भाषाशास्त्र

भाषाशास्त्र हा तसा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे.मागे एकदा मी इथे भाषाशास्त्राबद्दल थोडीशी माहिती लिहिली होती. आज अजून थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी मला महाजालाची प्रचंड मदत झाली आहे हे साभार नमूद करून आता विषयाकडे वळते.
इंग्रजी भाषेत भाषेची व्याख्या "a cognitive system which is a part of any normal human being's mental or psycological structure" अशी केली आहे. याचा सरळ सोपा अर्थ असा आहे की "प्रत्येक मानवाच्या मानसिक/परामानसिक संरचनेचा भाग असणारी एक ज्ञानमय प्रणाली".


मंडळी हे जरा जडच झालं ना?आपण जरा वेगळ्या बाजूने याकडे बघायचा प्रयत्न करू.


 cognitive या शब्दाचा अर्थ शोधताना मला cognition या शब्दाचे



  1. The mental process of knowing, including aspects such as awareness, perception, reasoning, and judgment.
  2. That which comes to be known, as through perception, reasoning, or intuition; knowledge.

असे अर्थ सापडले. याचाच अर्थ असा की cogn या शब्दमूलाचा संबंध 'ज्ञान' या संकल्पनेशी आहे. ज्ञान ही तशी फार व्यापक कल्पना आहे. वर दिलेल्या अवतरणातच ज्ञानाचा किती प्रक्रियांशी संबंध आहे हे दिसतं. सभोवतालच्या परिस्थितीचं (जाता जाता ... परि = सभोवताल => परिस्थिती = आपल्याला वेढणाऱ्या परिसराची(पुन्हा परि! आवरा ना?) स्थिती) पंचेंद्रियं + स्थळ + काळ + मिती इ परिमाणांमधून करून घेतलेलं आकलन म्हणजे ज्ञान. हे ज्ञान आपण ज्या स्वरूपात सांगतो त्यातील एक महत्त्वाचं स्वरूप म्हणजे भाषा.


हे सगळं इथे सांगण्याचं कारण म्हणजे भाषाशास्त्राचा संस्कृत भाषेशी असलेला संबंध, संस्कृत भाषेची ज्ञानसंवर्धनाची तळमळ, आणि आहे ते ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी संस्कृत भाषेच्या स्वरूपात झालेला बदल या सर्व गोष्टींचा परस्परसंबंध आणि त्याचं महत्त्व एकदा अधोरेखित करायचं आहे..(मी भाषाशास्त्र - संस्कृत या संबंधांबद्दल जितकं वाचलंय तितकं इतर भाषांबद्दल वाचलेलं नाही आणि भाषाशास्त्राचा जन्मच संस्कृतभाषेमुळे झाला हे अभिमानाने सांगावंसं वाटतं या गोष्टी डिस्क्लेमर बरं का !)
सध्या आपण भाषाशास्त्राचा इतिहासच बघत आहोत. भाषाशास्त्र का? असं जर कोणी विचारलं तर आपण काय उत्तर देणार? भाषाशास्त्र हे सर्व भाषांच्या अभ्यासापासून वेगळं आहे कारण ते शास्त्र असलं तरीही गणितासारखं शास्त्र नाही की एक नियमांची सारणी मांडली आणि काम झाले. भाषाशास्त्र हे अगदी नवीन आणि अनोखं आहे. त्यात आजवरच्या मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाचे संदर्भ आहेत, मानवी प्रगत मनाचा आधार आहे, मानवी भावभावनांचा अभ्यास आहे, संस्कृतींच्या अंतर्गत परस्परपरिणामांचे दाखले-पुरावे आहेत, आणि एकूणच मानवाच्या मानव असण्याच्या घटकपैलूंतील एक सगळ्यात महत्त्वाचा घटकही याच्यात आहे.
प्रत्येक सजीवाच्या नैसर्गिक मूलभूत भावना कोणत्या असं विचारलं तर आहार-निद्रा-संरक्षण इ. गोष्टी सांगितल्या जातात. पण एक गोष्ट यामधे राहून गेली आहे ती म्हणजे स्वतःला प्रकट(express :( कृपया तोग्य मराठी शब्द सांगावा) करण्याची आंतरिक इच्छा. त्याचं कारण आणि माध्यम काहीही असेल पण प्रत्येक सजीव स्वतःला प्रकट करू पाहात असतो. कोकिळेचं ओरडणं, कुत्र्याचं भुंकणं, गायीचं हंबरणं, झाडाचं मोहरणं, फुलपाखरांचं रंग लेऊन उडणं या सगळ्या कृती स्वतःला प्रकट करण्याच्या उद्देशाने असतात. त्याची कारणं प्रजातीप्रमाणे कदाचित बदलतील. पण प्रगत सजीव(पृष्ठवंशीय प्राणी ज्यांच्यामधे स्वरयंत्र अस्तित्त्वात असतं) या जाणिवेच्या खूप खोलवर अंमलाखाली असतात असं वाटतं. 
याशिवाय मानव समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे संवादासाठी त्याला भाषेचा आधार घ्यावा लगतो. 'शब्देवीण संवादु' करणारे गुरू-शिष्य वेगळेच असतात पण जनसामान्य संवादासाठी भाषेवरच मुख्यतः अवलंबून असतात असे म्हणायला हरकत नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीमुळे भाषा हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनतो. पण हा घटक नैसर्गिक नसून पूर्णतः मानवनिर्मित आहे हा या सगळ्या प्रकारातला रोमंचकारी भाग आहे. मानवेतर प्राणी (जे मानवाप्रमाणे प्रगत भाषेत बोलू शकत नाहीत) त्यांची भाषा जन्मजात घेऊन येतात असे म्हणायला हरकत नाही. माणसांची भाषा मात्र जन्मजात नसते तर त्यांच्या सभोवताली बोलल्या जाणाऱ्या भाषेप्रमाणे ती बनते. गुणसूत्रांमधून भाषेचं ज्ञान पुढच्या पिढीला दिलं जात नाही . म्हणजेच मानवी मेंदूच्या चमत्कृतीपूर्ण रचनेचा हा एक आविष्कार आहे.


