तळेगांव पुराण - २

तळेगांवचा पाऊस

तळेगांव हे पुणे आणि लोणावळा यांच्या साधारण मध्यावर. इथला पाऊस पुण्याहून जास्ती नि लोणावळ्याहून कमी असा असे. गेल्या दीडदोन दशकांत हे प्रमाण पार उलटेसुलटे झाले आहे.

आमचे घर होते त्या कॉलनीत सुरुवातीला जेमतेम दोन-तीन प्लॉटवर घरे होती. 'बंगला' या शब्दाला एक श्रीमंती वास येतो. ही साधीसोपी एकमजली घरे होती. दोन, तीन, फार तर चार खोल्यांची. भोवती आवार. आणि कॉलनीतल्या कॉलनीत भरपूर चढ-उतार. कॉलनीतल्या कॉलनीतच कशाला, आमच्याच प्लॉटमध्ये पुढली बाजू मागल्या बाजूपेक्षा चोख दहा फूट उंच होती. दोन ट्रक मुरूम आणून मागे रिचवल्यावर तो फरक सहा फुटांवर आला. अजूनही मागल्या बाजूला उभे राहिले तर घराचा पाया डोक्यापाशी येतो.

कॉलनीतली चारदोन घरे ओलांडून नजर वर उचलली की हमरस्ता. नजर डावीकडे वळवली की अजून थोड्या उंचावर पुणे-मुंबई महामार्ग (त्यावेळेस टोलवे कल्पनेतही नव्हता). आणि महामार्गाच्या पलिकडे डोके उंचावून बघणारा चौराईचा डोंगर. आता त्या डोंगराच्या पलिकडून टोलवे आहे.

चौराईच्या डोंगराची एक धार उतरत पूर्वेला सोमाटण्यापर्यंत येते. तिच्या टोकाला महामार्गाच्या उत्तर बाजूला एक टेकाड आहे, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या पाठीशी. नॅशनल हेवी ही त्याकाळी मोठी कंपनी होती. साखर कारखान्यांना लागणारी यंत्रसामुग्री पुरवणारी. यथावकाश तिची विधुळवाट लावण्यात आली. आता 'भिंत खचली कलथून खांब गेला' अशी तिची खिन्न अवस्था आहे. सांगाडा दिसतो, छप्पर उडाले आहे.

घराच्या गच्चीतून साधारण आग्नेयेला नॅशनल हेवीचा डोंगर, मग उजवीकडे नजर फिरवत गेले की दक्षिणेला नि नैऋत्येला चौराईची आडवी धार, नैऋत्य-पश्चिमेला 'सीआरपीएफ'चा डोंगर (त्याच्या पायथ्याला एक सीआरपीएफची बटालिअन आहे), वायव्येला हरणेश्वर टेकडी, ईशान्य-पूर्वेला भंडारा डोंगर, पूर्व-आग्नेयेला घोरवडेश्वर अशी डोंगर-टेकड्यांची मांदियाळी आहे. फक्त आता एवढे सगळे दिसत नाही. घराभोवती उंच इमारतींची मांदियाळी आहे.

मे अखेरीस वातावरण थंड व्हायला सुरुवात होत असे. जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात मान्सून प्रामाणिकपणे हजर होई. सभोवताली सगळे मोकळे असल्याने पश्चिमेकडून येणारे ढग अगदी व्यवस्थित बघता येत. त्यातला एखादा वडगांवपासूनच सिंचन करीत येई, एकादा तळेगांववर आल्यावर धार धरी, बाकीचे देहूरोड-चिंचवडकडे मार्गक्रमण चालू ठेवीत.

एकदा फारच बहार आली. वाचनालयातून र वा दिघ्यांची ही कादंबरी घेऊन आलो होतो. 'पड रे पाण्या' की 'पाणकळा' ते आठवत नाही. दुपारी चार साडेचारला ऊन अतिमवाळ झाले नि पश्चिमेकडून येणारे ढगांचे थवे दिसू लागले. कादंबरीचा नायक हवामानशास्त्रज्ञ आहे. त्याला ढग पाहून त्यातले कुठले पावसाचे नि कुठले बिनपावसाचे हे कळते. पुस्तकाच्या 'लीफ'वर चक्क ढगांची चित्रे दिली आहेत - कृष्णजलमेघ, राशीजलमेघ इ.

गच्चीमध्ये एक कॅंपकॉट होती. नायलॉनच्या दोन-इंची पट्ट्यांनी विणलेली. उन्हाळ्यात ती नको नको होई पण पावसाळा-थंडीत आरामशीर असे. ती कॉट पूर्वपश्चिम केली, डोक्याखाली उशी घेतली नि पश्चिमेला पाय केले. आता पुस्तकावरून वर नजर नेली की ढग दिसू लागले. त्यातले कुठले पाण्याचे याचा अंदाज बांधत असताना झड सुरू झाली नि खाली पळावे लागले.

तळेगांवच्या लागून राहणाऱ्या पावसाची अजून एक रम्य आठवण एका रविवारची आहे. सकाळपासूनच 'ब्लॅक आऊट' झाल्यासारखे अंधारून आले होते - बाजाराला जाताना टॉर्च घेऊन जावे की काय असे वाटण्याइतके. बाजारात छान कोवळ्या भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या. येऊन त्या मीठ घालून उकडल्या, ब्रू कॉफी पावडर नि साखर फेटून फेसाळ कॉफी केली, आणि आ ना पेडणेकरांचे 'शेलूक' वाचता वाचता शेंगा-कॉफी असा एक हप्ता रिचवला. मग सोलापुरी चादरीत गुरफटून (गारवा थंडीत परावर्तित होऊ लागला होता) मांजरासारखा झोपलो. उठल्यावर परत शेंगा-कॉफी. कॉफी फेटायला चुलतबहिणींना बसवले. थोरल्या दादासाठी एवढे करणे हे बहिणींचे कर्तव्यच होते.

पावसाने आमच्या कॉलनीत मात्र राडेराड होई. एक तर अंतर्गत रस्ते पूर्ण मातीचे होते. त्यात आमच्या प्लॉटपलिकडेच एक ओढा/नाला होता. तो ओलांडून जायला चिखलात रोवलेल्या दगडांवरून डगमगत जावे लागे. ते दगड शेवाळलेले असले की अजूनच मजा. गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्याचे प्रयोग अधूनमधून घडत. हे घरी परत येताना झाले तर ठीक. बाहेर जाताना झाले तर अबाऊट टर्न करून घरी येऊन चिखलमाखली विजार बदलून परत 'तू जपुन टाक पाऊल जरा' घोकत बाहेर.

