कशासाठी? पैशासाठी! -१-


कशासाठी? पैशासाठी! -१-


(Frederick Forsyth यांच्या  Money with Menaces  ह्या कथेचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न.)


ज्या क्षणाला नटकिनचा चष्म्याची केस गाडीतल्या त्याच्या सीटच्या दोन गाद्यांमध्ये अडकली त्याच क्षणाला त्याच्याही नकळत ही संकटमालिका सुरू झाली.


सॅम्युएल नटकिन हा लंडनमधील एका विमा कंपनीत काम करणारा एक सरळमार्गी, सर्वसामान्य कारकून होता. रोज सकाळी ठरलेल्या गाडीने लंडनमधील आपल्या कचेरीत जाणे आणि संध्याकाळी ठरलेली गाडी गाठून घरी परतणे हे तो गेली अनेक वर्षे करत आला होता. ह्या कचेरीतील नोकरीपूर्वी तो सैन्यात कॉर्पोरल होता. युद्ध संपल्यावर तो तिथून बाहेर पडला आणि त्याने ही नोकरी धरली होती.


आज असाच तो कामावर चालला होता. तेव्हा त्याच्या चष्म्याची केस खाली पडली आणि सीटच्या दोन गाद्यांमध्ये अडकली. ती काढताना त्याला दिसलं की गादीखाली गुळगुळीत कागदाचं एक पातळसं पुस्तक आहे. बहुधा आधीच्या प्रवाशाचं राहिलेलं आगगाडीचं वेळापत्रक असेल असा विचार करून त्यानं ते सहज पाहिलं आणि तो एकदम दचकलाच. आपल्याकडे कोणी पहात तर नाही हे तिरक्या नजरेने पाहून त्यानं ते पुस्तक पुन्हा होतं तिथेच ठेवलं. गाडीचं शेवटचं स्थानक आलं. नटकिननं उठायला जरा जास्तच वेळ लावला. सर्वजण उतरून गेल्यावर त्यानं ते पुस्तक उचलून आपल्या ब्रीफकेसमध्ये घातलं आणि तो गाडीतून उतरला. कचेरीत गेल्यावर त्यानं प्रसाधनकक्षात जाऊन ते पुस्तक नीट पाहिलं. 


'न्यू सर्कल' असं त्याचं नाव होतं. मुखपृष्ठावर एका बाईचा उत्तान वेशभूषेतील फोटो होता आणि चेहेऱ्याच्या जागी जाहिरात क्रमांक होता. आतही अशाच प्रकारचे फोटो होते आणि प्रत्येकाला जाहिरात क्रमांक होता. इच्छुकांनी जाहिरात क्रमांक देऊन पुढील पत्त्यावर संपर्क साधावा असेही लिहिले होते. नटकिनने असले मॅगेझिन आयुष्यात कधी पाहिले नव्हते पण तरीही तो एकूण काय प्रकार आहे याची नटकिनला कल्पना आली. ते पुस्तक घेऊन तो घरी आला. लेटिस-त्याची बायको बरेच दिवस संधिवाताने आणि हृदयविकाराने अंथरुणातच होती. नटकिनचं मन चळण्याचं हे एक कारण होतं. दोन दिवस तो त्यावर विचार करत होता. शेवटी तिसऱ्या दिवशी मनाचा हिय्या करून त्यानं ठरवून ठेवलेला जाहिरात क्रमांक देऊन  दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहिलं. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ते पत्र, आवश्यक ती फी व स्वत:चा पत्ता लिहिलेलं आणि तिकिटं लावलेलं पाकीट हेही त्याने सोबत पाठवलं. त्यानं आपला पत्ता खरा दिला पण नाव मात्र हेन्री जोन्स असं लिहिलं.