या सर्व गोष्टी भाषेला एक स्वतःचं असं वैषिष्ठ्यपूर्ण स्थान प्राप्त करून देतात. भाषाशास्त्र या सर्व पैलूंची दखल घेतं.


भाषाशास्त्राच्या जन्मावर संस्कृतभाषेचा निर्विवाद असा ठसा उमटला आहे. आणि त्याच्यानंतर ते स्वतःच्या अशा वाटेवरून अत्यंत झपाट्याने प्रगती करीत आहे. भाषाशास्राच्या अभ्यासासाठी संस्कृत एक खूप चांगली भाषा ठरू शकते कारण तिच्यात असणारं ज्ञानभांडार, तिचा आंतरसंस्कृती आंतरखंडीय भाषा-दुवा आणि अतिप्राचीन कालापासून भाषाशास्र असे नाव न देताही या विषयाचा तिच्यात झालेला अभ्यास.
या सर्व मुद्द्यांबद्दल विस्तृत माहिती आपण पुढच्या वेळी बघू.


प्राण्यांची भाषा आणि मानवी भाषेतले काही महत्त्वाचे फरक मात्र येथे सांगितलेच पाहिजेत


१. प्राण्यांची भाषा अप्रगत आहे. याउलट मानवी भाषा प्रगत आहे.
२.प्राण्यांची भाषा निरनिराळ्या ध्वनींची बनलेली आहे हे ध्वनी मानवाला अतिशय प्रयत्नांनी एकमेकांपासून वेगळे करता येतात. याउलट मानवी भाषा समृद्ध ध्वनीसमुच्चयाने बनलेली असून हे सगळे ध्वनी सहज वेगवेगळे ओळखता येतात.
३.प्राण्यांची भाषा 'भाषा' या श्रेणीत मोडते किंवा नाही याबद्दल संदेह आहे.
४.प्राण्यांची भाषा ध्वनींवर आधारलेली असल्यामुळे तिचा प्रसार एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे गुणसूत्रांमर्फत होऊ शकतो आणि हे तिचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ठ्य आहे. मानवी भाषा ध्वनींच्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेतून जन्माला येते आणि ध्वनीला अर्थ नसून ध्वनीसमुदयाला अर्थ प्राप्त होतो त्यामुळे गुणसूत्रांमार्फत तिचे संवर्धन होत नाही.
५. डॉल्फिन माशांच्या किंवा चिंपांझीमाकडांच्या  बाबतीत भाषेच्या बाबतीत काही वेगळ्या शक्यता समोर आल्या असल्या तरी हा अपवाद वगळता इतर प्राणीसमूह समूहामधे वाढवल्यानंतर आणि एकाकीपणे वाढवल्यानंतर त्या भाषेचे सारखेच ज्ञान प्रकट करतो. त्यांना मानवी भाषा बोलता आली नाही तरी विशिष्ट ध्वनी ते नक्कीच ओळखू-समजू शकतात. याउलट मानवी भाषा समाजवास्तव्यावर आधारित असते आणि तिचे आकलन श्रवणाद्वारे होत असते . याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही ते लोक बोलू शकत नाहीत.मानवी अपत्यांच्या उच्चारणशक्तीचा विकास जन्मानंतर होतो आणि त्यावर त्यांच्या श्रवणाचा जबरदस्त प्रभाव पडलेला असतो.


या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मानवी भाषांच्या प्रगतीबद्दल काही गूढ अनाकलनीय असे वाटू लागते कारण त्यांच्या स्वरूपाबद्दल आणि विकासाबद्दल कुठल्याच गोष्टी तात्त्विक तर्कांवर (logical reasoning) बसवता येत नाहीत. असे असूनसुद्धा भाषाशास्त्राचा अभ्यास कसा पुढे चालू आहे हे पुन्हा केव्हातरी बघूच.


--अदिती