चिदंबरम, खारफुटीची जंगले आणि बंगलोर

मद्रासला दोन आठवडे सुटी म्हणून रहायचे कबूल केले. मग मी खरी सुटी असल्यासारखे हिंडू लागलो.

मद्रासच्या लोकलमधून हिंडलो. पण लोकलमध्ये इतकी कमी गर्दी असे की मी एकदा दारात एका हाताने खांब पकडून बाहेरच्या दिशेने लोंबकळत दुसरा हात हवेत हलवत असताना एक काका आले नि म्हणाले, "सार, प्लीज्ज सिट्ट इन्साईड, ऍम्प्ल स्पेस". तेव्हा माझ्या लक्षात आले की अख्ख्या डब्यात जेमतेम पंधरावीस माणसे होते

मग शिशिरचे आईवडील पुण्याला गेले आणि मी होस्टेल ऐवजी त्यांच्या घरी कोडंबक्कमला रहायला गेलो. हॉस्टेलच्या जेवणाचा कंटाळा आला होता, हाताने करून खावे म्हटले.

शिशिर, ऍन, अजय नि प्रशांत चौघेही दिवसभर इन्स्टिट्यूटला असत. मी दुपारी जेवून तिथे पोहोचे नि त्यांची लायब्ररी धुंडाळत बसे. ही लायब्ररी मुंबईच्या टीआयएफआरच्या लायब्ररीइतकी समृद्ध नव्हती, पण पुरेशी होती. संध्याकाळी अड्यार मार्केटमधून बिअर/डीएमके घेऊन आम्ही कोडंबक्कम गाठत असू.

जवळपासच्या दुकानातून खरेदी करताना छोटे शब्द माहीत झाले. साखर म्हणजे सर्करई. चहाला टी म्हणून चाले. कॉफीला कॉफी. दुधाला पाल.

मग एका वीकएंडला चिदंबरम या 'टेम्पल टाऊन'ला जाण्याचा बूट निघाला. शेवटी ऍन अमेरिकन. आणि अमेरिकन माणसाच्या डीएनए मध्ये एक 'टूरिस्ट' नावाचा व्हायरस घुसलेला असतो. त्यामुळे हे असले 'टेम्पल टाऊन' वगैरे शब्द त्यांना फार भावतात.

अर्थात चिदंबरमची देवळे बघणे हा एक छोटा हेतू होता.

चिदंबरमजवळ समुद्रकिनारी खारफुटीची मोठी वने होती. तिथे संशोधन करणारा एक विजय नावाचा मराठी तरुण मद्रासच्या इन्स्टिट्यूटमध्ये कामानिमित्त येत असे. त्याची नि शिशिरची ओळख झाली. विजयने आम्हांला त्याच्या 'साईट'वर व्हिजिटला यायचे आमंत्रण दिले. एक रात्र राहण्याची व्यवस्था तो विद्यापीठात करणार होता. चिदंबरम हे अन्नामलाई विद्यापीठाचे मूळस्थान.

विजय तेव्हा पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम करीत होता. पुढे तो त्याच्या विद्याशाखेतला मोठा माणूस झाला. देशातल्या एका प्रसिद्ध विद्यापीठाचा कुलगुरू झाला. नि घोळ केल्यामुळे बडतर्फ झाला.

चिदंबरम रेल्वेने मद्रासहून सुमारे पाच-सहा तास. आम्ही शुक्रवारी पूर्वरात्री निघून उत्तररात्रीला चिदंबरमला पोहोचावे. शनिवारी दिवसभर देवळे बघून तीनपारी विद्यापीठात वस्तीला जावे. रविवारी दिवसभर खारफुटीची वने बघून रात्रीच्या रेल्वेने मद्रासला परतावे असा बेत केला.

पाचसहा तासांच्या प्रवासासाठी रिझर्वेशनची गरज नाही असे मी ठरवले. तोवर मी उत्तर भारतात बऱ्यापैकी प्रवास केला होता. रिझर्वड कंपार्टमेंटमध्ये घुसून दाराजवळ बसायचे. सोबत ऍन होती. त्यामुळे टीटीई आलाच तर 'लेडिज आहे, जरा ऍडजस्ट करा' हा मंत्र म्हणायचा. मंत्रोच्चाराने काम झाले नाही तर दक्षिणा द्यायची. अगदी 'नो ब्रेनर' प्रकरण होते.

