झोप

चाळवेल नीज रे, गीत तू म्हणू नको
घे कवेत, सागरा, गाज ऐकवू नको


शांत झोप दे मला, एवढेच मागणे
शीण फ़ार जाहला, आज जागवू नको


घोडखिंड ही लढू पाय रोवुनी किती
तोफ़ मूक ठेवुनी अंत तू बघू नको


लोक चोच मारुनी प्राशितात शोणिता
तर्पणास कावळे आज बोलवू नको


अर्थहीन युद्ध हे काय जिंकुनी करू
बेगडी प्रलोभने व्यर्थ दाखवू नको


पोळल्या मना हवे शब्द दोन स्निग्ध रे
तत्त्वज्ञान कोरडे, माधवा, वदू नको