयापर्यंत अशी दीडेक किलोमीटर वस्ती वाढली आहे.


रविवारचा बाजार

कुठल्याही तालुक्याच्या वा तत्सम गांवी शेजारपाजारच्या खेड्यांतून लोक गोळा होऊन जो आठवडी बाजार भरतो तसाच तळेगांवातही. आणि तळेगांव हे 'तत्सम' मध्ये मोडते, कारण तालुक्याचे गांव आहे वडगांव (वडगांव मावळ). ऐतिहासिक काळात वडगांव प्रसिद्ध लढाईमुळे. पहिली इंग्रज-मराठा लढाई. ज्यात महादजी शिंद्यांनी इंग्रजांचा पराभव केला, आणि इंग्रजी सैन्यातला शूरवीर कॅप्टन जेम्स स्टुअर्ट मराठी भाषेला एक विशेषनाम देऊन गेला - इष्टुर फाकडा - ती लढाई.

पण नंतर ऑर्डनन्स डेपो नि हॉस्पिटल या दोन कारणांनी तळेगांव पुढे निघाले. आज वडगांव तळेगांवच्या तुलनेत निम्मे सोडाच, पावही जेमतेम भरेल.

तळेगांवचा रविवारचा बाजार मी चाळीसेक वर्षे पाहत आलो आहे. फळे, भाज्या, मिठाई, तळणीचे पदार्थ, कपडे, भांडी, सुकी मासळी... सामान्य माणूस जे जे वांछील ते ते तिथे मिळे. गांवभागातल्या मुळातल्या अरुंद गल्लीबोळांत हा बाजार बसला की मोठी बहार होई. माणसांची तुंबळ गर्दी, रेटारेटी, गलबला...

एकदा मी चुलतबहिणीबरोबर बाजाराला गेलो. मला इच्छा नव्हती, पण मालवाहू हमाल म्हणून तिला दादा पाहिजे होता. ती तशी किडमिडीतच होती (आणि आहे) म्हणून मी उपकार करायला तयार झालो. पण दोन हातात पिशव्या धरधरून रग लागली. आणि हिची खरेदी संपेना. त्यात तीनदा चुकामूकही झाली. अखेर तिच्या मनासारखी खरेदी झाल्यावर आम्ही परत फिरलो. गर्दीतून वाट काढीत किनाऱ्याला लागलो नि मी रागाने तिच्या कानात ओरडलो, "तुझं नाक कापून वेशीला टांगलं पाहिजे". ती खरंच नाक कापल्यासारखी किंचाळली. मला कळेना. भावाबहिणीचे प्रेम अशा कोमल पद्धतीने व्यक्त करणे हीच आमची पद्धत. नीट पाहिल्यावर कळाले की गर्दीतून वाट काढून किनाऱ्याला लागताना परत चुकामूक झाली होती नि मी दुसऱ्याच एका किडमिडीत मुलीबरोबर चालत होतो. अनोळखी पुरुष नाक कापायच्या गोष्टी करतोय म्हटल्यावर जी प्राणभयाने (नाकभयाने?) किंकाळली. मागोमाग बहीणही आली नि विषय मिटला.

बाकी बाजार करण्यासाठी आलेले नमुने मनोरंजक असत.

पहिल्या गटातले लोक 'अर्जुन-मत्स्य' न्यायाने 'एकच लक्ष्य - भाजी घेणे' असा नेम धरून आलेले असत. एकदा मनात योजलेली भाजी दिसली की ती भाजी आणि ते यांच्या मध्ये असलेली तुच्छ माणसे त्यांना दिसतच नसत. अडथळ्यांना ढकलून बाजूला करीत ते आपले गंतव्य स्थान गाठीत. आणि भाजी आठवड्याभराची घ्यायची असल्याने हा प्रयोग अनेक वेळेस होई. त्यात एक सौदा पूर्ण होण्याआधीच दुसरी योजित भाजी दिसली की त्रेधा उडे. एकदा एका अर्जुनाने पाऊण किलो गवार घेण्यासाठी आपली पिशवी (प्लास्टिक पिशव्या यायच्या होत्या) पसरली आणि दुसरीकडे सुरण दिसल्यादिसल्या पिशवी मागे घेऊन तिकडे प्रस्थान ठेवले. भाजीवाला तागडीतून गवार ओतायच्या 'आता माघार नाही' या स्थितीला पोहोचला होता. त्याने तागडी रिकामी केली ती खालच्या घेवड्याच्या ढिगावर. अर्जुन तोवर सुरणाला टिचक्या मारून पहात होता. (बाय द वे, टिचक्या मारून फणस किती पिकला आहे वा नारळ चांगला आहे की नाही हे कळते. पण सुरण? कदाचित ही गुप्त विद्या असेल. आणि कोबी कोवळा की निबर हे ठोसे मारून पहात असतील.)

