प्रश्न कळ्यांचे, वेड्या मनांचे

                    प्रश्न कळ्यांचे, वेड्या मनांचे    (भाग-१)


         ती माझ्यासमोर खाली मान घालून उभी होती. मी तिला विचारत होते,' अग, इतकी चांगली हुशार आणि अभ्यासू मुलगी तू! अचानक तासांना बसणं बंद का केलंस? काही अडचण आहे का?' पण तिची मान काही वर होत नव्हती. मी म्हटलं,'खरं सांगू का? तू नाही सांगितलंस तरी मला माहीत आहे. तू एका मुलाला रोज भेटतेस आणि त्याच्याशी तासन्तास गप्पा मारतेस. हो ना?' ती गप्प. भोळ्याभाबड्या चेहऱ्यावर काहीसे भीतीचे भाव. घाबरू नकोस. मी शिक्षक म्हणून नाही, तुझी मैत्रीण म्हणून बोलते. ज्याला तू भेटतेस तो मस्तपैकी बाईकवर बसून असतो, तू मात्र एकदा या पायावर एकदा त्या पायावर जोर देऊन ताटकळत उभी असतेस. अग, प्रेमात पडणं चूक आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही. त्याचं जर तुझ्यावर खरंच प्रेम असेल तर तो तुझ्या करिअरच्या आड मुळीच येणार नाही. त्याला विचारून तर बघ. बारावीची परीक्षा होईपर्यंत तो थांबला तर बारावी पण पार पडेल आणि तुम्हाला एकमेकांच्या प्रेमाची परीक्षा पण होऊन जाईल. बघ, तुला पटतंय का ते?'


          तिला पटलं असावं कारण पुढच्या तासांना ती दिसू लागली आणि व्यवस्थित परीक्षा देऊन उत्तीर्णही झाली. तिच्या प्रेमाच्या परीक्षेचं काय झालं ते काही मला कळलं नाही. ते तिचं तिला कळलं म्हणजे पुरे होतं.


        हिला माझं म्हणणं पटलं म्हणून मी तिचं वर्ष वाचवू शकले, पण अशी कित्येक मुलं मी पाहिली जी झपाट्याने अधःपतनाच्या दिशेने गेली. कॉलेजचं हे वयच निसरडं असतं. तारुण्यात प्रवेश झालेला असतो. शरीर तर उमलत असतंच; पण त्याचबरोबर इतर अनेक घटक असे असतात की, जे या मुलांना वेगवेगळ्या वाटा दाखवीत असतात.


         या वयात मुलांना पालकांच्या साथसंगतीची, पाठिंब्याची, कधी शाबासकीच्या थापेची, कधी पाठीवरून फिरणाऱ्या धीराच्या हाताची नितांत गरज असते. यासाठी पालक सुजाण असण्याची गरज असते आणि हे सुजाण असणं केवळ शिक्षणातूनच येत नाही, तर अनुभवाच्या शहाणपणातूनही येत असतं. किती पालक स्वतः घरामध्ये उत्तमोत्तम पुस्तकांचं वाचन करतात? किती पालक मुलांना बोट धरून चांगल्या चित्रपटांची , चांगल्या नाटकांची ओळख करून देतात? किती पालक स्वतः चांगलं संगीत ऐकतात आणि लहानपणापासून मुलांना ऐकण्याची सवय करतात? ही यादी खूप मोठी करता येईल. तात्पर्य इतकंच की मुलांनी वाईट मार्गांना जाऊ नये असं वाटत असेल; तर त्यांना चांगलं काय हे ओळखायला पालकांनीच शिकवायचं असतं आणि त्यासाठी त्याची पहिल्यांदा पालकांना ओळख असावी लागते. स्वतः अडाणी, अशिक्षित असणारे पालकसुद्धा मुलांना चांगल्या वाटा दाखवू शकतात.


(अपूर्ण)