कशासाठी? पैशासाठी! -३-

कशासाठी? पैशासाठी! -३-


पुढच्या आठवड्यात एका संध्याकाळी नटकिनच्या घराची घंटा वाजली. नटकिननं दार उघडलं. दारात पोलिसखात्यातील डिटेक्टिव सार्जंट स्माइली उभा होता. तो म्हणाला "आपण मि. सॅम्युएल नटकिन?, मी डिटेक्टिव सार्जंट स्माइली. मला आपल्याशी अं..., कसं सांगू... थोडंसं बोलायचंय." नटकिन म्हणाला "बोला न! एवढा संकोच का करताय? तुमच्या पोलिसांच्या कुठल्या तरी कार्यक्रमाची तिकिटं खपवायला आला असाल न? आम्ही घेऊ की! त्यात तुम्हाला एवढा संकोच का वाटतोय?" स्माइली म्हणाला "साहेब, मी तिकिटं खपवायला नाही, एका प्रकरणाच्या चौकशीसाठी आलोय." त्यावरही नटकिन म्हणाला "पण तरीही त्यात तुम्हाला इतकं अवघड का वाटतेय?" ह्यावर आवंढा गिळून स्माइली म्हणाला, "साहेब, मला स्वत:साठी नाही, तुमच्यासाठी संकोचल्यासारखं होतंय. तुमची हरकत नसेल तर आपण आत बसून स्वस्थपणे बोलूया का?" "चला" असं म्हणून नटकिन त्याला आपल्या दिवाणखान्यात घेऊन गेला आणि म्हणाला "आता सांगा मला, काय झालंय ते." स्माइली म्हणाला, "काही दिवसांपूर्वी आमच्या लोकांना वेस्टएंडमधल्या एका फ्लॅटमध्ये काही कामासाठी जायची वेळ आली. तिथे पाहणी करताना त्यांना इतर वस्तूंबरोबर २५/३० पाकिटंही सापडली. प्रत्येकात काही फोटो आणि त्यांच्या निगेटिव्ज होत्या. सगळेच फोटो अश्लील ह्या सदरात मोडतील असे होते. सगळ्या फोटोतील बाई एकच होती, पुरुष मात्र वेगवेगळे होते. प्रत्येक पाकिटात एक कार्ड, त्यावर त्या पुरुषाचं नाव, पत्ता इ. लिहिलेलं होतं." हे ऐकताना नटकिनचा चेहरा पांढराफटक पडला! स्माइली पुढे म्हणाला "आम्हाला असं कळलंय की ही बाई मासिकात जाहिराती देऊन पुरुषांना आपल्या जाळ्यात पकडते, आपल्या साथीदाराच्या मदतीने त्यांच्या नकळत असे फोटो काढवून घेते आणि मग त्यांच्याकडून अमाप पैसे उकळते. मि. नटकिन, मला अगदी नाइलाजानं सांगावं लागतंय की तिथल्या पाकिटात आम्हाला तुमचंही नाव-पत्ता आणि फोटो सापडले."


हे ऐकून तर नटकिननं आपलं डोकं दोन्ही हातांनी गच्च धरून ठेवलं. आत्यंतिक शरमेमुळे तो स्माइलीकडे डोळे वर करून बघूच शकत नव्हता. तो कसंबसं म्हणाला, "सार्जंट, मला माहिती नव्हतं, माझं हे वागणं बेकायदेशीर आहे."
सार्जंट स्माइली म्हणाला,"हे बेकायदेशीर आहे असं मी म्हणतच नाही."
"पण तुम्हीच म्हणालात नं की तुम्ही चौकशी करायला आला आहात?"
"हो पण ती तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल नाही. हे पहा, मि.नटकिन, जोपर्यंत कोणी कायद्याचं उल्लघंन करत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्याशी काहीही कर्तव्य नसतं आणि तुमचं हे कृत्य कायद्याचं उल्लंघन करत नाही."
"मग तुम्ही कशाची चौकशी करताय?"
"मी वेगळीच चौकशी करतोय." असं म्हणून त्याने कोटाच्या खिशातून एक फोटो काढला आणि नटकिनला विचारलं की तुम्ही हिला ओळखता का?" सॅली हे नाव सांगणारी जी बाई होती तिचाच तो फोटो होता. नटकिनने नुसतीच होकारार्थी मान हलवली. त्यावर स्माइली म्हणाला, "आता मला सांगा, तुम्हाला हिच्याबद्दल कसं कळलं?" नटकिनने चष्म्याच्या केसपासून ते तिच्या फ्लॅटवर जाऊन येईपर्यंतच सगळं सांगितलं. सांगताना त्याला किती शरम वाटत होती हे त्याचं त्यालाच माहिती.