एकदा विद्यापीठात माझ्यासोबत शिकणाऱ्या एका दाक्षिणात्य मित्राबरोबर त्याच्या कायनेटिक होंडावर आलो. भंडारी हॉस्पिटलपाशी डांबरी रस्ता संपला. मग शेवटच्या शे-सव्वाशे मीटरला मोजून पंधरा मिनिटे लागली. ऍक्सिलरेटर दिला की चाक चिखलात गरगरे. कमी केला तर थबके. मग ऍक्सिलरेटर देताना दुसऱ्याने मागून धक्का देणे आले. पण धक्का देणाराही निसरड्या चिखलात उभा असल्याने त्याचे पायाचे तळवेही स्केटिंगच्या तयारीत असत. स्कूटर भंडारी हॉस्पिटलपाशी लावून चालत जाऊ या प्रस्तावाला मित्राने साफ नकार दिला. नव्या नव्हाळीची आपली स्कूटर नजरेआड होऊ द्यायची नव्हती. 'स्कूटर नजरेआड होणार नाही, कारण घर नि भंडारी हॉस्पिटल याच्यामध्ये शे सव्वाशे मीटर अंतराखेरीज काहीच नाही' हे मान्य करायची त्याची तयारी नव्हती. अखेर पंधरा मिनिटांनी शंभर मीटर (म्हणजे तासाला २.४ किमी) या गतीने पोहोचलो.


अंतर्गत रस्ते नि त्यांची अवस्था

गांवभागातले रस्ते म्हणजे वेगवेगळ्या आळ्यांतून जाणाऱ्या ऐतिहासिक गल्ल्या. अगदी ढोबळमानाने पाहिले तर हायवेकडून उताराच्या रस्त्याने येऊन मारुतीमंदिर चौक. तिथून अजून थोडा उतार नि जिजामाता चौक. तिथून उजवीकडे वळून प्राथमिक आरोग्य केंद्र, गणेश मोफत वाचनालय, शाळा चौक, गणेश मंदिर चौक, घोरवाडी स्टेशन असा जाणारा रस्ता मुख्य म्हणता येईल. मारुती मंदिर चौकातूनच उजवीकडे वळून सरळ गेले तरी शाळा चौक वा गणेश मंदिर चौक इथे जुळता येते.

जिजामाता चौकातून डावीकडे वळून सरळ गेले तर नगरपरिषद, चर्च, बीएसएनएल, एस्टी डेपो करीत स्टेशन चौक. तिथून सरळ तळेगांव रेल्वे स्टेशन (एस्टी स्टॅंडची बाजू), डावीकडे मुंबई महामार्ग नि उजवीकडे चाकण. उजवीकडे वळल्यावर लगेच रेल्वेलाईनवरून जाणारा पूल. तो पूल ओलांडल्या ओलांडल्या डावीकडे वळाले तर तळेगांव स्टेशन (यशवंतनगरची बाजू). चाकण रस्त्याच्या उजवीकडे वतननगर. स्टेशन चौकापासून एकदीड किलोमीटर अंतरावर इंद्रायणी कॉलेज (आचार्य अत्रे हे याच्या संस्थापकांपैकी एक होते. पण त्यांचे नाव म्हणजे केवळ मांडवशोभा), मग रामभाऊ परुळेकर शाळा. इंद्रायणी कॉलेज सुमारे साठ वर्षांपूर्वी सुरू झाले. त्याच्या संस्थापक प्राचार्यांचे (आळतेकर) आत्मवृत्त वाचनीय आहे.

पूर्वी स्टेशन चौकात कल्पनातीत वाहतूक कोंडी होत असे. त्याच्या कारणांबद्दल अनेकानेक विचारधारा होत्या. बहुतेक विचारधारांमध्ये एक राजकीय नेता वा पक्ष 'खल' जाहीर करून त्या कोंडीचे सुलभ विवेचन करण्यात येत असे. मग तळेगांव एमआयडीसी मधून थेट चाकणला कसा रस्ता करण्यात येतो आहे आणि कोण त्यात कोलदांडा घालतो आहे याचे रसभरित वर्णन एक पक्ष करी. दुसरा पक्ष स्टेशन चौकात फ्लायओव्हर बांधायला स्थानिक व्यापाऱ्यांना चिथावून कोण अडथळे आणतो आहे याचे तेवढेच रसभरित वर्णन दुसरा पक्ष करी. तिसरा पक्ष (क्षीण आवाजात) वाहतूक नियंत्रणाबद्दल काही मूलभूत मांडणी करण्याचा प्रयत्न करी.

वतननगर भागातून नगरपरिषदेजवळ (काका हलवाईच्या दुकानासमोर) निघणारा 'अंडरपास' होतो आहे होतो आहे असे बराच काळ गाजत होते. सहासात वर्षांपूर्वी तो अचानक सुरूच झाला. 'हिंदमाता भुयारी मार्ग' हे त्याचे नाव. स्टेशन चौकातली कोंडी बरीचशी कमी झाली. पूर्वीच्या तुलनेत नाहीशी झाली असेही म्हणता येईल.

हे सर्व रस्ते कमीअधिक रुंदीचे असले तरी मुळात डांबरी आहेत. फक्त डांबरीकरण किती शिल्लक आहे याची टक्केवारी दहा ते शंभर या आकड्यांत कुठेतरी घोटाळत असते. सगळे रस्ते चांगले केले तर जनता पटापट गंतव्य स्थानी पोहोचेल आणि फावल्या वेळेत नसते प्रश्न उपस्थित करीत बसेल अशी धास्ती लोकप्रतिनिधी- प्रशासन गॅंगला सतत वाटत असते. त्यामुळे शेदोनशे मीटर चांगला रस्ता असता तर त्यापुढे किमान तेवढ्याच लांबीचा चंद्र-भूपृष्ठ श्रेणीचा रस्ता असावा याकडे ही गॅंग कटाक्षाने लक्ष देते. फार वाईट रस्ता करणे जमले नाही तर सटासट स्पीडब्रेकर पेरते.