दुसऱ्या गटात दुसऱ्या टोकाचे - संभ्रमित. ते एका भाजीकडे चार पावले चालत, अचानक थांबत, काही सेकंद वा मिनिटांनी परत मूळ दिशेला वा परत माघारी वा तिसऱ्याच दिशेला चालू पडत. मग आपण इतर कुणाच्या मार्गात आहोत की काय हे पाहण्याची त्यांना सवड नसे. एकदा असा माझ्या पुढ्यात ठीकठाक चाललेला गृहस्थ अचानक थांबला. मी त्याला आपटलो. गृहस्थ १८० डिग्री वळाला. त्याने उन्हासाठी घातलेल्या कडक हॅटची कडा (गृहस्थ माझ्याहून बुटका होता) लागून माझे नाक रक्ताळले. पण त्याकडे त्याचे लक्ष नव्हते. "बरोबर, मेथी एक जुडी" असे स्वतःशीच पुटपुटून तो मला ढकलून सुसाटला.

तिसऱ्या गटातली मंडळी 'मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे' हे तत्व घट्ट धरून असत. भाजी घेण्याबरोबरच दिसणाऱ्या सर्व परिचितांशी मनमोकळे बोलणे हेही तितकेच महत्वाचे आहे हे त्यांना नीट उमगलेले असे. आणि हे बोलणे कुठूनही सुरू होऊन आधीच्या बोलण्यात घुसे. त्यामुळे "ढोबळी कशी दिली? ताजी नाही दिसत फार. अहो प्रकाशराव, काय मुलीचा साखरपुडा झाला का? अर्धा किलोच कर. कुठे रोह्याला ना? गरम फार होत असेले तिथे. आपल्याला तळेगांवच्या थंड हवेची सवय. आणि बटाटे एक किलो. कोथिंबीर... अहो रोह्याचे पापड प्रसिद्ध ना पोह्याचे?... एक जुडी" अशी मिसळ होऊन जाई. आणि या मिसळकर्त्यांना खणखणीत आवाजाची देणगी 'बाय डिफॉल्ट' लाभलेली असे. एकदाच बसक्या आवाजाचा एक अपवाद ऐकला. पण त्या बसक्या आवाजाने आपल्या त्रुटीवर रेकून बोलत जी मात केली त्यामुळे डोके मात्र पिकले.

दुसऱ्या आणि तिसऱ्याचे मिश्रण झाले तर अजूनच बहार उडे.

पण हे सगळे पुरुष मंडळींबद्दल. बायका परिभ्रमणाची पुढची कक्षा गाठीत. 

एका गटाची खात्री असे की घासाघीस केल्याखेरीज भाजी घेतली तर तत्काळ नरकात रवानगी होईल. एकवेळ भाजी घेणार नाही, पण घासाघीस केल्याशिवाय सोडणार नाही या बाण्याने या लढवय्या बाजारात घुसत. तुम्हांला जिथे भाजी घ्यायची असेल तिथे तुमच्यापुढे जर यातली वीरांगना असेल तर संपले. एकदा घासाघीस यशस्वी झाली नसल्याने माघार घेताना त्यांच्यापैकी एकीने "एव्हढी महाग मेथी, आम्हांला नाही परवडत. कष्टाचा पैसा आहे आमचा, हरामाचा नव्हे" अशी फैर झाडली. भाजीवाल्याचे माहीत नाही, पण मेथी जुडी खरेदी करून पिशवीत टाकलेला मी हरामाचा पैसा कमावल्याबद्दल ओशाळलो.

दुसरा गट लेकुरवाळ्या मातांचा. भाजी घेण्याबरोबरच सोबतचे कार्टे/कार्टी संभाळणे हा त्यांचा उद्योग असे. 'भाजी घेण्याबरोबर' यात बदल होत 'भाजी घेण्याऐवजी' ही पातळी गाठली की त्या हार मानीत आणि भाजीखरेदी अध्याय समाप्त करीत. त्या माऊल्या बिचाऱ्या गांजलेल्या असत. पण त्यांच्याबद्दल कणव वाटण्याआधी त्या कार्ट्या/कार्टीपासून सावध राहणे गरजेचे असे. मी एकदा नीट उकिडवा बसून पुढे वाकून तोंडली निवडून घेत होतो तर एका कार्टीने मला पुढे ढकलले होते. तोंडली ठीक होती, पण त्याशेजारी मिरच्यांचा वाटा होता. थोडक्यात वाचलो.