रोज सकाळी डाक आली की तो घाईघाईनं खाली जात होता. शेवटी सहाव्या दिवशी हेन्री जोन्स ह्या नावानं एक पत्र आलं. थरथरत्या हातांनी त्यानं ते उघडलं. छातीत घडधड होतीच. त्याच्या पत्राच्या मागच्या बाजूलाच लिहिलेलं दोन ओळींचं पत्र होतं ते :"प्रिय हेन्री, तुझ्या पत्राबद्दल आभार. मग केव्हा भेटायला येतोस? फोन करून मला केव्हा येतोयस ते कळव. माझा फोन नंबर .... .-सॅली" हे वाचून नटकिनची धडधड वाढली. त्याने जेवणाच्या सुट्टीत सार्वजनिक टेलिफोनवरून दिलेल्या नंबरावर संपर्क साधला. पलीकडून एक स्त्रीस्वर आला. नटकिनचे हात थरथरायला लागले. कसाबसा धीर गोळा करून त्याने "मी हेन्री जोन्स बोलतोय." असे  सांगितले. पलीकडे डायरीची पान उलटल्यासारखा आवाज झाला. ती बाई म्हणाली "हो, तुला माझं पत्र मिळालं न? मग केव्हा येतोस भेटायला." नटकिनने आपण दुसऱ्या दिवशी जेवणाच्या सुट्टीत येऊ असे सांगितले. ती म्हणाली "छान. आणि हे बघ. माझे सगळे मित्र मला भेटायला येताना प्रेझेंट घेऊन येतात. तर तूही येताना २० पौंड घेऊन ये. हा माझा पत्ता.." असे म्हणून तिने वेस्टएंडमधल्या एका फ्लॅटचा पत्ता त्याला दिला.


दुसऱ्या दिवशी नटकिन तिथे गेला. एका भडक मेकप केलेल्या जराशा प्रौढ बाईने दार उघडले आणि त्याला आत बोलावले. नटकिनच्या घशाला कोरड पडली होती. त्याला घाम फुटला होता. ती बाई एखाद्या लहान मुलाला समजवावे तसे अगदी मृदूपणे म्हणाली,"हेन्री, कोट-टाय काढून अगदी आरामात बस. नर्व्हस व्हायचं काही कारण नाही. बरं, माझं प्रेझेंट आणलयंस न?" हे ऐकून नटकिनने केव्हापासून वरच काढून ठेवलेले २० पौंड तिला दिले. तिने ते आपल्या पर्समध्ये घातले आणि त्याला आत घेऊन गेली.


-----------------


तीन दिवसांनी नटकिन नेहमीप्रमाणे सकाळची डाक बघायला खाली गेला तेव्हा इतर पत्रांबरोवर एक जरासा जाडजूड लखोटाही होता. कुठल्यातरी कंपनीचं माहिती पत्रक किंवा अहवाल व ताळेबंद अशा प्रकारचं काही असेल असे वाटून त्याने तो लखोटा उघडला. त्यातून काही फोटो बाहेर पडले. ते पाहून नटकिनला हे काय आहे तेच क्षणभर कळेना. कळल्यावर त्याला भीतीने ग्रासले.  फोटोंचा दर्जा काही फारसा चांगला नव्हता. म्हणजे त्या फोटोंना छायाचित्रण स्पर्धेत बक्षीस नक्कीच मिळालं नसतं पण फोटोतल्या व्यक्तींचे चेहरे ओळखता येण्याइतके स्पष्ट दिसत होते. फोटोंमध्ये सॅली नाव सांगणारी ती स्त्री आणि नटकिन स्पष्ट दिसत होते. त्याने पाकिटात काही पत्र वगैरे आहे का ते पाहिले. पण काहीच नव्हते. फोटोच इतके बोलके होते की आणखी काही लिहायची जरूर नव्हती