वतननगरहून येणाऱ्या हिंदमाता भुयारी मार्गाचेच उदाहरण घ्या. दक्षिणेकडून (नगरपरिषद / काका हलवाई बाजूने) रुंद, गुळगुळीत असा विमानतळावरचा रनवे भासणारा रस्ता. शंभरेक मीटर गेल्यावर तो रस्ता अचानक सडसडीत होतो नि भुयारी मार्गात रूपांतरित होतो. भुयारी मार्ग सुरू झाल्या झाल्या गुडघाभर उंचीचे डिव्हायडर घातले आहेत. भुयारी मार्गात पावसाळ्याशिवायही पाणी साठण्याची सोय आहे. पलिकडे गेल्यावर पन्नासेक मीटर अंतरावर रस्ता एवढा खराब होतो की 'इथे रस्ता संपला' असे समजून एखादा नवशिका मागे वळेल. तरीही निर्लज्जपणे कुणी पुढे जायला धजला तर त्याच्या वाहनाचे शॉक ऍबसॉर्बर आणि पाठीचा कणा यांना लक्षात राहील असा धडा शिकवण्यासाठी पुढला दीडेकशे मीटर रस्ता सज्ज आहे. पुढे एका टी जंक्शनला बऱ्या अवस्थेतला डांबरी रस्ता येतो. त्यावर दोनपाच स्पीडब्रेकर ठेवून दिले आहेत.

या रस्त्याला वतननगरमधल्या संतोषीमाता मंदिराकडून थेट येता येणे अपेक्षित होते. तिथे शेवटी पन्नासेक मीटरचा मातीचा रस्ता दिला आहे, जो भुयारी मार्गातून बाहेर पडणाऱ्या रस्त्याला मिळतो. हा मातीचा रस्ता पावसाळा सुरू होता होता चिखलराड होतो. मग मोटोक्रॉस म्हणजे काय याचीही झलक वाहनचालकांना फुकटात मिळते.

ही गॅंग एकदा दशकभरापूर्वी अचानक जागृत झाली आणि जिजामाता चौक - नगरपरिषद - स्टेशन चौक हा रस्ता रुंद करण्याचा घाट घातला गेला. हा रस्ता तेव्हाही पुरेसा रुंद होता नि आताही पुरेसा रुंद आहे. दोन्ही बाजूला पन्नास वर्षांहून जुनी मोठी झाडे असलेला हा रस्ता. इंग्रजीत 'अव्हेन्यू' या शब्दाचा एक अर्थ दुतर्फा झाडे असलेला रस्ता असा आहे. तसा 'ट्री लाईन्ड अव्हेन्यू'. ही झाडे छाटून वा काटून नवीन रस्ता करण्यामागे केवळ रस्तेबांधणीच्या कंत्राटदाराला, आणि पर्यायाने लो-प्र गॅंगला, होणारे उत्पन्न हा एवढाच हेतू होता. कधी नव्हत इथली सामान्य जनता पेटून उठली आणि तो हेतू हाणून पाडला.

एकूणच कुठले रस्ते कधी सुधारले जातील हे मानवी जीवनाचा अर्थ वा विश्वाची उत्पत्ती या श्रेणीतले कोडे असावे याची पुरेपूर काळजी लो-प्र गॅंग घेत असते. पुण्यात कसे, ३१ मार्चच्या चारदोन दिवस आधी आणि पावसाळा सुरू व्हायच्या चारदोन दिवस आधी रस्ते बांधणीची लगीनघाई सुरू होते तसे इथे काहीही नाही. धोधो पावसातही रस्त्याचे काम निर्विकारपणे सुरू असते, आणि रस्ता असतो एखाद्या कॉलनीतला अंतर्गत. तर कधी भर उन्हाळ्यात डांबरी रस्ता करून त्यावर चालणाऱ्याचे पाय पोळण्याची व्यवस्था केली जाते. एकच फरक म्हणजे काँक्रीटचे रस्ते बांधण्याची गंमत अजून इथल्या लो-प्र गॅंगला समजलेली नाही. एक कारण असू शकेल ते म्हणजे अख्खे गाव उंचसखल अशा चढाच्या रस्त्यांनी भरलेले आहे. त्यामुळे अगदी मुसळधार पाऊस झाला तर फारतर डोळसनाथ मंदिर, डोळसनाथ कॉलनी वा श्रीनगरी अशा ठिकाणी पाणी तुंबू शकते. पण तिथेही अजून मातीचे प्रमाण जाणवण्याइतके असल्याने ते हळूहळू का होईना, झिरपून जाते. आणि पाणी तुंबणार नसेल तर काँक्रीटचे रस्ते बांधण्यात पैसा वाया घालवू नये असे वरून निर्देश असावेत.

ही गॅंग रस्तेच नव्हे तर एकंदरीत कुठलेही बांधकाम कसे गूढ राहील याची पुरेपूर दक्षता घेते.

लिंब फाट्यावरून तळेगांवात येणाऱ्या रस्त्यावर एक उंच कमान उभारण्याचे काम साधारण २०१२ साली सुरू झाले. त्यासाठी महामार्गाला जोडणारा रस्ता वळवून तुकारामनगरच्या चिंचोळ्या गल्ल्यांतून नेण्यात आला. पीएमटीची बस आली तर शेजारून जाण्यासाठी कुत्र्यालाही जागा उरणार नाही अशा रुंदीच्या काही गल्ल्याही त्यात होत्या. मांजरे कशीबशी निसटू शकत. दोनेक वर्षे हे कमानकाम चालले. मग दोन बाजूंना पोकळ खांब नि तीसेक फुटांवर आडवी मोठी खोली असे बांधकाम उभे राहिले. त्या खोलीत बसून वादक सकाळ-संध्याकाळ नगारा/चौघडा वाजवतील असे सांगण्यात आले. पोकळ खांबात लिफ्टची व्यवस्था होईल अशीही अफवा उठवण्यात आली.

गेली आठेक वर्षे ते पोकळ खांब नि वरची खोली तसेच आहे.

कदाचित पाचदहा वर्षांनी तिथून चौराईवर पोहोचणारा रोपवे करणार आहेत अशी अफवा उठवतील. अजून पाचदहा वर्षांनी तिथे मेट्रो स्टेशन होण्याची अफवा उठेल.

