तुझं माझं गमेना,तुझ्यावाचून करमेना(२)

याआधीः भाग १

तोः(तिच्या लॉजिकवर नेहमीप्रमाणे हतबुद्ध होऊन) 'काहीतरी भुंगा लावू नकोस गं सकाळीसकाळी.'
तीः 'नंतर तुझ्याच मातोश्री म्हणतील, 'अजून पडदे का लावले नाहीत'?'
तोः 'प्रत्येक गोष्टीत फिरुन फिरुन बरोबर तिथेच कशी येतेस?काय संबंध? आणि बोललं तर काय होतं?'
ती(आता दुसरा मुद्दा शोधते) : 'धुतले तरी मळकट दिसतात हे पडदे.रंगच जुनाट. कितीदा सांगितलं निदान आपल्या खोलीला तरी चांगल्या निळ्या रंगाचे पडदे आणूया'
तो(आता तापमान भांडण शिजवायला परफेक्ट झालंय) : 'तुला आपला नवरा, त्याचे नातेवाईक,त्याची दाढी, त्याच्या घरातले पडदे यातलं काहीच आवडत नाही. सगळं बदलून टाक.'
तीः(३०० अंश तापमानावर भडकून) 'उगाच रविवारी मूड खराब करु नकोस. हे सर्व आवडत नाही असं मी कधी म्हटलं? नेहमीचं आहे तुझं आणि तडकू म्हटलं की राग येतो'
तोः 'अजिबात नाही राग येत. मी तडकू, अक्कलशून्य, आळशी वगैरे वगैरे आहे आणि आता मी चाललो बाहेर. जे‍वणाला वाट पाहू नकोस'
ती(आता तापमान कमी होऊन वाफेचे पाणी होत आहे) : 'थांब जरा.तुला पडदे लावायला सांगितले त्यात इतका सुतावरुन स्वर्ग गाठण्याची काय गरज आहे? रोज साधी घडी केलेली चादर कपाटात ठेवत नाहीस, आज कधी नव्हे ते एक काम सांगितलं तर आता बाहेर जाऊन सर्वांसमोर तमाशा करशील.(हुंदका)(हुंदका)'
तोः (तापमान २०० अंश) : 'मग सारखी मुद्दाम 'माझ्या घरची माणसं' वर का घसरतेस?लग्नात कार्यालयात नाश्त्याला मला आवडत नव्हते तरी फक्त पोहे होते. मी कधी तक्रार केली का तुझ्या माणसांच्या प्लँनिंगबद्दल?'
तीः (वाफेचा परत स्फोट होऊन तापमान वाढलं): 'तुला पोहे आवडत नाही हे काय त्यांना स्वप्न पडलं होतं?तमाम जनतेला पोहे आवडतात.तुला आवडत नाहीत त्यांना काय माहिती?आणि तुला आवडतात म्हणून परवा टॉमॅटो आम्लेट करणार होते तर ते खाल्लंस का?'नको' म्हणालास आणि शेवेचे बकाणे भरलेस. दुसऱ्यांच्या हातचं बरं खातोस.'