रात्री साडेआठ-नऊच्या दरम्यान ट्रेन सुटली. मी सर्वांना एका रिझर्वड कंपार्टमेंटच्या दारात नि आसपास रिचवले. आणि मोकळी हवा खात बसलो. अर्ध्या पाऊण तासात टीटीई आला.

आणि भानगड झाली.

त्या फोकळीच्याच्या शब्दकोषात 'ऍडजस्ट' हा शब्दच नव्हता. आणि दक्षिणा ही संकल्पनाही त्याला ठाऊक नव्हती. "येक्स्ट्रीमली सॉरी फॉर द इनकन्विनिआन्स सार, बट्ट यू विल हॅव्व टू गो टू द ओपन कंपार्टमेंट्ट ऍट द नेक्स्ट्ट स्टेशन प्लीज" (ओपन कंपार्टमेंट म्हणजे अनारक्षित) ह्या मंत्राखेरीज तो काही बोलेना. पंधराएक मिनिटांत पुढले स्टेशन आले. हा महाभाग आम्हांला सोडायला जातीने अनारक्षित डब्यापाशी आला.

आणि अनारक्षित डबा ओळखता येणार नाही इतका रिकामा होता. आम्हांला बाकावर बसायला जागा मिळाली. अजय तर वरच्या बर्थवर चढून झोपलाही लेकाचा.

पहाटे दोनच्या सुमारास आम्ही चिदंबरम स्टेशनला उतरलो. विजय साईटवर होता तो दुपारनंतर आम्हांला विद्यापीठात भेटणार होता.

स्टेशनला बसून टिवल्याबावल्या करायचा प्रयत्न केला पण त्याचाही कंटाळा आला. झोप म्हटले तर आली होती म्हटले तर नव्हती. शेवटी आम्ही देवळाच्या दिशेने चालत जावे असा बेत केला. अंतर सुमारे तीन किमी. रमत गमत गेलो तर पाऊणेक तास काढता आला असता.

आम्ही जाणार होतो त्या प्रसिद्ध देवळाचे नाव 'चिदंबरम नटराजा टेम्पल'. तिथले सगळेजण त्याला फक्त 'टेम्पल' म्हणतात.

आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळत चालायला सुरुवात केली. कॉफीची दुकाने सुरू होत होती. दोनदा कॉफी प्यायलो. मग देऊळ कुठे आहे याची चौकशी सुरू केली - आम्ही योग्य रस्त्याला आहोत ना हे तपासण्यासाठी.

एक गडबड झाली. 'इंगे/एंगे' म्हणजे 'कुठे' आणि 'इरका' म्हणजे 'आहे'. 'टेम्पल एंगे इरका' किंवा नुसते 'टेम्पल एंगे' विचारले की हातवाऱ्यांनी उत्तर मिळे. शब्दांतही उत्तर मिळे पण ते आम्हांला कळत नसे. सरकीलालला थोडेसे कळे.

एका ठिकाणी मी जाऊन विचारले नि तो माणूस माझ्याकडे चमत्कारिकपणे बघायला लागला. सरकीलाल माझ्या मागेच होता, त्याने मला मागे खेचून तोडक्यामोडक्या तमिळमध्ये वार्तालाप हाती घेतला.

काय झाले होते? तर 'टेम्पल एंगे इरका' चा शॉर्टफॉर्म 'टेम्पल एंगे'. मी त्या ऐवजी 'टेम्पल इरका' (देऊळ आहे (का)?) विचारले. जणू टेम्पल ही दुकानात मिळणारी वस्तूच होती.

अखेर देऊळ आले. कड्याकुलपात बंद होते. पहाटेचे चार-साडेचार झाले होते. देऊळ आठला उघडेल असे सांगण्यात आले. आता सगळ्यांना गरगरून झोप यायला लागली होती. अखेर आम्ही एका लॉजवर गेलो. पण रूमचे भाडे फार होते (टेम्पल टाऊन). शेवटी एक रूम घेतली, त्यात एका गादीवर शिशिर ऍनला झोपवले. दुसऱ्या गादीवर आम्ही तिघे रेल्वे फलाटावर झोपल्यासारखे चेपून झोपलो. असे तीनेक तास झोपल्यावर जरा हुशारी आली. आंघोळी उरकून देवळात गेलो.

आणि गेलो ते बरे झाले. देऊळ म्हटल्यावर एरवी जे नजरेसमोर येते (गर्दी, अस्वच्छता, माश्या, कलकलाट) त्यातले काहीही नव्हते. अगदी गोव्याच्या देवळांत गेल्यासारखे वाटले.