मेट्रो निगडीपर्यंत पाच वर्षांत पोहोचणार अशा वल्गना जाहीर झाल्या आहेत. म्हणजे पंधरा वर्षांनी पोहोचेल. मग तळेगांव-वडगांवच्या मंडळींना लालूच दाखवायला मेट्रो कामी येईल.


तळेगांवसाठी येण्याचे मार्ग

चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत तळेगांवला येण्यासाठी तीन मुख्य रस्ते होते - एक पुण्याहून बंगलोर-मुंबई महामार्ग वापरून. दुसरा तोच महामार्ग उलट्या दिशेने वापरून मुंबईहून. तिसरा चाकणहून. मावळातल्या गावांना तळेगांवशी जोडणारे छोटे अंतर्गत रस्ते होते पण त्यात बारमाही वा पक्के असे फारसे नव्हते. पुण्याहून मारुंजी-नेरे-दारुंब्रे-शिरगांव असा रस्ता महामार्गाला सोमाटणे फाट्याला येऊन मिळे. नेरे-चांदखेड-परंदवडी-उर्से असा रस्ता चाकण रस्ता महामार्गाला मिळतो त्याच्या विरुद्ध बाजूने खिंडीतून येऊन मिळे. वगैरे.

साधारण चाळीस वर्षांपूर्वी वेस्टर्ली बायपासचे काम सुरू झाले. आता बंगलोरहून येताना कात्रजपाशी डावीकडे वळून पुणे महापालिकेच्या हद्दीला ईषत् वा धीट स्पर्श करीत थेट देहूरोडच्या पुढे येता येते.

हातात (स्वतःची नव्हे, पण कुणाचीतरी) दुचाकी आल्यावर माझ्या तळेगांव चकरा सुरू झाल्या. तोवर काकांचे आऊटहाऊस राहते होऊन घराचे बांधकाम सुरू झाले होते. शिवाजीनगर-खडकी-दापोडी-पिंपरी-चिंचवड-निगडी-देहूरोड-सोमाटणे फाटा-तळेगांव हाच मार्ग त्यासाठी उपलब्ध होता. त्याला एक ऑप्शन म्हणजे विद्यापीठ-औंध-जगताप डेअरी-डांगे चौक-पदमजी पेपर मिल-चिंचवड गांव-लोकमान्य हॉस्पिटल-मुंबई महामार्ग.

एक गंमत - पिंपरी-चिंचवडची संस्कृती जरी पुण्याहून साफ वेगळी असली तरी तोवर ती एक औद्योगिक वसाहत म्हणूनच प्रसिद्ध होती. पुण्याचा एक भाग असेच पिंपरी-चिंचवड भागाला मानले जाई. लोकमान्य हॉस्पिटलच्या विरुद्ध बाजूला महामार्गावर असलेल्या पोलिस ठाण्यावरती एक मजेदार पाटी होती "पिंपरी पोलिस स्टेशन, चिंचवड, पुणे-१६".

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात वेस्टर्ली बायपासचे काम सुरू झाले. पण देहूरोडपासून भुजबळ वस्ती (हिंजवडीला जाणाऱ्या रस्त्यावरचा ओव्हरब्रिज) पर्यंतच रस्ता झालेला होता. पुढे शेते दिसत. मग १९९४च्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांचे औचित्य/निमित्त साधून तो पुढे वाढवण्यात आला. बायपास पूर्ण होईपर्यंत बराच काळ तो विद्यापीठापासून देहूरोडला येण्यासाठी असाच बायपास होता. बराचसा निर्मनुष्य.

एकदा रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास पुण्याहून तळेगांवला स्कूटरवर यायला निघालो. सोबत तीर्थरूप. पवनेच्या पुलाजवळ स्कूटर झाली पंक्चर. मिट्ट अंधार. अंदाजा अंदाजाने चाक बदलले, पण एक नट कुठेतरी पडला. चोख दहा मिनिटे रस्ता सारवून काढल्यावर एकदाचा सापडला. त्या सुमारे अर्ध्या तासात एकही वाहन उभयदिशांनी आले/गेले नाही.

एक रस्ता हिंजवडीतून/भूमकर चौकातून मारुंजी-नेरे-दारुंब्रे असा सोमाटणे फाट्याला निघतो असे ऐकून होतो म्हणून एकदा स्कूटर तिकडे दामटली. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावरून तो रस्ता जातो असे सांगण्यात आले होते. ती माहिती वापरल्याने कशीबशी वाट मिळाली. तेव्हा तो रस्ता अगदी चिंचोळा, आणि उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉल्या जाऊन जाऊन उखडलेला होता. आता जरा बरा आहे पण खूप म्हणजे खूपच लांबचा वळसा पडतो. भूमकर चौकातून सोमाटणे फाट्यापर्यंत वीस पंचवीस मिनिटांत येता येते. त्या रस्त्याने किमान पाऊण तास लागतो.



गोनीदा (विस्तारित)

काकांचे आऊटहाऊस बांधण्याच्या काळात तळेगांवात फारशा ओळखीपाळखी झाल्या नाहीत - दुकानदार, सुतार नि बैलगाडीवाले सोडून. तळेगांवात ज्यांच्या ओळखीने येणे झाले होते ते मित्राचे कुटुंब त्या सुटीत बहुधा तिथे नव्हते, नक्की आठवत नाही.

मग मी इंजिनिअरिंग शिकायला म्हणून महाराष्ट्राबाहेर उत्तरेला गेलो (बारावीच्या मार्कांवर पुण्यात प्रवेश मिळाला नाही; खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये त्याच वर्षी सुरू झाली होती ती आर्थिकदृष्ट्या परवडण्यापलिकडे होती. एका रीजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला). अठरा वर्षांचे वय. तोवर फारसे कुटुंब सोडून कुठे राहण्याची वेळ आली नव्हती. हिंदी चुलतभाषा नि इंग्रजी सावत्र. हिंदी वाचन तोवर बरे होते (पण ते संतोष मोहन पाठक आणि तत्सम लेखकांपुरतेच). हिंदी चित्रपटांमुळे 'ती भाषा आपल्याला कळते' असा समज होता, पण बोलण्याची फारशी वेळ आली नव्हती. इंग्रजीत वाचन-श्रवण-भाषण या तिन्ही आघाड्यांवर सामसूम.