तिसरा ज्येष्ठांचा वयोगट. यातल्या बऱ्याच आत्या-मावश्यांना दिसणे, ऐकणे, वाकणे यातील एक वा अनेक गोष्टींत अडचण असे. मदत करायला जावे तर अडचणीत सापडण्याचे प्रसंग येत. एकदा एका मावशीने मला "बाळा दोन टॉमेटो दे रे निवडून खालचे" अशी साद घातली. तिशीत पोचलेल्या मला "बाळ" ऐकायची सवय उरली नव्हती म्हणून मी लक्ष दिले नाही. पण मावशी हार मानणारी नव्हती. तिने तिच्या पिशवीतून शेवग्याच्या शेंगा काढून मला ढोसले. मी मुकाट टॉमेटो निवडून दिले. दोन्ही तिच्या पसंतीस आले नाहीत. "कोशिंबीर करायचीय रे बाळा, पिठले नव्हे" (अर्थ: मी निवडलेले टॉमेटो अति पिकलेले आहेत). मी परत दोन निवडले तर "टॉमेटो की धोंडे?" (अर्थ: मी निवडलेले टॉमेटो फार कच्चे आहेत). खरे सांगतो, मी निवडलेले चारही टॉमेटो हिरवे-लालपणात इतके जवळजवळ होते की त्यांची प्रतवारी करायला स्पेक्ट्रोमीटरच वापरावा लागला असता. पण संधिवाताने कंबर धरलेल्या मावशीचे डोळे स्पेक्ट्रोमीटरहून तेज होते. शेवटी भाजीविक्रेत्याने माझी सुटका केली, पण जाता जाता एक टोला मारूनच. "जाऊ द्या मावशी, मी देतो नीट. ही आजकालची मुलं, यांना भाजीतलं काय कळतंय?" मी आपण 'आजकालच्या' पासून 'परवातेरवाचे' कधी होऊ याची चिंता करीत परतलो.

पहिल्या आणि तिसऱ्या गटाचे मिश्रण झाले तर संपलेच.

परिभ्रमणाची त्यापुढची कक्षा गाठण्यासाठी निसर्ग स्वतःच मैदानात उतरे. मावळातला पाऊस तसा दमदार पण चेष्टेखोर. कोंकणातल्यासारखी झड लागून राहणे आणि पुण्यातल्यासारखा चार थेंब इकडे पाच थेंब तिकडे असा थिल्लरपणा (उपमा किमान तीस वर्षे जुन्या आहेत; सध्या कुठेही, कसाही आणि कितीही पाऊस पडतो वा पडत नाही) यांच्या मध्ये कुठेही बागडणारा. त्याचा मूळ उद्देश लोकांची फजिती करणे हा. निसर्गचक्र पाळून शेतीमातीला, प्राण्यापक्ष्यांना पाणी पुरवणे हे दुय्यम. छत्री उघडल्यावर थांबणे, छत्री उघडायला उशीर केल्यास ढगफुटीसारखा कोसळणे, ही दोन्ही अस्त्रे कुण्या चलाख प्राण्याने अपयशी ठरवली तर अचानक सोसाट्याचा झोत सोडून त्याची छत्रीच उलटीपालटी करणे, त्याच वेळेस त्याच ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे डबके आणि जोसात जाणारा विटांचा ट्रक यांची नेमकी योजना करणे... देव, स्त्री आणि बिल गेट्स यांच्या मनाचा थांग लागेल एकादवेळी, मावळातला पाऊस कळणे अशक्य.

कोविडकाळात इतर बदल झाले ते झाले, रविवारच्या बाजाराचे प्रस्थ पारच उणावले. रोजगारावर कुऱ्हाड पडलेल्या बहुतेकांनी भाजी विकणे हा अल्पभांडवली धंदा सुरू केला. परिणामी, दर अर्ध्या किलोमीटरला एक छोटी मंडई वसली. आधी रविवारखेरीज भाजी घ्यायची तर थेट तळेगांव स्टेशनजवळ एक बाजार होता तिथे जावे लागायचे. आता ती गरज उरली नाही. आणि रोज ताजी भाजी मिळत असल्याने रविवारपर्यंत थांबून राहण्याचीही नाही. अजून बाजार भरतो, पण त्यात पहिली मजा नाही.


मावळी क्रिकेट

क्रिकेटचे वेड भारतभर आहे. छत्तीसेक वर्षे पुण्यात काढून मी अखेरचा पडाव म्हणून तळेगांवला परतल्यावर मला क्रिकेटचा एक मावळी थाट बघायला मिळाला.

सध्या जिथे राहतो आहे तिथे घरामागे एक दहा-बारा एकरांची मोकळी पट्टी आहे. पूर्वी तिथे झुडपे नि रानच होते. तीन वर्षांपूर्वी कुण्या एकाने तिथे जेसीबी घालून सपाट मैदान करून टाकले. एक क्रिकेटची म्हणून खेळपट्टीही करून घेतली. फक्त ती इतकी एका कोपऱ्यात आहे डीप कव्हरच्या बाऊंडरीपेक्षा डीप मिडविकेटची बाऊंडरी तिप्पट लांब आहे.

