बोच

पाय भेगांनी पहा शृंगारले

जीवनाच्या शर्यतीचे दाखले



दोन घटका सावलीला थांबलो

तेव्हढेही का उन्हाला बोचले



तप्त वाळू मत्सराने बोलली

हिरवळीवर कोण  होते चालले



मी फुलांच्या जवळ जाऊ पाहता

नाव काट्यांनेहि माझे टाकले



एकही ना सूर जुळला सोबती

येउनी सारे समेवर फाटले



वस्त्रहरणाची पहा रीती नवी

कफनही माझे जगाने फाडले