तिथे गेलो तो काळ अनिश्चिततेचा होता. खलिस्तान चळवळ जोरात होती. कॉलेजातल्या मुलांनी 'मास कट' करण्याची पद्धत जोमात होती. रॅगिंग हा जीवनाचा अविभाज्य भाग होता.

मी सणसणीत 'होम सिक' झालो. महाराष्ट्रातली दहा मुले. त्यातली मुंबईतून आलेली सातही अमराठी. नागपूरची दोन, मी आणि कर्नाटकातून (बेळगांव) आणि मध्य प्रदेशातून (जबलपूर) आलेली प्रत्येकी एक अशी सगळी मिळून पाच मराठी भाषिक. त्यातल्या नागपूरकरांना मराठी वाचनाचा गंध नव्हता. बेळगांव नि जबलपूरहून आलेल्यांना जेमतेम होता. मराठी वाचनासाठी महाराष्ट्र मंडळ खूप लांब होते. एसटीडी फोन नुकतेच सुरू झाले होते पण ते फक्त जीपीओ मध्ये. चौदा किमी सायकल मारत गेले तर दोनतीन तास थांबल्यावर पाचेक मिनिटे बोलणे होई (त्याहून जास्ती बोलणे परवडत नसे).

त्या सगळ्या गर्तेतून सुटण्यासाठी मी दणकावून पत्रे लिहायला सुरुवात केली. सगळ्या नातेवाईकांना तर जाळ्यात घेतलेच (भरपूर होते - पाच काका, एक आत्या, तीन मामा, तीन मावश्या) पण त्याखेरीज 'पत्रमैत्री' या नावाखाली दोन प्रसिद्ध व्यक्तींनाही पत्रे सटकावली. एक गोनीदा आणि दुसरे श्रीराम लागू. गंमत म्हणजे दोघांचीही उत्तरे आली.

श्रीराम लागूंशी पुण्यात परत आल्यावर चांगली मैत्री झाली. त्यांचा सख्खा भाचा माझा कॉलेजात सहाध्यायी आणि सख्खा पुतण्या नाटकात बरोबर. विद्यापीठात 'फिल्म स्टडी सर्कल'मध्ये त्यांना निमंत्रित करायला ही मैत्री उपयोगी पडली. पुढे हळूहळू भेटी विरळ झाल्या नि थांबल्या. ते जाण्याआधी दोनेक वर्षे शेवटली भेट झाली.

पुढल्या वर्षी उत्तर भारताला आणि पर्यायाने इंजिनिअरिंगला अलविदा करून पुण्यात बीएस्सी करायला यायचे ठरवले नि सामानसुमान गुंडाळून मी परतलो. तळेगांवला आल्यावर त्यांनी तोवर पाठवलेली तीन पत्रे (कार्डे) हातात धरून 'मीच तो' असे जाहीर केले. गोनीदा तसेही अगदीच साधे होते. प्रत्यक्ष बोलणे हे पत्रमैत्रीचाच पुढला अध्याय असल्यासारखे ते बोलायला लागले.

इंजिनिअरिंग सोडून बीएस्सी हे त्याकाळच्या सामाजिक समजुतींनुसार मूर्खपणा ते घोर पाप या टप्प्यात कुठेतरी होते. त्या अपराधी भावनेतून थोडीशी सुटका व्हावी म्हणून मी 'आयएएस' ची तयारी करण्याचा विचार आहे असे सांगत फिरत असे. 'आयएएस' च्या तयारीसाठी मानव्यशाखांचा (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इ) अभ्यास महत्वाचा असतो हेही मी गंभीरपणे सांगत असे. माझे बोलणे इतर कुणी गांभिर्याने घेतले नाही, पण बिचाऱ्या गोनीदांनी घेतले. "अरे आमचे जावई राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत, ते तुला नक्की मदत करतील" असे म्हणून त्यांनी मला विजय देवांसाठी चिठी दिली. ती घेऊन मी डेक्कनहून सायकल मारीत त्यांच्या घरी सहकारनगर भागात गेलो. विजय देव मुरलेले होते. त्यांनी माझे पाणी जोखले आणि चार गोड शब्द बोलून मला वाटेला लावले.

पुढली काही वर्षे तळेगांवात येणे आणि गोनीदांकडे जाणे हे एकसलग होत राहिले. महत्वाचे म्हणजे त्यांचा ग्रंथसंग्रह आणि वस्तूसंग्रह यांच्याशी सलगी करता आली. तेही मनापासून पुस्तके काढून हाती ठेवीत. निकोलाओ मनुचीचे पुस्तक त्यांनी असे हाती ठेवून वाचायला दिल्याचे आठवते. तसेच एकदा त्यांचा पाषाणसंग्रह आणि शस्त्रसंग्रहदेखील फडताळांतून काढून निगुतीने दाखवला होता.

गोनीदा तेव्हा अजून सत्तरीला टेकायचे होते. चांगले हिंडतेफिरते होते. नंतर तब्येत खालावत गेल्यावर ते पुण्याला हलले आणि आमच्या भेटी थांबल्याच. त्यांच्याबरोबर डोंगरकिल्लेपालथे घालायचे जमले नाही.


कायदा, सुव्यवस्था इ

मावळ हा डोंगरदऱ्यांचा प्रदेश असे म्हणता येऊ शकेल, जर या डोंगरदऱ्यांना 'स्मॉल टू मिड साईझ' अशी फूटनोट चिकटवली तर. मावळातले किल्लेही फारतर मध्यम उंचीचे. नाशिक जिल्ह्यात जसे अंगावर येणारे किल्ले आहेत तसे नव्हेत.

या डोंगरदऱ्यांत कुणा डाकूमंडळींचा वावर असल्याची इतिहासात नोंद नाही. त्यामुळे मावळातल्या माऊल्यांना आपल्या कार्ट्याला/कार्टीला आपटून थोपटून झोपवताना कुणा डाकू मंगलसिंग वा बुधा बेरड यांचा सहारा नसे. बागुलबुवावर काम भागवावे लागे.

ऐंशीच्या दशकापर्यंत चौराईच्या डोंगरापलिकडे थेट जंगल होते. त्यातून दरोडेखोर आणि/वा बिबट्या येणे शक्य आहे हे ऐंशीच्या दशकाच्या शेवटीशेवटी जाणवायला लागले. आणि शक्यता प्रत्यक्षात उतरल्याचे अनुभवही आले.