नटकिनला काय करावं सुचेना. शेवटी ते फोटो आणि कारपेटखाली लपवलेलं ते पुस्तक त्यानं बाहेर नेऊन जाळलं आणि त्याची राखही पायांनी बागेतल्या ओलसर मातीत दाबून टाकली. पुन्हा घरात आल्यावर त्याला वाटलं की आज कचेरीत जाऊच नये. पण मग लेटिसच्या हजार प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार. त्यापेक्षा कामावर गेलेलं बरं. नेहेमीच्या गाडीने तो कामावर निघाला. नटकिन खरं तर अगदी सरळमार्गी, पापभीरू असा माणूस होता. स्वत:शी तो म्हणाला "हा माझा पिंड नव्हे. कसं काय मी हे करून बसलो!" डोक्यात विचार चालला होता की तिला माझं खरं नाव कसं कळलं. मग एकदम लक्षात आलं की आपला कोट बाहेरच होता. त्यात पाकीटही होतं. स्वत:शी जरा मोठ्याने तो म्हणाला 'कोट आणि पाकीट'. त्याचा नेहमीचा सहप्रवासी नेहमीप्रमाणेच वर्तमानपत्रातले शब्दकोडे सोडवण्यात गर्क होता. तो 'उभा ७' मध्ये अडकला होता. 'कोट आणि पाकीट' ऐकून तो म्हणाला "बसत नाही, अक्षरं जास्त आहेत."


कचेरीत त्याचं कामात लक्ष लागलं नाही. दुपारच्या सुट्टीत सॅलीने दिलेल्या नंबरावर फोन करण्याचा प्रयत्न केला पण तो नंबर तोडला आहे असा संदेश आला. मग तो स्वत:च वेस्टएंडमधल्या त्या फ्लॅटवर गेला. पण त्याला कुलूप होतं आणि बाहेर "भाड्याने देणे आहे" चा फलक लावलेला होता. पोलिसात जाण्याचा विचार मनात आला पण त्यातील फोलपणा त्याच्या लगेच लक्षात आला.


घरी गेला तेव्हा बायकोचा मूड नेहमीपेक्षाही वाईट होता. ती म्हणाली "आज दिवसभरात तीन वेळा तुझ्यासाठी फोन आला. माझ्या झोपेचं त्यामुळे अगदी खोबरं झालं." चौथा फोन रात्री आठच्या सुमारास आला. नटकिनने हॉलमध्ये जाऊन फोन उचलला. पलीकडून आवाज आला,
"मि.नटकिन?"
"बोलतोय."
"मि.सॅम्युएल नटकिन?
"हो, तोच मी."
"की हेन्री जोन्स?"
नटकिनला एकदम पायाखालची वाळू सरकल्यासारखं झालं. उसनं अवसान आणून तो म्हणाला,
"तुम्ही कोण बोलताय?"
"माझं नाव जाऊ दे रे, पण एक सांग. तुला मी पाठवलेली भेट मिळाली की नाही?"
नटकिन एकदम घाबरून म्हणाला,
"तुम्हाला काय पाहिजे?"
पलीकडचा आवाज जरा जरबेनं म्हणाला,
"फालतू बडबड नको, फोटो मिळाले की नाही सांग."
"हो. मिळाले."
"हे बघ नटकिन, ते फोटो मी तुझ्या बॉसकडे पाठवायचा विचार करतोय,  दुसरा सेट तुझ्या बायकोकडे आणि तिसरा तुझ्या टेनिस क्लबच्या सेक्रेटरीकडे. दचकू नकोस. अरे तू तुझ्या पाकीटात आणि कोटाच्या खिशात खूपच माहिती ठेवतोस."
नटकिन अगदी काकुळतीला येऊन म्हणाला,
"अहो, असं काही करू नका. मी अगदी..."
त्याला मध्येच तोडत तो पलीकडचा आवाज म्हणाला,
"हे बघ, आता मला जास्त वेळ नाही. पण एक सांगतो. तू पोलिसांकडे जायच्या भानगडीत पडू नकोस. गेलास तर आमचं काहीच नुकसान होणार नाही. झालं तर तुझंच होईल. तुला फोटो हवेत न? आणि निगेटिव्ज सुद्धा? तुला सर्वकाही मिळेल. उद्या सकाळी आठ वाजता मी पुन्हा फोन करीन. गुड नाईट."


क्रमश: