सावल्यांच्या पाऊलखुणा-भाग २

    सावल्यांच्या पाऊलखुणा-भाग २ 

         'ग्लोबल ट्राव्हल्स' आपल्याच ऑफिसच्या नेमप्लेटकडे पहाताना लू क्वांग छ्द्मीपणे हसला. नुकताच नूवर्क(न्युजर्सी) ते फिनिक्स(अरिझोना) प्रवास आटोपून एअरपोर्टवरून तो परतत होता. त्याने ऑफिसचे दार उघडले.    आतील गिऱ्हाईकांकडे व कर्मचाऱ्यांकडे त्याने ओझरता कटाक्ष टाकला.   आपल्या सेक्रेटरीला मागे येण्याची खूण केली. तिच्याकडून तीन दिवसाच्या गैरहजरीतील आढावा घेतला.   आपल्या खोलीतील आरामदायी खुर्चीवर त्याने स्वतःला झोकून दिले.


          सेक्रेटरी बाहेर निघून गेली. तिने सरळ केलेला दारावरचा "डू नॉट डिस्टर्ब" हा बोर्ड थोडा वेळ आंदोलने घेत होता.


           'बीप बीप' अशा आवाजाने लू क्वांगला जाग आली. त्याने निरोप बघितला.  हातातील किल्लीने एक ड्रॉवर उघडला. त्याचबरोबर त्याच्या खुर्चीच्या मागील भिंत दुभंगली होती. लू आत जाताच भिंत पूर्वव्रत झाली. लू लिफ्टमध्ये शिरला. त्याने अंगावर संरक्षक कवच चढवले. तोंडावर मास्क घातला. तळघरातील सर्वात खालच्या मजल्यावर लिफ्ट थांबली. लिफ्टचे दार उघडून तो बाहेर आला.


                सुरक्षा व्यवस्थेतून तो पुढे सरकला. बेदरकारपणे पावले टाकीत त्याने मोठ्या सभागृहात प्रवेश केला. त्याच्यासारखे पांढरे सरंक्षक पोषाख घातलेले कर्मचारी काचेच्या खोल्यात कामात दंग होते. चार हॉलवे पार करून तो सर्वात सुरक्षित व गुप्त अशा एका चेंबरमध्ये शिरला. बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांना ह्या चेंबरची माहिती होती.


               "गुड आफ्टर नून सर" डॉक्टर मुखर्जींनी क्वांगचे स्वागत केले. मुखर्जींच्या लॅबमध्ये विविध प्रकारचे संशोधन सुरु होते. धातूच्या व काचेच्या छोट्या बंद बाटल्यांकडे डॉक्टरांनी निर्देश केला. त्यात विविध जिवाणू, औषधांचे नमुने, चाचणीतून पास झालेली औषधे भरली होती. योग्य असे प्रेशर, तापमान आणि इतर आवश्यक वातावरण निर्मिती तेथे केली होती.


                  पुढचा महिना अखेरपर्यंत खात्रीलायक रिझल्टस् मिळतील असे आश्वासन मुखर्जींकडून क्वांगने घेतले.

" आणखी काही?"
"डॉक्टर जेसन यांच्याशी बोललो"मुखर्जींनी सांगितले. समाधानाने मान डोलावून क्वांग आपल्या खोलीत परत आला.


               डॉक्टर मुखर्जींनी हताशपणे डोळे बंद केले. पाच वर्षापूर्वी अमेरिकेत राहण्यासाठी हा एकच मार्ग त्यांना दिसत होता. पण काही महिन्यातच त्यांना संशोधनाचे खरे स्वरूप समजले.  तोवर सुटकेचे सर्व मार्ग बंद झाले होते.  अमेरिकेतील आणि त्यांच्या सारख्या विविध देशातील संशोधकांनाही  अनेक मार्गांनी क्वानच्या संघटनेने आपल्या जाळ्यात ओढले होते.... 


               "डॉक्टर जेसन, व्हॉटस् अप?व्हॉट कॉन्फरन्स इज धिस?" लू क्वांगने विचारले.
मेरिलंड मधील 'बेथेस्डा' या गावी मनोविकार तज्ज्ञांची एक कॉन्फरन्स भरली होती. ती संधी साधून जेम्सच्या गळ्यात एक अवघड 'केस' जेसनने मारली होती.


         क्वांगचा फोन येणार याची जेसनला खात्री होती.   जेसन  उठला. दूर जाऊन त्याने संभाषणास सुरुवात केली. तिरप्या नजरेने तो आपल्या मित्रांना न्याहाळत होता.


               जेम्स आणि रीमा हसत होते. रीमाकडे पाहाताच जेसनच्या हृदयातून एक कळ निघाली. रीमा आणि जेनी दोघींनीही त्याला नाकारले होते. रीमाच्या नकाराचे वाईट वाटून घेतले नव्हते. पण जेनीचा नकार आजवर तो विसरला नव्हता. हा जेम्स तर त्याच्या राशीलाच लागला होता. जेम्स डिसूझा आणि सॅन्डी पटेल! त्याचे बालपणीचे 'एबीसीडी' मित्र आणि स्पर्धक! हा जेम्स तर आता त्याच्याच क्षेत्रात आघाडीचा तज्ज्ञ होता. त्याला एका अवघड केसमध्ये अडकवण्याचा बेत करून जेसन कॉन्फरन्सला आला होता. ' बघू तरी दे कशी ही केस हॅन्डल करतो ते!'


"जेसन,आर यू देअर?" क्वांगच्या बोलण्याने जेसन भानावर आला.


" आय नीड टू मेक शुअर दॅट पिपल नो मी ऍज अ डॉक्टर ऍन्ड अ रिसर्चर!"जेसनने क्वांगचे समाधान केले.

" हाऊ आर जेम्स ऍन्ड रीमा?"क्वांगने बॉम्ब टाकला.


" दीस इस पर्सनल" जेसनने अनिच्छेने मान्य केले. आपल्यावर पाळत ठेऊ नये अशी त्याची विनंती लू क्वांगने सदैव फेटाळली होती. 


'आय वील बी केअरफुल' असे सांगून जेसनने फोन बंद केला. त्याच्या कपाळावरील आठ्या तीव्र नापसंती दर्शवत होत्या.


                   आपल्या हुशारीवर खुष होत क्वांगने स्वतःची पाठ थोपटली. त्याला लागणारा भरमसाठ पैसा महंमद रशीदची संघटना पुरवत होती. चिकाटी आणि बुद्धीच्या भरवश्यावर त्याने कित्येक अमेरिकन आणि भारतीयांना आपल्या मुठीत ठेवले होते. त्याच्या अंगातील चिनी रक्त अभिमानाने सळसळू लागले. बुद्धिमत्तेच्या जोरावर महंमद रशीदवर, आपल्या बॉसवर मात करण्याचे दिवास्वप्न तो पाहू लागला.


क्रमशः


 टीपः सावर्जनिक स्थळी झालेले संभाषण मुद्दाम इंग्रजीत घेतले आहे.