पहिला अनुभव बिबट्याचा. आमच्या शेजारच्या प्लॉटवरच्या कुलकर्ण्यांचा कुत्रा जबर जखमी झाला. त्याला जनावरांच्या डॉक्टरकडे नेल्यावर डॉक्टरांनी जाहीर केले की झालेली जखम बिबट्याने केलेली आहे. मानेपाशी पंजाने तडाखा देऊन बिबट्याने मणकाच उघडला होता. तो कुत्रा बिचारा गेलाच.

दरोडेखोरांच्या बाबतीत फुटकळ बातम्या कानी येऊ लागल्या. एकदा पहाटे चारच्या सुमारास आईला काहीतरी आवाजाने जाग आली. आमच्या घरासमोरच्या बाजूला आम्ही हौसेने एक मोठासा हौद बांधून घेतला होता. सुमारे पाच फूट त्रिज्या, तीन फूट उंची आणि अर्धगोलाकार. त्या हौदात कमळे लावलेली होती - निळी, पिवळी नि पांढरी. आई घरी एकटीच होती. तिने खिडकीचा पडदा थोडासा बाजूला सारून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. अंधार दाट होता. तिला पाण्याच्या हौदापाशी काही लोकांची हालचाल जाणवली. पाणी उपसल्याचे आवाज आणि हळू आवाजात चाललेली कुजबूज. पंधरावीस मिनिटांनी कुंपणाच्या भिंतीवरून उड्या मारून लोक बाहेर गेल्यासारखे आवाज आले. थोडे उजाडल्यावर तिने बाहेर जाऊन पाहिले तर दरोडेखोर/डाकू जे कुणी होते त्यांनी हात-तोंड धुण्यासाठी हौद वापरला होता. तोंडाला गडदकाळा तैलरंग फासून दरोडे घालणे ही तोवर मान्यताप्राप्त असलेली परंपरा होती (पुढे दिवसाढवळ्या दरोडे घालण्याची फॅशन आल्यावर काळ्या तोंडाची गरज उरली नाही). घरी जाताना त्या चोरमंडळींनी आपला मेकप उतरवण्यासाठी आमच्या आवारात ओपन एअर ग्रीनरूम केली होती.

नंतर एकदा आमच्या दीडमजली घरात खालच्या मजल्यावर वस्ती होती नि वरच्या दोन खोल्या रिकाम्या होत्या. ही नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धातली गोष्ट. वर कुणी नसताना कुलूप घालण्यात येई. ते कुलूप तसे सामधामीच होते. ते रात्रीतून उचकटून आतमध्ये कुणीतरी हुसकपासक केली होती. कुलूप बदलून चांगले गोदरेजचे कुलूप घातले. पुढल्याच रात्री कोयंडा उचकटलेला आढळला. मी तेव्हा पुण्याला होतो. रविवार पेठेतल्या हार्डवेअरच्या बाजारात जाऊन दाराच्या अंगात बसवण्याचे एक असे भक्कम कुलूप घेतले की एक स्क्वेअर फुटाचे दार फोडल्याखेरीज ते कुलूप निघणार नाही. मग पुढे काही झाले नाही.

एक गंमत - त्याआधीच्या दशकात एकदा दरोड्याच्या घटना वारंवार घडायला लागल्यावर राव कॉलनीतल्या काही लोकांनी मिळून रात्रीची गस्त सुरू केली. टेल्को कॉलनी (खरे तर टेल्को आळी म्हणायला पाहिजे, राव कॉलनीतली एक गल्लीच फक्त टेल्कोतल्या सहासात लोकांची होती) मधली काही मंडळी त्यात सामील होती. मीही एकदोनदा रात्रीच्या झोपेचे खोबरे करून त्यात सामील झाल्याचे आठवते. त्याच काळात राव कॉलनीतली पहिली अपार्टमेंट बिल्डिंग पूर्ण झाली आणि त्या अपार्टमेंट्समध्ये लोक रहायला आले. त्यात एका फ्लॅटमध्ये एक पोलिस इन्स्पेक्टर रहायला आले कळल्यावर त्या इन्स्पेक्टरच्या दारात उभी असलेली बुलेट आणि/वा जीप पुरे असे म्हणून गस्त बंद करण्यात आली. आठवड्याभरात त्या इन्स्पेक्टरच्या फ्लॅटचा दरवाजा फोडून चोरी झाली नि गस्त परत सुरू करावी लागली.

पण प्रकरण नेहमीच असे खेळीमेळीचे नसे. स्टेशनजवळच्या हरणेश्वर टेकडीवर असलेल्या बंगल्यात दरोडा पडला त्यात मुकुंद सोनपाटकी हे लेखक ('तमसा तटाकी' - सावरकरांच्या जीवनावरची कादंबरी) मारहाणीत मृत्यू पावले. त्याच कॉलनीत खालच्या बाजूला दोनेकशे फुटांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या मालकीचा बंगला आहे. १४ एप्रिल नि ६ डिसेंबरला तिथे गर्दी होते.


तळेगांवी खाद्यसंस्कृती

जगण्यासाठी खाणे आणि खाण्यासाठी जगणे या दोन पर्यायांपैकी माझा पर्याय मी लहानपणीच निवडला होता. दुसरा. त्यामुळे जाईन तिथली खाण्याची ठिकाणे धुंडाळणे हा अंगभूत सवयीचा भाग होता.

तळेगांवात चाळीस वर्षांपूर्वी अशी ठिकाणे फारशी नव्हतीच. पण महाराष्ट्रातल्या बहुतेक गावांत चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी तशीच स्थिती होती.

पन्नास वर्षांपूर्वी पेणेत (पनवेलीपासचे गोवा हमरस्त्यावरचे पेण) खाण्यासाठी एस्टी स्टॅंडसमोर एका हाटेलात भजी नि शेवचिवडा एवढेच ऑप्शन होते. जेवायचे असल्यास बडोदा बॅंकेलगत करमरकरांची मटन खाणावळ. शालेय वयाचा असलो तरी मटन खाण्याची हौस दांडगी होती. पण तिथला रस्सा पुण्यातल्या टिळक रस्त्यावरच्या 'रामनाथ'मधल्या मिसळीच्या रश्श्याच्या जवळ जाणारा होता. नाकातून नळ सुटल्यासारखे पाणी गळतेय, कपाळावरचा घाम मुंडावळ्यांसारखा चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना उतरतोय, पण पोरगं मटन थाळी सोडायला तयार नाही हे बघितल्यावर करमरकर आजी कळवळल्या नि त्यांनी माझ्या रश्श्याच्या वाटीत मूठभर साखर पेरली. असो.

