सावल्यांच्या पाऊलखुणा -भाग १

सावल्यांच्या पाऊलखुणा


           हिवाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ. झाडावर बर्फ विखुरले होते. आकाशात स्वच्छ चांदणे होते. काही पानांवर बर्फ वितळून पडणारे पाण्याचे थेंबच काय ते शांततेचा भंग करत होते. प्रत्येक थडग्यावर असलेला क्रॉस आणि काही थडग्यांजवळ असलेली फुले थंडीत कुडकुडत होती.  पायघोळ कोट आणि डोक्यावर हॅट घालून एक आकृती कारमधून उतरली. तिने खिशातून मोबाईल फोन काढला. वाहणारा गार वारा अंगाला झोंबत होता. त्या वक्तीला त्याची फारशी पर्वा नसावी. फोनवर बोलत झपाझप पावले टाकत ती व्यक्ती नोंदणी कार्यालयाकडे चालू लागली.  फोन बंद करून तिने परत खिशात ठेवला. चंद्राच्या प्रकाशात व्यक्तीची सावली पुढे सरकली. कार्यालयाचे दार वाजले.


              कर्मचाऱ्याने दार उघडले. त्याने अपरिचित चेहऱ्याचे स्वागत केले. सहीसाठी एक रजिस्टर हातात दिले. मिणमिणत्या प्रकाशात आपली सही करून त्या व्यक्तीने रजिस्टर परत केले.
"तुम्हाला काही मदत हवी आहे का?"
" नाही." त्याने मान हालवून उत्तर दिले.


पायघोळ कोट सावरला.  थडग्यांच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. सळसळणारी पाने त्याची सोबत करत होती. फांद्यांची सावली आणि त्या व्यक्तीची सावली एकमेकांचा पाठलाग करत होत्या.


                 कर्मचाऱ्याने सही बघितली. आपले जुने रेकॉर्ड्स पडताळून पाहण्यास सुरुवात केली.   बरोबर एक वर्षापूर्वी जेनिफर कुमोला अखेरचा निरोप देण्यास चार व्यक्ती हजर होत्या. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे सॅन्डी पटेल. आज एका वर्षाने त्याने इथे पाऊल ठेवले होते. थोडेसे आश्वर्यचकित होऊन कर्मचाऱ्याने रजिस्टर बंद केले.


                   एका थडग्यासमोर तो थांबला. त्यावरचे नाव स्पष्ट दिसत होते. त्याच्या ओठातून अस्फुटसे हुंदके बाहेर पडले. शांत वातावरणात ते अंगावर शहारे आणणारे होते.


    ''जेनी, आय लव्ह यू'' गुडघे टेकून त्याने कबुली दिली. 'मी तुला विसरू शकलो नाही. जेम्स, रीमा आणि कृष्णा सुद्धा.' अंदाजे एक वर्षापूर्वी मित्रांबरोबर आखलेले सगळे मनसुबे त्याच्या नजरेसमोर उभे राहिले. मित्रांनी एकाच ठिकाणी घरी घेतली होती. जेम्स आणि रीमा लग्न करणार होते. तसेच दहा दिवसांनी जेनी सॅन्डीची पत्नी होणार होती.


             सॅन्डी आणि जेनी दोघेही पत्रकार होते. एका गुन्हेगाराने दुर्दैवाने त्यांच्या घरात आश्रय घेतला होता. तेंव्हादेखील जेनी हिमतीने त्या गुन्हेगाराचा काळा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत होती. मित्रांच्या मदतीने पोलिसांना बातमी मिळाली. पण चकमकीत जेनीला सुरक्षित जागी पाठवताना गोळीने तिचाच बळी घेतला होता.  


          कोटाच्या खिशातून सॅन्डीने एक छोटी डबी काढली. त्यात एक हिऱ्याची अंगठी होती.एका नेकलेस मध्ये काही काळे मणी गुंफले होते.    थडग्याशेजारी माती उकरून त्याने ती डबी तिथे पुरली. तो तेथून उठला आणि  परत  कारकडे  चालू  लागला.    कृष्णा, जेम्स आणि रीमा घरी त्याची वाट पहात होते.   गेले वर्षभर प्रत्येकाच्या मनात सावल्यांच्या छाया अधिक गडद होत होत्या. मानवी मनाचे एकेक पैलू उलगडतांना भावनांचा एकच कल्लोळ उडाला होता. प्रत्येकाला आज आपले मन मोकळे करायचे होते.


           गुन्हेगाराचा भूतकाळ  शोधणाऱ्या जेनीला  मृत्यूने गाठले होते.  सॅन्डीने डोळे मिटले. काळ्या रंगाची सावली, हळुहळू मोठी होत गेली. एका क्षणात तिने जेनीला स्वतःमध्ये सामावले. सावली नाहिशी झाली.  शिल्लक होत्या तिच्या फक्त पाऊलखुणा.. हृदयावरील जखमा आणि आठवणींच्या.


डोळ्यातले पाणी टिपताना त्याला जेनीची शेवटची हाक आठवली 'सॅन्डींऽऽ......'


क्रमशः