महाराष्ट्र माझा : विचारप्रवर्तक

आज ई सकाळ चा हा अत्यंत हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक अग्रलेख वाचायला मिळाला. त्यावर मराठीतून चर्चा शक्य व्हावी, ह्या हेतूने तो येथे उतरवून ठेवत आहे.


ई-सकाळचा अग्रलेख : गर्जा महाराष्ट्र माझा
दि. २१ नोव्हे. २००५


संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानास आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. 'महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, मुंबई महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही,' या निर्धाराने अवघा महाराष्ट्र सर्व प्रकारचे मतभेद विसरून पाच-सहा वर्षे लढला. पोलिसांच्या लाठ्यांना, बंदुकांना सामोरे गेला. बेळगाव, कारवारचा मराठी भाग संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट झालेला नसला, तरी आजच्या संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्वसामान्यांनी केलेली लढाई म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या जीवनातील एक महत्त्वाचे क्रांतिपर्व आहे. २१ नोव्हेंबर १९५६ ला मुंबईत उत्स्फूर्तपणे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न घेऊन जनसमूह उतरला आणि काही क्षणांतच पोलिसांच्या बेछूट गोळीबारात पंधरा जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. रक्त सांडून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र जन्माला घातला. आज दिसणारा महाराष्ट्राचा नकाशा त्यांच्याच बलिदानातून निर्माण झाला आहे, याचे भान नव्या पिढीने ठेवायला हवे. मुंबई स्वायत्त असावी काय, असा विषय घेऊन मध्येच चर्चा घडवणाऱ्या मतलबी माणसांनीही हे लक्षात ठेवायला हवे. महाराष्ट्राला मुंबई कोणी दान दिलेली नाही, तर संघर्ष करून मराठी माणसाने ती आपलीच होती आणि आहे, असे पुन्हा पुन्हा सांगत ती मिळवली; स्वकियांविरुद्ध लढून मिळवली. मराठी माणसाचा श्वास म्हणजे मुंबई, हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना लक्षात ठेवायला हवे. अनेक पक्षांच्या राजकीय नेत्यांनी, आचार्य अत्रे यांच्यासारख्या पत्रकारांनी, अमरशेख, अण्णाभाऊ साठे यांसारख्या शाहिरांनी, सर्वसामान्य कामगार, शेतकऱ्यांनी लढून मिळवलेला हा संयुक्त महाराष्ट्र आहे. आपल्या प्रदेशासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन करण्याचा इतिहास अन्य कोणत्या राज्याला नसेल; पण तो महाराष्ट्राला आहे. वर्तमानकालीन लढायांना इतिहास बळ देत असतो. हा बळ देणारा इतिहास लक्षात राहावा, वीररसाने भिजून गेलेल्या या प्रदेशाची महती आपल्याला कळावी यासाठीही हुतात्म्यांचे स्मरण आणि त्यांचे कर्तृत्व आपल्या भाळी मिरवणे आवश्यक असते. वर्तमान कितीही गिरक्या घेत असला, तरी इतिहास जन्माला घालणारी माती कोणी विसरत नाही. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असला, तरी तो अधिक गतिमान करून महाराष्ट्राकडे डोळे लावून बसलेल्या त्या भागातील मराठी माणसाच्या काळजात डोकावणेही आवश्यक आहे.


संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने एकशे पाच वीरांच्या बलिदानाला अभिवादन करणारा आजचा महाराष्ट्र कसा आहे, तो जगाच्या पाठीवर नेमका कुठे नि कसा उभा आहे, कोणते प्रश्न घेऊन उभा आहे, हे समजून घेण्यासाठी 'सकाळ'ने राज्यभर व्यापक पाहणी केली. भविष्यात आपला महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील, असे एक जबरदस्त स्वप्न पाहणीत आढळले, ही सर्वांत चांगली गोष्ट म्हणावी लागेल. नव्या आणि जुन्या पिढीच्या मनात महाराष्ट्राविषयी सुंदर स्वप्ने आहेत. मात्र जागतिकीकरणाच्या युगात पोचलेल्या आणि आज हुतात्म्यांच्या त्यागाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या राज्यात सगळेच चांगले चालले आहे, असे कोणीही म्हणणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना भ्रष्टाचार हा महाराष्ट्रातला सर्वांत मोठा प्रश्न आहे, असे वाटते. राज्यकर्ते सत्ताभिमुख राजकारणात अडकल्याची, शेती, सहकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची आणि सर्वच विभागांचा समान विकास होत नसल्याचीही त्यांची तक्रार आहे. नव्या युगात मराठी भाषेला भवितव्य असेलच असे ठामपणे सांगणाऱ्यांचे प्रमाण कमी होत ते ५४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही काळजीची गोष्ट आहे. पाहणीत आढळून आलेल्या सर्वच प्रश्नांचा सरकार आणि समाजाने गांभीर्याने विचार करावा, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र सर्वांत संपन्न राष्ट्र होईल, असा सर्वसामान्य माणसाचा आशावाद असला, तरी तो फुलविण्याचा प्रयत्न सरकारला करावा लागणार आहे. संयुक्त महाराष्ट्र हे केवळ एका भूगोलाचे नव्हे, तर संपन्न महाराष्ट्राचे, सुंदर महाराष्ट्राचे, सामाजिक सलोख्याने भारलेल्या प्रदेशाचे नाव व्हायला हवे. हुतात्म्यांना अभिवादन करत असताना आपण काय हरवले आणि काय मिळवले याचाही सम्यक विचार करायला हवा. त्यामुळे भविष्यातील वाटा सोप्या होतील. आपण योग्य वाटेवरून जात आहोत का, याची खात्रीही पटेल. ज्या मुंबईसाठी अनेकांचे रक्त सांडले गेले, ती आज कोणते रूप घेऊन उभी आहे! तिच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या हजारो, लाखो कर्मचाऱ्यांचे काय होते आहे, मुंबईच्या नसांनसांत भिनलेल्या बंधुभावाचे काय होत आहे, हे पाहण्यासाठीही आजचा दिवस नक्कीच चांगला आहे, असे वाटते. हुतात्मा चौकातील वातावरणातील ध्वनी-प्रतिध्वनीसुद्धा कदाचित हेच सांगतील.