आणि देऊळ भव्य होते. भव्य म्हणजे किती? तर देऊळ आणि परिसर मिळून सुमारे चाळीस एकर. त्यात अनेकानेक शिल्पे. आम्ही चारपाच तास खुळावून भटकत राहिलो. अखेर विद्यापीठात जायची वेळ झाली तेव्हा निघालो.

विद्यापीठाचा परिसर अतिविस्तीर्ण होता. पुणे विद्यापीठाचा परिसर विस्तीर्ण आहे. सुमारे चारशे एकर. अन्नामलै विद्यापीठाचा परिसर आहे सुमारे दीड हजार एकर.

विजय आम्हांला विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपाशी भेटला नि गेस्ट हाऊसला घेऊन गेला. गेस्ट हाऊसही अतिभव्य. खोलीच्या सीलींगची उंचीच सुमारे वीस फूट. नि एकेक खोली सुमारे वीस फूट बाय वीस फूट. चारफुटी उंच खिडक्या. बाहेर गर्द झाडी.

आणि उत्तम जेवण. कदाचित दुपारी देऊळ हिंडण्याच्या नादात उपास घडल्यानेही उत्तम वाटले असेल.

सकाळी अस्सल साहेबी खाणे - ब्रेड, ऑम्लेट, कटलेट, कॉफी - करून निघालो. चिदंबरमजवळून जाणारी कुठलीतरी नदी (नाव विसरलो) चारसहा किमी पूर्वेकडे जाऊन समुद्राला मिळते. त्या खाडीच्या मुखाच्या आसपास ही खारफुटीची वने होती. त्या नदीच्या एका घाटावर विजयच्या प्रोजेक्टची लाँच येणार होती. तिथे पोहोचलो नि ताडगोळे खात लाँचमधून निघालो.

विजयच्या साईटला पोहोचायला तासभर लागला. तो उत्साहाने माहिती देत होता. पण जीवशास्त्राशी माझा संबंध मी त्याआधी दहाएक वर्षांपूर्वीच तोडला होता. दहावीनंतर. त्यामुळे मला त्यात फार गम्य नव्हते. मला जवळ दिसणारा एक बीच खुणावत होता. ऍन नि मी त्या बीचकडे निघालो.

बीच निर्मनुष्य होता. आणि भलाथोरला लांबलचक होता. त्याचे टोक असे दिसत नव्हते. सरळसोट समुद्राला समांतर वाळूची रेघ.

आम्ही पाण्यात खेळलो. तोवर शिशिर, अजय नि सरकीलालही आले.

पण आता ऊन चटकायला लागले होते.

आणि जाणवले की बीच निर्मनुष्यच नव्हता, तर जवळपास निर्वृक्ष होता. अगदी तुरळक नारळाची झाडे. त्यांच्या तोटक्या सावलीत जाईस्तोवर भाजून निघायला झाले.

त्या झाडांजवळ मच्छिमारांच्या झोपड्या होत्या. सरकीलालने दुभाष्याचे काम करून पिण्याचे पाणी मिळवले. ते मचूळ पाणी आम्ही अधाश्यासारखे ढोसले.

चटकत्या उन्हात पावले उचलत विजयचा साईटवर पोहोचलो.

आणि कळाले की लाँच बिघडली आहे. (नंतर कळाले की लाँचच्या कप्तानाचे नि विजयच्या साईटवरच्या एकाचे भांडण झाले म्हणून लाँच बिघडल्याचे निमित्त करून कप्तानाने ती 'दुरुस्त' करायला नेली होती).

आता?

सरकीलालचे तमिळ आम्हांला वाटले होते तेवढे तोडकेमोडके नव्हते. कारण त्याने वाटाघाटी करून आम्हांला चिदंबरमला नेण्यासाठी दोन लहान होडकी मिळवली. एका होडक्यात वल्हवणारा धरून जेमतेम चार माणसे बसत. बसत म्हणजे होडक्याच्या तळाला बूड चिकटवून बसत. होडक्याची रुंदी जेमतेम दोन फूट. चार माणसे बसल्यावर होडक्याचा काठ पाण्यावर कसाबसा पाचसहा इंच राही. त्यामुळे होडी डचमळली तर पाणी आत येण्याची शक्यता दाट.

होडकीवाल्यांनी मुख्य नदी(खाडी)ऐवजी छोट्याछोट्या कालव्यांसारख्या जलप्रवाहांमधून प्रवास सुरू केला. केरळमधल्या बॅकवॉटर्समध्ये प्रवास केलेल्यांना काय ते समजेल.

