तुझं माझं गमेना, तुझ्यावाचून करमेना(३)

याआधीः भाग २
तो(तापमान ३०० अंश) : 'त्या दिवशी तुला टॉमॅटो आम्लेट करायला सांगितलं तर चिकटवून दोन तवे खराब करुन मग 'जमत नाही' म्हणून रडत बसलीस.एका टॉमॅटो आम्लेटचा भाव दोन तवे, चिकटलेली जळकी खरवड, मनस्ताप असेल तर मी कशाला परत मागायला जाऊ?'
ती(टॉमॅटो आम्लेटचा वार जरा खोलच आहे हृद्यावर) : 'एकदा मेलं टॉमॅटो आम्लेट जमलं नाही तर कसं बोलून दाखवतोस.(हुंदका)(हुंदका)(हुंदका)'
तोः (तापमान १०० अंश. खोलीच्या दाराची कडी लावतो आणि शांतपणे उभा राहतो.)
तीः '(हुंदका)(हुंदका)(हुंदका) आधी मी अशी रडले की तू मिठीत घेऊन प्रेमाने शांत करायचास. आता साधं एक 'सॉरी' निघत नाही तोंडातून. बायको रडते, रडू दे, यांना आपला पेपर प्रिय.(हुंदका).'
तोः (शांतपणे) 'आधी तू सुद्धा प्रत्येक मुद्द्यावर माझा आणि घरातल्या माणसांचा उद्धार नाही करायचीस.'
ती(मुद्दे संपल्याने): '(हुंदका)(हुंदका)(हुंदका)(हुंदका)...'
सासूबाई(बाहेरुन) : 'तुमचं ते 'भविष्याचे वेध' लागलंय रे! '
तोः 'आपण जरा भांडण अर्धा तास लांबणीवर टाकलं तर नाही का चालणार?'
तीः 'बघा, बायकोपुढे ती मालिका महत्वाची.'
सासूबाई(बाहेरुन): 'धनू रास लागली.'
तीः (बाहेर जाऊ लागते)
तोः (अडवत)'आता का, आता का?नवऱ्यापुढे मालिका प्रिय..'
तीः जाऊदे रे, भांडणं तर नेहमीचीच आहेत, निदान पुढच्या आठवड्याचं भविष्य तरी बघूयात.
तोः 'वेडी!उगाच भांडत बसते. मी काय पडदे लावायला नाही म्हणतो?'
तीः 'माझी मी पडदे लावायला समर्थ आहे. यापुढे जन्मात कधी तुला सांगणार नाही पडदे लावायला. (डोळे पुसते)'
आणि दोघे 'वेध भविष्याचे' बघायला बाहेर पळतात.

तर मंडळी, लग्नानांतर नवराबायको जुने झाले की भांडणाला वेळ काळ आणि कारणं मुळीच लागत नाहीत. आता बघा, 'वेध भविष्याचे' मधे 'येत्या आठवड्यात कौटुंबीक कलह' असलं किंवा नसलं तरी हे दोघे दिवसभर अधून मधून भांडत राहतीलच. पण कितीही भांडले तरी एकमेकांजवळ राहणं सोडणार नाहीत. पण आपण मात्र आता यावर तात्पुरता पडदा टाकूया. (आपल्या घरातले पण पडदे लावायचेयत ना?पळा मग!!)