तळेगांवात त्या काळी लिंब फाट्यावर (सोमाटणे फाट्याच्या खिंडीतून पुढे आल्यावर जिथे गावात जायला उजवीकडे वळतो तिथे एक कडुलिंबाचे झाड होते, म्हणून लिंब फाटा) एक चहा-भजी छाप टपरी होती, पण विशेष काही नाही.

विशेष म्हणजे ऐन गांवात शाळा चौकाजवळ असलेले राजकमल कोल्ड्रिंक हाऊस. पत्र्याचे छप्पर असलेले आयताकृती दुकान, बसायला लांब बाकडी नि मध्ये लाकडी टेबल. तिथे पॉट आईस्क्रीम मिळे. साधारण वाळूच्या घड्याळ्याच्या आकाराचे स्टेनलेस स्टीलचे वाटीसदृश भांडे, त्यात आईस्क्रीमचा स्कूप. फालुदा आईस्क्रीम हा (तोवर) अनवट प्रकारही तिथे मिळे. त्यात बुळबुळीत सब्जाच्या बिया असत. बाहेर जाऊन खाणे ही मध्यमवर्गीय घरांत सटीसहामाशी होणारी गोष्ट. त्यासाठी राजकमल उत्तम होते.

शाळा चौकातच जरा पुढल्या बाजूला एक मिसळीचे दुकान होते. बहुधा 'विनायक'. पण तिथली मिसळ मला फारशी भावली नाही. गुळमट गोड. त्यापेक्षा पारेख फोटो स्टुडिओच्या समोर एका जुन्या वाडासदृश घरात एक मिसळीचा अड्डा होता. तिथली मिसळ त्यामानाने बरी होती. शिवाय त्याच्याकडे दोनचार मांजरे असत. त्यामुळे मिसळ पार्सल न्यायची असेल तर मांजरांशी तेवढेच खेळता येई.

स्टेशनला शिवाजी चौकात 'बाळू वडेवाले' कधी सुरू झाले आठवत नाही. पण पंचवीसेक वर्षांपूर्वीपासून नक्की आहे. 'विकीमॅपिआ' जेव्हा जोरात होता तेव्हा त्या नकाशावर बाळू वडेवाल्याने आपला झेंडा रोवून ठेवला होता. वडा, मिसळ ठीकठाक असत. त्याच्याकडची खासियत म्हणजे मूग भजी. आवरण कुरकुरीत नि आत खुसखुशीत. त्यासाठी वेगळा कारागीर असावा. ती कला आता लुप्त झाली आहे कारण ती मूग भजी मिळणे तर बंद झालेच आहे, पण त्याचा उल्लेखही भिंतीवर रंगवलेल्या मेन्यूकार्डवरून गायब झाला आहे.

पंचवीसेक वर्षांपूर्वी तळेगांव स्टेशनबाहेर 'श्रद्धा भेळ' या पाटीखाली उत्तम इडली मिळे. लुसलुशीत एवढी की सशाला हात लावल्यासारखे वाटे. खोबरे नि डाळे यांचे यथायोग्य प्रमाण असलेली चटणी. पंधराएक वर्षांपूर्वी ते दुकान बंद झाले.

आता शिवाजी चौकात 'अण्णा इडली' आणि 'नादब्रम्ह' अशी दोन ठिकाणे बरी आहेत. त्यातल्या 'अण्णा इडली' मध्ये इडली, वडा, पोहे, उपमा, दोसा असे सगळे मिळते. 'नादब्रम्ह' ('नादब्रह्म' नव्हे) मध्ये फक्त इडली (नेहमीची, मिनी आणि थट्टे/तट्टे). नादब्रम्ह ही एक दुकान-साखळी आहे.

हायवेला 'थंडा मामला' नावाचे एक शाकाहारी रेस्टॉरंट वीसेक वर्षांपूर्वीपासून आहे. त्याच्या नावाची कथा रोचक आहे. ते रेस्टॉरंट म्हणे कुणा 'गीते' नामक कुटुंबाचे. त्यांचे तळेगांवात आईस्क्रीमचे दुकान होते. 'राजकमल' त्यांचेच का हे ठाऊक नाही. तर आईस्क्रीमच्या दुकानमालकाचे रेस्टॉरंट म्हणून 'थंडा' मामला. नाहीतर 'थंडा मामला' हा 'थंडा फराळ'चा चुलतभाऊ - रेस्टॉरंटच्या नावासाठी सर्वथैव अयोग्य. अजून एक उपपत्ती सांगण्यात येते ती अशी की हायवेकाठाची खानावळ म्हणजे अभक्ष्यभक्षण नि अपेयपान यांची व्यवस्था असणे ओघानेच आले. 'यातले इथे काहीही नाही' हे दर्शवणारे नाव म्हणून 'थंडा मामला'.

आता तळेगांव जनरल हॉस्पिटल एका शिक्षणमहर्षीने मेडिकल कॉलेज काढून ताब्यात घेतले आहे. लक्षावधी रुपये उधळून तिथे शिकायला येणाऱ्या मुलामुलींसाठी 'खाऊ गल्ली' या नावाने दोन तीन ठिकाणे प्रसिद्ध आहेत. पण प्रत्येक ठिकाण एकदा जाऊन मग कायमचे कटाप करण्याच्या लायकीचे. माझ्यावर विश्वास असेल तर एकदाही न जाता कटाप करण्याच्या लायकीचे.

त्यातल्यात्यात बरे ठिकाण म्हणजे सिंडिकेट/कॅनरा बॅंकेच्या अलिकडचे 'आनंद वडापाव'. त्याचा भटारखाना सकाळी सातपासून अव्याहत चालू असतो. फुटकळ खाण्यापासून पंजाबी डिशेसपर्यंत. आणि एरवी बाहेर असतात त्याच्या दोन-तृतियांश वा निम्मे दर. तेल नि मसाले यांची रेलचेल असल्याने श्रमिक जनतेला आवडते.