हे छोटे जलप्रवाह अगदीच उथळ होते. बऱ्याच ठिकाणी पाचेक फूट खोल. त्यातून डोके पाण्यावर नि बाकी पाण्यात असा पायी प्रवास करणारे बरेच जण दिसले. बीचवर त्वचा इतकी भाजून निघाली होती की आपणही तसे करावे असा मोह झाला. पण पाण्यात पाणसाप असतात आणि त्यातले काही विषारी असतात असे होडीवाल्याने सरकीलालला सांगितले (असे सरकीलाल म्हणाला). मग मोह टाळणे सोपे झाले.

विजय साईटवरच थांबला होता. तो संध्याकाळी येणार होता. पण विद्यापीठातून वशिला लावून त्याने आम्हांला संध्याकाळच्या रेल्वेची रिझर्वेशन्स मिळवून दिली होती.

चिदंबरम गावात पोहोचलो तेव्हा अंगाला कपड्याचा स्पर्शही नको इतकी त्वचा हळवी झाली होती. आणि वरून उन्हाचा कडाका. शेवटी आम्ही एका बिअर बारमध्ये शिरलो. कारण तो एअर कंडिशन्ड होता. पण महागही होता. आणि आम्ही पैसे फार आणले नव्हते.

त्या दिवसाइतक्या संथ गतीने बिअर त्यानंतर आयुष्यात प्यायलो नाही. एक बिअर पाचजणांत प्यायला एक तास!

त्या बारचे नाव अजून आठवते. शारदा राम. लक्षात राहिले याचे कारण त्याचे अस्सल दक्षिण भारतीय पद्धतीने लिहिलेले इंग्रजी स्पेलिंग. त्या स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार आम्ही 'सरडा राम' करून खिदळत होतो.

संध्याकाळच्या रेल्वेने आम्ही मध्यरात्रीपर्यंत मद्रासला पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी त्वचा तांबूस कडून काळ्याकडे झुकली. आणि नंतर तीन दिवस खवले निघावेत तशी उलत गेली. साप कात टाकतो ती जवळजवळ एकसंधपणे. आम्ही ते तुकड्यातुकड्यांत केले. इतके सगळे गणितज्ञ असल्यावर 'इंटिग्रेशन बाय पार्ट्स' होणारच.



सरकीलाल ऊर्फ प्रशांत (खरे तर उलटे) हा बंगलोरच्या आयएसआय मध्ये डॉक्टरेट करीत होता. आयएसआय या नावावरून बिथरून जायची गरज नाही. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही भारतातली संख्याशास्त्रात संशोधन करणारी नामवंत संस्था आहे. मुख्यालय कलकत्ता आणि ठिकठिकाणी शाखा. त्यातली एक बंगलोर. दशकभरात आयएसआयला शंभर वर्षे पूर्ण होतील. कलकत्त्यातल्या तिच्या मुख्यालयात शिशिर आधी पीएचडी करीत होता. तिथे त्याची नि प्रशांतची ओळख झाली. मग शिशिर आयएसआय सोडून मद्रासला मॅटसायन्सला आला. प्रशांतने कलकत्त्याहून बंगलोरला बदली करून घेतली. सध्या प्रशांत एक दोनेक महिन्यांचा कोर्स करण्यासाठी मद्रासला आला होता.

प्रशांतला त्याची फेलोशिप घेण्यासाठी बंगलोरला जायचे होते. त्या दिवसांत नेट बॅंकिंग, डायरेक्ट बॅंक ट्रान्स्फर हे शब्द कुणालाच माहीत नव्हते. भारत तेव्हा विश्वगुरू नव्हता त्याचा दुष्परिणाम. थोडक्यात, प्रशांतला बंगलोरला जाऊन चेक ताब्यात घेऊन तो त्याच्या बॅंकेत भरणे गरजेचे होते. त्याच बॅंकेचा चेक त्याच बॅंकेतल्या खात्यात जमा व्हायला जे दोनतीन दिवस लागतील तेवढे थांबायचे नि मग पैसे काढून परत मद्रासला यायचे असा त्याचा बेत होता.

सुमारे दीड वर्षांआधी मी आयएसआय कलकत्त्यामध्ये एका संशोधन प्रकल्पासाठी प्रयत्न केला होता. तेव्हा मी नावापुरता का होईना संगणकशास्त्रात शिक्षण घेत होतो. आता ते सगळेच सुटले होते. पण कलकत्त्याची आयएसआय बघितली पण बंगलोरची नाही हा ठपका नको म्हणून आणि मद्रासमध्ये करण्यासारखे असे दुसरे काही नव्हते म्हणून मी प्रशांतबरोबर निघालो.

