प्रश्न कळ्यांचे, वेड्या मनांचे

                  प्रश्न कळ्यांचे, वेड्या मनांचे (भाग-२)


          मात्र अनेक वेळा मजेला, मस्तीला चटावलेली मुलं पालकांच्या अडाणीपणाचा, तर कधी पालकांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. स्वतः अंगठाछाप असलेला माथाडी कामगार बाप आपला मुलगा सर्व विषयात नापास झालेला पाहून कळवळून आम्हांला विचारत होता,' म्हणेल तिथे ट्यूशनला घालण्यासाठी लागेल तेवढा पैसा दिला, बाई. आणखी काय करावं हो माझ्यासारख्या अडाणी माणसानं?'


          सुमारे ५०-५५ वर्षांचा, सुशिक्षित, सुसंस्कृत बाप म्हणत होता,' मॅडम, हा दिवसभर घरातच असतो. मित्रमंडळी वगैरे काही नाही. अभ्यास करत असतो. तुम्ही म्हणता तासांनाही बऱ्यापैकी नियमितपणे  बसतो. मग हा सगळ्या विषयात नापास का? परीक्षेला महिनासुद्धा राहिलेला नाही. याचे प्रिलिमचे मार्क बघून मला फार मोठा धक्का बसलाय हो! मी अगदी हतबल झालोय. मी आता काय करू? याला काही वाटतंय का पाहा? चेहरा बघा त्याचा!' असं म्हणता म्हणता बापाचे डोळे अश्रूंनी भरून आले. मुलगा गप्प! त्याच्या मनात काय चाललं होतं कुणास ठाऊक! त्याची बाजू ऐकण्याची संधी मला मिळालीच नाही. 


           मुलींची परिस्थिती आणखीच निराळी! आई वारलेली एखादी मुलगी घरचं सगळं सांभाळून, धाकट्या भावंडांचं सगळं करूनही अभ्यास करते, उत्तीर्ण होते; तर घरातून सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेल्या मुली टाचगेटिचगे, अंगप्रत्यंगांचं दर्शन घडविणारे कपडे घालण्यात, मेकपचे थर रोजच्या रोज तोंडावर थापण्यात आणि मुलांबरोबर हिंडण्यात धन्यता मानतात. कधी त्यांच्या पालकांना स्वतःच्या करिअरमुळे त्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, तर कधी त्यांना स्वतःच्या पैशापुढे त्याची पर्वा नसते. असे पालकच मुलांना खोटेपणाचे रस्ते दाखवून देतात. कधी पालकांनी मुलांवर टाकलेला अंधविश्वास त्यांना तोंडघशी पाडत असतो. त्यावेळी असा प्रश्न पडतो की, असे कोणते घटक आहेत की जे मुलांना पालकांच्या प्रेमाची, विश्वासाची कदर न करायला शिकवतात?


           हिंदी चित्रपट मुलांसमोर जीवनाची अवास्तव चित्रं उभी करतात. प्रेमाविषयी, संसाराविषयी मुलांच्या स्वप्नाळू, भाबड्या कल्पना तयार करतात; तसंच त्यासाठी गुन्हेगारी करण्याचं , शाळा-कॉलेजमध्ये गुंडगिरी करून हीरो होण्याचं शिक्षण देतात, पौगंडावस्थेतल्या मुलांच्या लैंगिक भावना चाळवतात. दूरदर्शनवरील जाहिराती तर त्यांच्या सर्व प्रकारच्या सामान्य ज्ञानात भर घालत असतात. सर्व बाजूंनी जीवनाचे चंगळवादी स्वरूप मुलांच्या कोवळ्या मनांवर इतके दाणदाण आपटत असते की, सदसद्विवेक जागृत न झालेली मुलं मोहाच्या तडाख्यात सापडतात. अशी मुलं कधी व्यसनांच्या आहारी गेलेली असतात, तर हीरोसारखे दिसण्यासाठी पैशांचा झटपट मार्ग म्हणून छोट्यामोठ्या चोऱ्या करतात.


            परीक्षेत मिळालेले गुण घरी न सांगणं, अभ्यासाचा केवळ बनाव करणं, पालकांना भेटायला बोलावल्यास बनावट, भाडोत्री पालक समोर आणून उभे करणं असे धडधडीत खोटे प्रकार आज अगदी सहज घडतात. एका मुलाला पालकांना घेऊन भेटायला बोलावलं होतं. आईवडील परदेशी गेले आहेत, मी आंटीला घेऊन आलो आहे,असं उत्तर मिळालं. मुलाचे सगळे पराक्रम कळल्यावरही आंटीच्या चेहऱ्यावरचं हसू कायम! भेटायला बोलाविणारी शिक्षिका चिडली. तिने त्यच्या घरी फोन केला तर तो त्याच्या आईनेच उचलला. ' परदेशहून केव्हा आलात' म्हणून विचारताच,'मी कधी गेले होते?' असं आईने विचारलं. ' तुमच्या मुलानेच सांगितलं' म्हटल्यावर ' मी मेले असं सांगितलं नाही हे माझं नशीब', अशी जहरी आणि विषादपूर्ण प्रतिक्रिया आईकडून आली.


          माझ्या २५ वर्षांच्या शिक्षकी जीवनात असे अनेक प्रसंग घडले. विद्यार्थ्यांच्या जीवनात लहानपणापासूनच शिक्षकाचं फार महत्त्व  असतं. लहान असताना ' आमच्या बाईंनी असंच सांगितलंय' असं म्हणत मुलं आईचं मत धुडकावून लावत असतात‌. शिक्षकाचं वागणं, बोलणं, चालणं सगळं सगळं त्यांच्यासाठी महत्त्वाचं, आदर्श असतं. शिक्षकाच्या एका शब्दाने त्यांचं जीवन सावरू शकतं,उद्ध्वस्तही होऊ शकतं.


          एखादी कळी कुस्करून टाकण्यात आनंद असतो की, तिला तिच्या पद्धतीने फुलू देण्यात असतो, हे खरं म्हणजे पालकांनी, शिक्षकांनी किंबहुना समाजाने ठरवायला हवं.


         हीच मुलं त्यांना योग्य दिशा दाखवली तर समाजाला, पर्यायाने साऱ्या देशाला पुढे नेतील. उद्याचा काळ घडविणारी ही पिढी आज आपल्या हातात आहे, याचा प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा.


       लोकसत्ता ठाणे वृत्तांत २ मार्च २००३ च्या सौजन्याने