रात्र ही यावी, सजावी रोज रात्री
हा जिव्हाळा, ही नव्हाळी रोज रात्री
मीलनाची चंदनी छेडून वीणा
श्वास गातो गंधगाणी रोज रात्री
ताल धरता या उरातिल स्पंदनांने
झिंगुनी लय अनुभवावी रोज रात्री
काळरात्री पाहिले जे स्वप्न आपण
पूर्तता त्याची घडावी रोज रात्री
चांदण्यांच्या मंचकी काया अशी ही
का चितेसम धडधडावी रोज रात्री
रोज मातीने नवा आकार घ्यावा
मृण्मयी जन्मास यावी रोज रात्री