सहज सरल सापेक्षता - २

खरं तर हे पाहून आम्ही हिरमुसलो. पण यावेळी आमच्या मदतीला अल्बर्ट आला.


हा अल्बर्ट अचानक कुठुनसा आला आणि म्हणाला, "किरण त्यांचा स्रोत स्थिर वा अस्थिर असतानाच ठराविक वेगाने प्रवास करतात असं नाही तर तुम्ही स्थिर असा किंवा अस्थिर, किरण ठराविक वेगानंच प्रवास करताना दिसतील." वरकरणी ही फार मोठी गोष्ट वाटणार नाही, पण थांबा. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही वेगानं किंवा हळू जा, प्रकाश किरण तुमच्या दृष्टीने त्यांच्या नियमित ठराविक वेगानंच जातील. 


तुमच्या एका मित्राला पळू द्या आणि तुम्ही स्थिर राहा. तरीही तुम्हा दोघांनाही प्रकाशकिरण एकाच वेगानं जाताना दिसतील! विचित्र वाटतंय ना? तुम्ही परत जिथून सुरुवात केली तिथंच आला आहात. तुम्ही स्थिर आहात की नाही हे तुम्हाला ठरवता आलं नाही. दिवा असो वा नसो. म्हणजे तुम्ही स्थिर आहात का हे तुम्हाला माहीत नाही असं नाही, तर ते सत्य अस्तित्वातच नाही. 


पण हे खरं असायला यात वेळेलाही आणणं भाग आहे. कारण तुम्ही व तुमच्या मित्रानं, किरणांचा वेग मोजताना, तुलना करता यावी म्हणून वापरलेल्या तुमच्या दोघांच्या कालाच्या संकल्पनाही वेगळ्या असून चालणार नाही. मला माहीत आहे तुम्ही म्हणताय,"शक्यच नाही!, असे असूच शकत नाही." पण माझं ऐका, हे असंच आहे. आईन्स्टाईननंच सांगितले तसं. तो म्हणाला...,


थांबा मी दाखवतोच तुम्हाला. नीट लक्ष द्या. एक 'तो' व एक 'ती' घ्या. एक गाडी पण घ्या. त्याला त्या गाडीत बसवा. गाडीला रस्त्यावरून जाऊ द्या. ती, तिला इथेच राहूद्या. रस्त्याकडेला एका बाकड्यावर. ठीक? 'तो' गाडीत आहे, 'ती' बाकड्यावर. आता एक उल्का घ्या. त्या उल्केला येऊ द्या या रस्त्याकडे. समजा वातावरणातून येताना त्या उल्केचे दोन तुकडे झाले. एक रस्त्याच्या या टोकाला पडला (बाजूला नव्हे हं, टोकाला) तर दुसरा त्या टोकाला. तिला दोन्ही उल्का एकाच वेळी पडताना दिसतात.


पण त्याला एक उल्का आधी, तर एक उल्का नंतर पडताना दिसते. (तो, ज्या दिशेला जातो त्यावर अवलंबून.) आता जर दोघांनीही ''ती' स्थिर आहे.' असे मानायचे ठरवलं तर दोघेही म्हणतील की दोन्ही उल्का एकाच वेळी जमीनीवर पडल्या. ती म्हणेल, "मी स्थिर आहे, नि मी दोन्ही उल्कांना एकाच वेळी पडताना पाहिलं, आणि त्या खरोखरच एकाच वेळी पडल्या." आणि तो म्हणेल, "मी एका उल्केपासून दूर जात होतो. हे लक्षात घेतलं की, मी ही जर स्थिर असतो तर मलाही दोन्ही उल्का एकाच वेळी पडताना दिसल्या असत्या. आणि तसंच असावं. म्हणजे त्या उल्का एकाच वेळी जमीनीवर पडल्या असाव्यात." ठीक.


पण आता त्या दोघांनी जर त्याला स्थिर मानायचे ठरवलं तर! अं? कोण स्थिर आहे हे तुम्ही ठरवायचंय नाही का? चला मग त्याला स्थिर करूया. आता तो म्हणेल," मी स्थिर आहे, तेंव्हा जी  उल्का मी जात आहे त्या दिशेला पडली ती पहिली वा जी उल्का मला नंतर पडताना दिसली ती दुसरी." ती म्हणेल,"मला दोन्ही उल्का एकाच वेळा पडताना दिसल्या, कारण मी त्या रस्त्याच्या पुढील बाजूस पडलेल्या उल्केपासून दूर जात होते. हे लक्षात घेतलं तर ती उल्का रस्त्याच्या दुसर्‍या बाजूस पडलेल्या उल्केच्या आधीच पडली असेल."


तर तुम्ही पाहिलं ही 'निरपेक्ष स्थिरता' नाही म्हटल्यावर 'निरपेक्ष काळ' सुद्धा असू शकत नाही. आणि हे इतकंच नाही. तुमची अशी एका गोष्टीकडे खर्‍या रितीनं पाहण्याची क्षमता गमावल्यावर तुम्ही त्याच्या आकाराचा वा वस्तुमानाचाही खरा (निरपेक्ष) अंदाज बांधू शकत नाही. जोवर तुम्ही 'स्थिर' म्हणजे काय हे ठरवत नाही तोवर या सार्‍याची व्याख्याच अशक्य आहे. आणि जर तुम्ही हे ठरवले नाही, तर 'तो' किंवा 'ती' त्यांना हवी ती स्थिरता गृहीत धरून, जसं आपण केलं,  वेगवेगळी वस्तुमाने व आकार खरे मानू शकतात. काय? घोळ आहे ना?


आता तुम्हाला आईन्स्टाईन म्हणतो त्यातल्या काही बाबींचा उलगडा झाला असणे शक्य आहे. पण हे, आपल्याला जे पाहायचं आहे, त्याच्या निम्म्या इतकंही नाही. म्हणजे, जरी आईन्स्टाईनला वयाच्या दहाव्या वर्षीच एखाद्या गाडीने धडक दिली असती, तरी आपल्याला हे सारं आपल्या गतीनं समजलंच असतं. पण या पुढे त्यानं जे केलं तोच खरा मोठा धक्का होता.


(क्रमशः)