यावेळेस आम्ही व्यवस्थित रेल्वेचे रिझर्वेशन केले होते. सुमारे सात तासांचा प्रवास. गाडी दुपारी एकच्या आसपास सुटणार होती. आमचे रिझर्वेशन एस-३ मध्ये होते.

वेळ पाळण्याच्या बाबतीत प्रशांत माझ्याएवढाच, किंबहुना थोडा जास्तीच, हळवा होता. 'आपल्याला उशीर होतोय' या धास्तीने आम्ही साधारण सव्वाबाराच्या सुमारास स्टेशन गाठले. मग सिगरेटी फुंकीत फलाटावर येराझाऱ्या घातल्या. साडेबाराच्या सुमारास गाडी फलाटावर लागली. डब्यावरचे खडूने लिहिलेले एस-३ फारच पुसट होते, जेमतेम वाचता येईल असे. पण नेमका तोच डबा आम्ही थांबलो होतो तिथे समोर आल्याने जुळले. सिटा ताब्यात घेतल्या. पण डबा फारच अस्वच्छ होता. पण तेव्हा 'स्वच्छ भारत' मोहिमेची सुरुवात झालेली नव्हती म्हणून आम्ही गप्प बसलो.

पण वाढती गर्दी पाहता काहीतरी चुकल्याची जाणीव झाली. रिझर्वड कंपार्टमेंटमध्ये तिनाच्या बाकावर पाचजण चेपून बसू लागले. मी निषेध व्यक्त केला तर 'नो रिझर्वेशन्स सार' असे उत्तर मिळाले. मला काहीच कळेना. इतका निर्लज्ज प्रतिसाद त्याआधी उत्तर भारतात अनुभवला होता अनेकदा (अईसा है भईया, के रिजर्वेशन अहियां होत है कागजपे। बैठन वासते कोनो फायदा ना है। तनिक और खिसकियेगा) पण दक्षिण भारतातल्या एकंदर अनुभवाशी हे विसंगत होते. प्रशांतने तमिळमध्ये वार्तालाप सुरू केला आणि कळाले की हा एस-३ नसून अनारक्षित डबा आहे. खरा एस-३ पुढे कुठेतरी आहे.

गाडी सुटायला जेमतेम तीनचार मिनिटे उरली होती. प्रशांत खाली उतरून पळत पुढेमागे बघून आला. एस-३, ठळक छापील कागद चिकटवलेला, तीन डबे पुढे होता. आम्ही सामान घेऊन पळत त्यात शिरलो आणि गाडी सुरू झाली. टीटीई हातात यादी घेऊन बसला होता. त्याला तिकिटे दाखवल्यावर त्याने तमिळमध्ये एक फैर झाडली. त्याचा भावार्थ प्रशांतने सांगितला तो असा की एवढी धावपळ करायची गरज नव्हती. पुढल्या स्टेशनपर्यंत त्याने आमची वाट पाहिली असती आणि मगच आमच्या सिटा इतर कुणाला दिल्या असत्या.

टीटीईने गाडी सुटायच्या आतच बसलेल्या बहुतेकांची तिकिटे तपासून हातातल्या यादीवर नोंदी करून टाकल्या होत्या. आमच्यासारखे एखाददोन राहिले होते तेही त्याने संपवले आणि हुश्श करून पाठ नीट टेकून बसला.

मग त्याने यादी नीट बॅगेत ठेवली, कोट नीटनेटका केला आणि उठून तो दरवाज्यात आला. तेव्हा रेल्वेत धूम्रपान वर्जित नव्हते. आम्ही सिगरेट ओढायच्या तयारीत होतो. आम्हांला वाटले की तोही अग्निहोत्री असेल. पण नाही.

त्याने कोटाच्या एका खिशातून प्लास्टिकचा ग्लास काढला. दुसऱ्या खिशातून दोन पाऊच - एक डीएमकेचा आणि एक पाण्याचा. आणि आमची एकेक सिगरेट ओढून होईस्तोवर त्याने डीएमकेचा पाऊच उदरस्थ (यकृतस्थ?) केला. आणि परत सीट गाठून पाठ टेकून त्याने डोळे मिटले.

आम्हांला हेवा वाटला.

