खेळणी

श्री. कमल चोपडा यांच्या 'खेलने के दिन' या मूळ हिंदी कथेचा स्वैर अनुवाद.


एक अख्खी खोली खेळण्यांनी तुडुंब भरून वाहत होती. सर्व खेळणी भंगारात विकून ती खोली रिकामी करावी अशी आईची इच्छा होती. एकतर मुले मोठी झाली होती आणि एक जण खेळण्यांकडे ढुंकूनही पाहत नव्हता. त्यातली बरीचशी खेळणी अगदी नवीकोरी जशीच्या तशी होती. 'दर वर्षी मुलांच्या वाढदिवसाला तुम्ही एक एक खेळणे आणत गेलात. खेळण्यांनी खोली भरेल नाहीतर काय ! आता भंगारवाला तरी किती पैसे देईल याचे ? फारतर ५०-१०० रुपये. यापेक्षा एक रुपयाही जास्त मिळायचा नाही.' बाबा वैतागून आजोबांना म्हणाले.


'असूदे. माझ्या नातवडांचं बालपण खेळण्यांशी खेळण्यात गेलं हे काय कमी आहे ? जर तू म्हणत असशील तर ही सगळी खेळणी मी गरीब मुलांना वाटून टाकतो. निदान सत्कार्य केल्याचं समाधान तरी मिळेल.' आजोबा म्हणाले.


आईबाबा दोघेही काहीच बोलले नाहीत. त्यांची मूक संमती गृहीत धरून सर्व खेळणी पोत्यांत भरून आजोबा औद्योगिक वसाहतीजवळच्या झोपडपट्टीच्या दिशेने निघाले.


'ही खेळणी मिळाल्यावर ती मुले किती खूश होतील. बिचारी भीक मागून काही ना काही शिळंपाकं खाऊन पोट भरतात. शिवाय अंग झाकण्यापुरते जुनेपुराणे फाटके कपडे लोकांकडून मिळवितात. पण त्यांच्या नशीबी खेळणी कुठून येणार ! ही खेळणी मिळाल्यावर त्यांचे चेहरे आनंदाने अगदी उजळून निघतील...त्यांचा आनंद पाहून मलाही फार फार आनंद होईल. मुलांना आनंद देण्यापेक्षा कुठले चांगले काम असूच शकत नाही.' असा विचार करत आजोबा झोपडपट्टीपाशी येऊन पोचले.


तिथे समोरून त्यांना फाटक्या, कळकट कपड्यातील दोन मुले येताना दिसली. त्यांना बोलावून आजोबा म्हणाले, 'मुलांनो ही खेळणी मी तुमच्यासाठी आणली आहेत. यातलं तुम्हाला आवडेल ते एक-एक खेळणं तुम्ही घ्या. अगदी फुकट. या. लाजू नका.'


आश्चर्यचकित होऊन मुलांनी आजोबांकडे पाहिले. मग ती एकमेकांकडे बघत आजोबांजवळ गेली. पोत्यातून एकएक खेळणे काढून अतिशय आनंदाने उलट सुलट करून पाहू लागली. त्यांच्या डोळ्यातली चमक आणि खुललेला चेहरा पाहून आजोबांना अतिशय आनंद झाला. पण लगेचच दोघेही कसल्यातरी विचारात गढल्याचे आजोबांना दिसले. आणि दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही क्षणांतच मावळून गेला.


'काय झालं ?', आजोबांनी विचारले.


त्यातला एकाने हातातील खेळणे पोत्यात परत ठेवले. 'ह्या खेळणं म्या घेऊ शकत नाय. म्या जरका हे घरी घेऊन गेलं तर माझ्या आयबापाला वाटंल की माझ्या मालकानं मला दिलेलं ओवरटायमाचं पैकं खर्च करून ह्या खेळणं म्या इकत घेतलं. कुनीतरी ह्या फुकटात दिलं ह्ये त्यांना सांगूनही खरं वाटनार न्हाई. आन् पैकं उडविल्या म्हनून मला मार खायला लागंल.'


लगेच दुसऱ्यानेही जड मनाने खेळणे आजोबांच्या हातात दिले. 'म्या ह्ये खेलनं घेऊन काय करू? म्या फ्याक्ट्रीत काम करतंय. तिथंच ऱ्हातंय. उजाडल्यापासून रातच्याला उशीरापर्यंतं काम करतंय. खेळू तरी कवां ? तुमी ह्ये कोनत्यातरी मुलाला द्या.'


असे म्हणून दोन्ही मुले तिथून निघून गेली. आजोबा दिङ्मूढ होऊन खेळण्याकडे आणि त्या मुलांकडे बघत राहिले.