अजून एक बरे ठिकाण म्हणजे स्टेशन चौक ते महामार्ग या रस्त्यावरील मयूरेश डायनिंग हॉल. काही वर्षांपूर्वीपर्यंत तिथे प्रामुख्याने महाराष्ट्रीयन पदार्थ मिळत. भरले वांगे, मटकी उसळ, मेथी पिठले, मासवडी आदि. एकंदर ग्राहकांचा कल पाहून आता तिथे पंजाबी आणि दक्षिण भारतीय हेही सुरू झाले आहे. महाराष्ट्रीयन पदार्थ छान असतात - तेलाची रेलचेल सोडता. तिथल्या दक्षिण भारतीय पदार्थांची जाहिरात कल्पक आहे - साऊथ टू माऊथ.

गांवभागात जिजामाता चौकाजवळ चंदू वडेवाले ही बाळू वडेवालेची गांवातली आवृत्ती म्हणता येईल. साधारण तेच नि तसेच पदार्थ. फक्त बाळू वडेवाल्याकडे कांदेपोहे मिळतात, चंदू वडेवाल्याकडे नाहीत. दोघांकडची गोल कांदाभजी उत्तम, बटाटा भजी अतितेलकट. जिजामाता चौकातच येळवंडे वडेवाले आहेत. पण ते लौकर सुरू होत नाही. साडेनऊ दहाला सुरू होते. मग दिवसभर चालू असते. तिथली कांदाभजी थोडी जास्ती कुरकुरीत असतात. मोहन जास्ती घालीत असावेत.

मारुती मंदिर परिसरात इडली-वडा मिळण्याची दोन ठिकाणे आहेत.

एक मारुती मंदिर चौकात. एक स्थानिक मावळा हातगाडीवरून हा उद्योग चालवतो. तो घरून इडली, वडा, सांबार नि चटणी भरलेले डबे/पातेली घेऊन येतो नि जागेवर फक्त वितरण. स्थानिक मावळा, अर्थात मराठी माणूस असल्याने तो भल्या पहाटे आठच्या सुमारास व्यवसाय सुरू करतो. त्यात आठ ते सव्वाआठच्या सुमारास त्याची लगबग प्रेक्षणीय असते. सगळे डबे-पातेली गाड्यावर मांडणे, ताटल्या-चमचे मांडणे, हे करतानाची त्याची देहबोली तो कामात किती बुडालेला आहे, व्यवसाय म्हटले की साखरझोप सोडून हे सगळे करावे लागते इ इ जगजाहीर करते. इडली थोडी दडदडीत असते, पण वडे नि चटणी छान. सांबार कसे असते माहीत नाही कारण कोल्हापूरच्या उत्तरेला खरे सांबार मिळत नाही हे माझे प्रामाणिक मत आहे.

दुसरे ठिकाण भंडारी हॉस्पिटलसमोर एका सेमी-बेसमेंटमध्ये असलेला दक्षिण भारतीय अण्णा. राजामौली वा तत्सम नावाचा. तो स्थानिक मावळा नसल्याने बिचारा मुकाट सकाळी सहा वाजता आपला व्यवसाय सुरू करतो. त्याच्याकडची इडली थोडी जास्ती लुसलुशीत असते आणि चटणी थोडी जास्ती एकजीव. याचा तयार माल विकण्याचा व्यवसाय सकाळी दहा-साडेदहापर्यंत उरकतो. उरलेला दिवसभर त्याच्याकडे इडलीचे तयार पीठ नि चटणी मिळते.

गेल्या दहाएक वर्षांत तळेगांवात 'चिकन बिर्याणी' पार्सल देणाऱ्या दुकानांचे पेव फुटल्यासारखे झाले आहे. पहिल्यांदा चर्चसमोर असलेले 'ए वन' त्यातील पहिले. आता 'ए वन' एस्टी डेपोच्या बाजूला गेले आहे. त्याच्या आगेमागे अजून दोन आहेत - खानसाहेब आणी अजमेरी केटरर्स. खांडगे पंपाजवळ 'लकी'. सर्व ठिकाणे दीडशे रुपयांत पोटभर बिर्याणी (पोट विस्तृत असेल तर; नाहीतर नव्वद रुपयांत काम होते) या USP वर चालणारी. सगळ्यांचे चालक बिहारी वा उत्तरप्रदेशी मुस्लीम. त्यातले 'लकी' हे माझ्या अनुभवात सगळयात चांगले. तेल-मसाले माफक, चव उत्तम नि किंमत माफक. थोडक्यात पोटाला नि खिशाला सोसणारे नि जिभेला खुषावणारे. 'ए वन'चे मसाले जळजळीत असतात. 'खानसाहेब'ची बिर्याणी थोडी कमी शिजलेली असते. घरी येऊन एक वाफ काढून घ्यावी अशी. आणि 'अजमेरी' च्या बिर्याणीचा मसालेदारपणा त्रासदायक पातळीवर असतो.

तशी पुण्याच्या 'गुडलक'ची एक फ्रॅंचाईजी इथे सुरू झाली आहे. मुळात कासमभाईंच्या निधनानंतर पुण्यातल्या 'गुडलक'चा दर्जा दोनेक दशकांपूर्वी रसातळाला गेला. आताचा दर्जा ठरवण्यासाठी आण्विक पाणबुडीच लागेल. पण 'गुडलक'च्या नावाने उसासे टाकणे हे ज्यांच्या दृष्टीने धर्मकार्य आहे त्यांच्यासाठी उत्तम.

हायवेला 'थंडा मामला'च्या अगदी शेजारी 'बगीचा' नावाचे मांसाहारी रेस्टॉरंट-बार आहे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत त्याचा दर्जा उत्तम होता. तिथे चिकन मलाई टिक्का याच्या जोडीला फेटलेल्या सायीच्या दह्यात बारीक कापलेली कोबी नि हिरवी मिरची मिसळून केलेले अप्रतिम सॅलड मिळे (मेयॉनीजची देशी आवृत्ती). टिक्का तर अक्षरशः मलई विरघळल्यासारखा तोंडात विरघळे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मॅनेजमेंट बदलली, आचारी बदलले नि आता ते ठिकाण केवळ एक 'क्वार्टर बार' होऊन बसले आहे.