"विसू,आपलं बाळ कसं होतं रे?"

"वैशाली, अगं अशी काय करतेस?.. असं इतकं मनाला लावून घेऊन कसं चालेल सांग बरं.. अख्खं आयुष्य पडलं आहे समोर.. तूच असं करशील तर विश्वासने कुठं जायचं सांग बरं.." डोळ्यातून ओघळणारे अश्रू कसेबसे सावरत सुवर्णा वैशालीला समजावत होती पण वैशाली तिच्या विमनस्क अवस्थेत इतकी बुडली होती की तिला जणू काही कुठलेच शब्द ऐकू येत नव्हते की काही दिसत नव्हतं. शून्यात बघत असल्यासारखी ती पडून होती. वेगवेगळ्या प्रकारे तिला समजावून पाहिलं होतं सुवर्णा आणि सुरेशने पण तिला बाळ आपलं बाळ गेलं हे ऐकल्याने बसलेल्या धक्क्यातून ती बाहेरच पडत नव्हती. रडवण्याचे कित्येक प्रयत्न करून झाले पण तिच्या डोळ्यातलं पाणीच आटलं होतं जसं काही.
"सुरेश, बघ ना रे.. वैशूला अशा अवस्थेत नाही बघवत रे.. तू विश्वासला सांग ना काहितरी करायला.. "
"अगं पण त्यालाही तर धक्का बसला आहे. तोही खूपच दुःखी आहे.."
"पण म्हणून काय असलेली वैशू तरी कशी उरेल हे नको का त्याने बघायला.. कधीचं नुसतं डोकं धरून बसला आहे.. एकदाही वैशूजवळ येऊन साधी चौकशीसुद्धा केली नाही त्यानी.. हे काय वागणं झालं का? हीच का त्याची काळजी आणि हेच का त्याचं प्रेम बायकोबद्दलचं?" वैशालीची अवस्था सुधारत नाही बघून चवताळलेली सुवर्णा नवऱ्याला डाफरत होती.
"सुवर्णाऽऽ.. विश्वासच्या वैशालीवरच्या प्रेमाबद्दल मला काहीही वावगं ऐकून घ्यायचं नाही आहे. तो तिच्यासमोर जात नाही आहे, कारण तो स्वतःलाच संभाळू शकत नाही आहे अजून. त्यालाही लहान मुलं तितकीच आवडतात जितकी वैशालीला.. कळलं का?"
सुवर्णा काहीच न बोलता विश्वासशी बोलायला जायला लागली.
"सुवर्णा ऐक माझं.. त्याला एकही शब्द बोलणार नाही आहेस तू.." असं म्हणत सुरेशसुद्धा तिच्यामागे जायला लागला.
"विश्वास, काहीही कर पण तू वैशूला रडव नाहीतर तिचाही भरवसा सांगता येणं अवघड आहे.."
पूर्ण रयाच गेलेल्या चेहऱ्याने विश्वास वळला आणि गलबललेल्या स्वरात "तिचाही..?" एवढंच बोलून रडायला लागला..
सगळेचजण रडत होते.. कोणी कोणाला धीर द्यायचा हाच एक दिव्य प्रश्न होता.. थोड्यावेळाने विश्वासने कसलासा निग्रह केला मनाशी आणि तो म्हणाला,"मला हिंमत करावीच लागेल.. माझी वैशू हवी आहे मला.. कुठल्याही परिस्थितीत मी एकटं सोडणार नाही तिला.." असं म्हणून तो निघाला.. सुरेश आणि सुवर्णा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले..

ठाम मनोनिग्रह असूनही विश्वासचे पाय का कोण जाणे पण दरवाजाशी थोडेसे घुटमळले.. 'काय सांगणार आपण आता वैशूला? आपण पाहिलेली सगळी स्वप्नं संपली? आपल्या बाळीचा मी या.. या.. हातांनी अंत्यसंस्कार करून आलो.. काय सांगू मी तिला? कसा जाऊ तिच्यासमोर.. ' तरीही दुःखाचा आवंढा कसाबसा गिळत विश्वास वैशालीशेजारी जाऊन बसला.. तिचा हात हातात घेत कातर आवाजात त्याच्या तोंडून इतकेच शब्द निघाले.."वै.." आणि इतका वेळ शून्यात हरवलेली वैशाली विश्वासकडे बघायला लागली.. "वैशू, आपलं बाळ गेलं गं.." अचानक हातावरची पकड घट्ट झाली होती त्याची.. शून्यातच बघत वैशाली म्हणाली,"विसू, मला फक्त इतकंच सांग की आपलं बाळ कसं होतं रे?"
स्तिमित नजरेनी तिच्याकडे बघत विश्वास म्हणाला,"वैशू?"
"विसू, निष्प्राण असलं तरी तू बाळाला हातात घेतलंस तरी रे..  आणि मी? मी आजही तितकीच त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे जितकी कालपर्यंत होते ! अंत्यसंस्कार करायची इतकी काय घाई होती? एकदातरी डोळेभरून पाहू दिलं असतंस आपल्या बाळाला.. तुला काहितरी तर दिसत असेल आपलं बाळ म्हटलं की.. माझी पूर्णच पाटी कोरी आहे रे ! कसे होते त्याचे डोळे.. ओठ कसे होते.. कान,नाक, इवलाले हात,, चुटुकले पाय.. काही काहीच मी बघितलं नाही.. कोणासारखं होतं दिसायला? माझ्यासारखं, तुझ्यासारखं की सतत माझ्या नजरेसमोर रहातील अशा पद्धतीने तू घरात आणून लावून ठेवलेल्या त्या अनेकविध बाळांच्या फोटोंमधल्या कोण्या एखाद्या बाळासारखं?मला एकदातरी उराशी कवटाळून घेऊ दिलं असतं आपल्या बाळाला.. काय हरपलं आहे तेही माहिती नाही आता तर मला.. बाळ म्हटलं की अंधारात चाचपडतो माझा जीव आजही.. कुठूनच 'आई' अशी हाक ऐकू येत नाही.. पण किमान 'बाळ' म्हणून मीतरी कोणाला हाक मारू शकले असते रे.. " विश्वासच्या मिठीत सामावून वैशाली हमसूनहमसून रडत विचारत होती,"सांग ना रे विसू, आपलं बाळ कसं होतं रे?"