शर्यत ससाकासवाची !

असंच एकदा ससाकासवाचं 'कोण जास्त वेगवान?' या मुद्द्यावरून भांडण होतं. आज काय तो निकाल लावायचाच या इरेला पेटून दोघं जणं शर्यत करून काय ते कळेलच असं म्हणून एक रस्ता ठरवतात आणि त्यांची शर्यत सुरू होते. ससा खूप वेगात पळत गेल्याने लवकरच खूप पुढे निघून जातो आणि मागून कासव हळूहळू चालत येत असतं. आपण खूप पुढे आहोत या विचाराने ससा थोडीशी विश्रांती घ्यायची ठरवतो आणि एका छान सावली देणाऱ्या झाडाखाली बसतो. कधी डोळा लागला हे त्याला कळत नाही आणि कळतं तेव्हा उशिर झालेला असतो कारण तोवर कासवाने शर्यत जिंकलेली असते !

तात्पर्य : ध्येयाप्रत जाण्याच्या दिशेने करण्याच्या वाटचालीत संथ असले तरीही सातत्य टिकवल्यास यश हमखास मिळते. मार्गातच टंगळमंगळ केल्यास सहजी मिळू शकणारी जीतही मिळत नाही.

शर्यत हरलो म्हणून सशाला मनस्वी दुःख होते. "आपण का हरलो?" यावर तो खूप विचार करतो, त्याला त्याची चूक उमगते आणि तो कासवाकडे जाऊन परत शर्यत होऊन जाऊ दे, अशी मागणी करतो. कासव होकार देतो आणि परत शर्यत सुरू होते. यावेळी ससा शर्यतीचे अंतिम ठिकाण गाठेपर्यंत थांबत नाही आणि शर्यतीचा निर्णय स्वतःच्या बाजूने लावून घेण्यात सहजी यशस्वी होतो.

तात्पर्य : ध्येयाने प्रेरीत घेतलेले जलद तरीही अचूक निर्णय आणि त्यानुसार योग्य दिशेने उचललेली जलद पावले ही संथ आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांपेक्षा कधीही लवकर यश संपादीत करून देतात.

आता विचार करायची वेळ कासवावर असते. पहिली शर्यत आपण जिंकलो मग ह्यावेळेस का हरलो? याचा ते विचार करते. आपल्यातला कमीपणा भरून काढण्याची एक युक्ती त्याला सुचते आणि तो शर्यतीचं आव्हान घेऊन परत सशाकडे जातो. यावेळचा शर्यतीचा मार्ग फक्त थोडासा वेगळा असतो. ससा आव्हान स्विकारतो आणि त्यांची शर्यत सुरू होते. ससा नेहमीप्रमाणे धावत सुटतो आणि कासव मंदगतीने चालत चालत मार्गक्रमण करायला लागते. ससा धावत जातो पण मध्येच नदी लागता "आता काय करायचं?" याचा दिग्मूढ होऊन विचार करायला लागतो. यथावकाश कासव तिथे येऊन पोहोचते आणि नदीतून पोहून पल्याड जाऊन अंतिम ठिकाणी आधी पोहोचून शर्यत जिंकते.

तात्पर्य : उपजत / कमावलेले गुण जोखून त्या जोरावर आपला मार्ग निश्चित केल्यास यश हमखास मिळते.

या शर्यतींमुळे ससा आणि कासव एव्हाना एकमेकांचे छान मित्र झालेले असतात. आता एकत्र बसून ते दोघे विचारमंथन करतात. शेवटच्या शर्यतीला पूर्ण व्हायला १२ तास लागलेले असतात. याहून कमी वेळेत होऊ शकलं असतं का?, यावर विचार करताकरता दोघांचं एका युक्तीवर संगनमत होतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न करून बघण्यासाठी आता शेवटची शर्यत वेळ आणि एकेकट्या त्यांच्यासाठी प्रतिकूल असलेल्या परिस्थितीविरुद्ध जिंकायची असं ते दोघं ठरवतात आणि खेळायला सिद्ध होतात.

यावेळेस ससा कासवाला पाठीवर घेऊन नदीपर्यंत पळतो आणि मग पुढे कासव सशाला पाठीवर घेऊन नदी पोहून पार करते आणि अशाप्रकारे ते दोघे मिळून ही शर्यत १ तासातच पूर्ण करतात !

तात्पर्य : एकेकट्याने वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत असणं छानच पण इतरांचे गूण जोखून त्यांचेही त्याबद्दल कौतुक करून जोवर तुम्ही मिळूनमिसळून काम करत नाही तोवर तुम्ही उत्तमरित्या काम करू शकत असलात तरी ती पद्धत सर्वोत्तम ठरू शकत नाही.

ससाकासवाच्या या गोष्टीतून मिळणारं सर्वात महत्त्वाचं तात्पर्य : एकमेकांशी भांडण्यात शक्ती, बुद्धी आणि वेळ खर्ची घालून एकेकट्या लढवय्यांना शत्रू मानून शर्यती जिंकण्यापेक्षा योग्य पद्धतीने चांगल्या गुणांची सांगड घालून पराभवाला न जुमानता परिस्थितीविरुद्ध लढा पुकारतो तेव्हा आपण सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू शकतो.

इंग्लिश कथाकार : अज्ञात
स्वैर अनुवाद : वेदश्री

ही कथा मूळ इंग्लिशमध्ये असेल असं वाटत नाही, पण मला ती इंग्लिशमध्येच वाचायला मिळाली ! कथेची तात्पर्ये आवडली, सर्वांना सांगाविशी वाटली म्हणून हा अनुवादाचा खटाटोप. चु.भू.द्या.घ्या.