तुझं माझं गमेना, तुझ्यावाचून करमेना(१)

(ता.क.-जाहीरात म्हणून हा लेख मी मुद्दाम परत वर आणलेला नाहीये, काही शब्दांची सुधारणा सुचल्याने आणि केल्याने तो वर आला आहे.)
वैधानिक इशाराः या लेखातील 'तो' आणि 'ती' हे पूर्णतः काल्पनिक आहेत व त्यांचे कोणत्याही खऱ्या माणसाशी/खऱ्या जीवनातील घटनांशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 
तसेच मनोगतावरील 'तो' व हा 'तो' यांच्या नावात साम्य हाही निव्वळ योगायोग समजावा.


स्थळः घर
वेळः कोणतीही
दिवसः शनिवार/रविवार/कोणताही भांडणाला सोयीचा निवांत दिवस 
पात्रेः किमान २


'हा हा हा हा ...'
त्याचं गडगडाटी हास्य ऐकून त्याची आई खोलीत डोकावली. 'काय गं, याला काय झालं अचानक?आता तर बरा होता.'
'तुम्ही लक्ष नका देऊ आई. त्याला मुन्नाभाई मधला जे डॉट अस्थाना चावला आहे.  तो राग आला की हसतो.'
ती(दबक्या आवाजात): 'गप्प बस. जास्त नाटकं करु नकोस. मी हसायला लागले ना तर आतडे तुटेपर्यंत हसेन.'
तोः 'पण मी काय करतो आहे? हसतोच आहे ना? रागावलो तर तूच तडकू इ.इ. पदव्या देतेस ना?'
तीः 'फक्त धुवून ठेवलेले पडदे खिडक्यांना परत लाव म्हटलं तर इतकं हसण्यासारखं काय आहे?'
तोः 'मी सांगितलं ना, आधी मला पेपर वाचू दे.काम करायला मी नाही म्हटलोय का?'
तीः 'पण तू केव्हाचा पेपरच वाचतो आहेस ना?पेपर काय पळून जाणार आहे?सखूचा झाडू मारुन झाला की फरश्या पुसण्याचा आत पडदे लावून झाले पाहिजेत म्हणजे पाय उठत नाहीत‍ झाडू मारायच्या आधी पडदे लावले तर त्यांच्यावर धूळ बसते.'
यानंतरः भाग २