शब्द घ्या हो, शब्द घ्या हो,
शब्द घेऊनी दाम घ्या हो,
हवे तेवढे घ्या हो उचलुन
उघड्या माझ्या या झोळीतुन...
जरा सावळा,तरी वेगळा
प्रभातकाळी माझ्या दारी
फेकित फेकित ही आरोळी
आला शब्दांचा व्यापारी....
दो रुपड्यांना चार घ्या ,
भाषाभाषांमधले घ्या,
साऱ्या भाषांची ही सारी
कौतुके जाणून घ्या....
शब्द माझे तालेवार,
करवतीची त्यांना धार
एखादा जरी खाली पडला
अनर्थ होईल अपरंपार!
या शब्दांचे सुवर्णगीत
सजले लेऊन सृष्टीसंगीत
या मणिकांचनयोगाला
गातात प्रभाती भाट!
मी आकाशाच्या राज्याचा नागरिक
मी भूमी-सौंदर्याचा उपासक
मी शब्द महालांचा पर्यटक
शब्दांचा व्यापारी-प्रचारक!
हसरे घ्या,रडके घ्या
उदास घ्या,मिस्किल घ्या,
काळे, गोरे, निळे, तांबडे,
सप्तरंगी शब्द घ्या...
भावभावना रंगवणारे,
क्षणाक्षणाला हासविणारे
रडत खेळत धडपडणारे
मजेमजेने गाणी गाणारे!
हे रत्नांचे कुबेरभांडार
घेऊन आलो खांद्यावर
द्यावयाला तुम्हां सत्वर
आलो मनाच्या वारूवर...
रंगवून टाका मने,
फुलांसम कोवळी जीवने
अनुभवा सृष्टीचे रंग नवे,
शब्दांत पकडा जे हवे....
येतो आता निरोप द्या
शब्द माझे सांभाळुन घ्या
जातो पुढच्या मी गावाला,
अमुच्या पुढच्या बाजाराला.....
अदिती
ता.क. बरीच जुनी आहे ही कविता. सुमारे १०-११ वर्षांपूर्वी लिहिलेली. मला आवडते खूप. म्हणून म्हटलं सगळ्यांना दाखवावी...