विडंबन

विनोदाच्या नावे । ओढाव्या तंगड्या
भराव्या तुंबड्या । टवाळांनी *१


घसरावे नीट । देहव्याधीवर
फुका गहिवर । मग यावे


ऊतवावी कढी । शिळीच कितिदा
शिळाच मलिदा । पुन्हा द्यावा


एवढे करून । मिरवावे साव
लांडग्यांनी गाव । ओसंडावे


करावा अचूक । व्यंगावरी घाव
विडंबन नाव । तया द्यावे


बाळगावे शौर्य । झोडपावे जना
तोच थोरपणा । सदा माना


 म्हणवावे मग । कैवल्याची मूर्ती
निष्कलंक कीर्ती । अपेक्षावी


घातल्या घावांची । धरू नये तमा
गुन्हेगारा क्षमा । साक्ष आहे


करीत सुटावे । टिप्पण्या सुसाट
जसाकी पिसाट । वारा वाहे


आणिक करावी । वर शिरजोरी
"खिलाडू चाकोरी । सापडेना"


कुल्फी म्हणे देवा । अनाथांच्या नाथा
वाचवावे आता । विनोदाला


--कुल्फी
३.३.२००६


टीपः १. आयडी वाल्या टवाळांशी या टवाळाचा संबंध नाही