गेल्या वर्षीचा पावसाळा संपल्यापासून तिथे तिशी-पस्तिशीची काही उत्साही मंडळी रोज तीनचार चारचाक्या, साताठ दुचाक्या घेऊन सकाळी दिवस उजाडता जमतात. चांगली आरडाओरडा करीत जमतात. थंडी बऱ्यापैकी असतानाही (तापमान १२ डिग्री सेंटिग्रेड) सकाळी सात वाजताच ठाकठोक नि आरडाओरडा सुरू होई.

एकदा बऱ्याचजणांना बहुधा सुटी असावी. कारण दहा वाजून गेले तरी खेळ चालूच होता. गुरुवारचा दिवस होता. विद्युत मंडळाकडून मला प्रेमसंदेश आला होता की काही मोठ्या कामानिमित्त सकाळी दहापासून सहा तास वीजपुरवठा खंडित असणार आहे, तसदीबद्दल क्षमस्व. कंप्यूटरवर काम करून करून मीही कंटाळलो होतो. त्यामुळे इन्व्हर्टर आहे याकडे दुर्लक्ष करून मी स्वतःलाच सुट्टी जाहीर केली आणि पश्चिमेकडच्या सज्जात ऊन खात बसलो. आरडाओरडा चालूच होता म्हणताना लक्ष देऊन पहायला लागलो. पूर्ण अकराजण (एक बॉलर, एक विकेटकीपर आणि नऊ फिल्डर्स) दिसत होते. नॉन स्ट्रायकर एंडला एक बॅट्समन आणि एक अंपायर होता. पण बसलेली मंडळी (दुसऱ्या टीममधली) नऊ दिसत नव्हती, तीनचारच होती. ही काय भानगड म्हणून लक्ष देऊन बघायला लागलो. अंपायर ओव्हर व्यवस्थित मोजीत होता, वाईड/नो बॉल/आऊट यथायोग्य जाहीर करीत होता. बॅट्समन हाणामारी करीत होता. बाऊंडऱ्या मारीत होता आणि पळूनही रन काढीत होता. स्कोअर मधून मधून ओरडून जाहीर करण्यात येत होता. मग बॅट्समन आऊट झाला. बसलेल्यांपैकी एकजण उठला नि इनिंग पुढे गेली.

मध्येच लाँग-ऑन च्या क्षेत्ररक्षकाने बाऊंडरीपार गेलेला चेंडू पकडून परत फेकला तो अंपायरनेच झेलला नि खिशात ठेवला. मग लक्षात आले की तोवर अजून एक बॉल टाकूनही झाला होता. ही काय भानगड म्हणून नीट पाहिले तर बाऊंडरी मारल्यावर आणि जाहीर झाल्यावर बॉल परत यायला जो वेळ लागतो तो वाचण्यासाठी दोन चेंडूंची योजना होती.

अजून एक बॅट्समन आऊट झाल्यावर चक्क अंपायरनेच बॅट्समनकडे धाव घेतली नि बॅट ताब्यात घेऊन फलंदाजीचा स्टान्स घेतला. मिड-ऑफचा फिल्डर पळत पळत गेला नि अंपायर झाला.

ही संघभावना स्पृहणीय होती. लहानपणी नंबर पाडून क्रिकेट खेळायचो तसे. फक्त इथे बॅटिंगसारखाच अंपायरिंगचाही नंबर होता. पण मग ओरडून जाहीर होणारे स्कोअर कुणाचे? कुतूहल शमेना.

मग त्यांचा खेळ संपायच्या बेताला खाली गेलो नि चौकशी केली. तर कळाले ते असे की नेहमी ते अकरा-अकराच्या टीमनेच खेळत. पण आज सगळ्यांना सुटी नव्हती, म्हणून नंबर पाडून खेळले. आणि स्कोअरचे गणित असे, की झालेला स्कोअर त्या जोडीचा म्हणून गणला जाई आणि प्रत्येकाला त्यातील निम्म्या धावा मिळत. मग एकाच फलंदाजाने बाऊंडऱ्या मारून धावा कुटल्या तरी त्यातल्या निम्म्या दुसऱ्याला मिळत. प्रत्येकजण आपापल्या धावा लक्षात ठेवी आणि शेवटी कीर्दखतावणीत त्या धावा नोंदल्या जात. मी गेलो तेव्हा ते नोंदकामच चालू होते.

क्रिकेट हा सांघिक खेळ हे माहीत होते. त्यात समाजवादी लोकशाही मिसळून असे कॉकटेल होते हे माहीत नव्हते.