बाहेर बऱ्यापैकी उष्मा होता. प्रदेश अर्ध-वैराण होता, पण मधून अधून हिरवाई ठळकपणे दिसत होती. आमची गाडी कुठलीतरी सुपरफास्ट एक्सप्रेस होती त्यामुळे थांबे फार नव्हते.

गोची अशी होती की आम्ही पिण्याचे पाणी घेतले नव्हते. पहिल्या थांब्याला उतरून प्लॅटफॉर्मवर नळ शोधेस्तोवर गाडीने शिटी मारली. पुढल्या थांब्याला पोहोचेस्तोवर प्राण कंठाशी आले. बाटलीबंद पाणी तेव्हा कल्पनेत नव्हते. पाऊच होते पण तेही सहजी मिळत नसत. शेवटी पुढल्या थांब्याला सुगंधी दुधाच्या दोन बाटल्या घेऊन त्या प्यायलो.

ही ट्रिक मी अहमदाबादला शिकलो होतो. अहमदाबादचे पाणी मचूळ. कितीही प्यायले तरी तहान भागत नसे, फक्त पोट फुगे नि मूत्रपिंडे बोंबलत. एक थंड सुगंधी दुधाची बाटली रिचवली की साखरही पोटात जाई, घशालाही बरे वाटे आणि डिहायड्रेशनचा धोकाही टळे.

पण गोची झालीच. प्रशांतला होता आयबीएस (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) आणि तो बऱ्याचदा दुधाने उफाळून उठे. तसा आताही उठला. आणि बंगलोर येईस्तोवर प्रशांत प्रसाधनगृहाचा फ्रीक्वेंट व्हिजिटिंग फेलो झाला.

मद्रासच्या उकडहंडीतून बंगलोर म्हणजे सुख होते. आणि आयएसआय कॅम्पसवर पोहोचेपर्यंत एक पावसाची सरही येऊन गेली. पावसाळ्यातल्या पावसाखेरीजही बंगलोरला मधूनच केव्हांही पाऊस पडतो असे प्रशांतने सांगितले. नंतर मला त्याचा दोनतीनदा अनुभवही आला.

आयएसआयच्या हॉस्टेलमधल्या खोल्या मात्र छोट्या नि कोंदट होत्या. पुणे विद्यापीठातल्या हॉस्टेल नं ५ मधल्या खोल्यांची आठवण आली.

दुसऱ्या दिवशी प्रशांतने जाऊन त्याचे आर्थिक व्यवहार पूर्ण केले. चमत्कार म्हणजे त्याच बॅंकेतला चेक त्याच बॅंकेतल्या अकाऊंटमध्ये त्याच दिवशी जमाही झाला. प्रशांत श्रीमंत झाला!

आयएसआय कॅम्पस बंगलोर-म्हैसूर रस्त्यावर आहे. आम्ही रात्री जेवायला त्या हायवेवरच्या एका धाब्यावर गेलो. हवेत सुखद गारवा होता. खिशात पैशांची ऊब होती. ग्लासात रॉयल चॅलेंजची धग होती.

जेवून येताना प्रशांतने मला मोठ्या रस्त्यावरून चालण्याचा एक मंत्र दिला. तो मी आजतागायत पाळत आलो आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे. त्याचे तर्कशुद्ध कारण असे, की आपल्या बुडाला डोळे नसतात, चेहऱ्यावर असतात आणि ते समोरच्या बाजूला असतात. भारतात बहुसंख्य चालक वाहने डाव्या बाजूने चालवतात (उत्तर प्रदेश आणि बिहार सोडून; तिथे वाहने रस्त्याखेरीज कुठूनही चालवतात). त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनापेक्षा समोरून येणारे वाहन दिसणे जास्ती सोयीचे अन सोपे असते. त्यामुळे चित्तवृत्ती उल्हसित असो वा उदास, आत्मरक्षणाचा उत्तम मार्ग म्हणजे उजव्या बाजूने चालणे.

आयएसआयचा कॅम्पसही चांगला हिरवागार होता. छान वृक्षराजी, हिरवळ, मोकळी जागा वगैरे. पण मी त्यातल्या एका झाडाखाली बसण्याची इच्छा व्यक्त केल्यावर प्रशांतने ठाम नकार देऊन आमची वरात हॉस्टेलकडे वळवली. कारण? हिरवळीत साप दडलेले असतात हे ऐकून होतो. आयएसआयच्या हिरवळीत विंचू असत. आणि ते सर्वसंचारी असत.

मला खोटे वाटले.

पण आमच्या रूममध्ये पोहोचल्यावर तिथेच तीन विंचू निघाले.