स्माइली त्यापुढे म्हणाला, "आता मी विचारतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. त्या दुपारनंतर तुम्हाला पैशाची मागणी करणारा काही फोन, चिठ्ठी, पत्र इ., तुम्ही घरी असताना किंवा तुमच्या अनुपस्थितीत, आलं होतं का? नीट आठवून सांगा." नटकिन म्हणाला, "अजूनपर्यंत तरी नाही, कदाचित ते माझ्यापर्यंत अजून पोहोचले नसतील." संपूर्ण संभाषणात स्माइलीनं पहिल्यांदाच त्याच्या नावाला साजेसं स्मितहास्य केलं आणि म्हणाला, "आता ते तुमच्यापर्यंत पोहोचणारही नाहीत. आता सगळे फोटो आमच्या ताब्यात आहेत." नटकिन म्हणाला "त्या फोटोंचं तुम्ही काय करणार?" स्माईली म्हणाला, "तुमचे फोटो आमच्या चौकशीशी संबंधित नाहीत हे मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की ते जाळून टाकले जातील." हे ऐकून नटकिनला हुश्श झालं.


स्माइली जायला उठला तेव्हा नटकिन म्हणाला, "ज्या कोणी ह्या गुंडांची कृष्णकृत्यं उघडकीला आणली त्याचं मला खरोखर कौतुक वाटतंय. बरं, मला साक्ष वगैरे द्यायला कोर्टात यायला लागेल का?"
"नाही."
"मग ज्याने यांचं बिंग बाहेर काढलं त्याला जावं लागेल, नाही का?"
"नाही, कुणालाच जावं लागणार नाही."
"म्हणजे? तुम्ही ह्या ब्लॅकमेल करणाऱ्यांना अटक करणार नाही? पण मग ती चौकशी..."
त्याला थांबवत स्माइली म्हणाला, "आम्ही ब्लॅकमेलची चौकशी करत नाही आहोत. आम्ही खुनाची तपासणी करतोय."
नटकिनने आश्चर्यचकित होऊन म्हणाला,"खून! म्हणजे ह्यांनी खूनही केलाय काय?"
"त्यांनी खून केला नाही, कोणीतरी चक्रम माणसाने त्यांचा खून केलाय."
"काय सांगता? कसा? पिस्तूल झाडून?"
"छे छे, हे करणाऱ्याने त्यांच्या दारात एक पार्सल ठेवलं. त्या पार्सलमध्ये एक छोटीशी पेटी होती, तिची किल्लीही तिला चिकटपट्टीने लावून ठेवली होती. ह्या लोकांनी त्या किल्लीने पेटी उघडली आणि त्याचक्षणी आतील स्प्रिंग सैल पडून पेटीतील बाँबचा स्फोट झाला. त्यात ती बाई आणि तिचा साथीदार दोघेही मृत्युमुखी पडले."


नटकिन डोळे विस्फारून हे सर्व ऐकत होता. म्हणाला, "विलक्षणच आहे हे सगळं! पण हे कुणी केलं असेल? बाँब ही वस्तु काही अशी दुकानात विकत मिळण्यासारखी नाही." स्माइली म्हणाला, "सर, आता दिवस बदललेत. मुलांना हल्ली खूप गोष्टी माहिती असतात. आवश्यक ती साधनसामुग्री मिळाली तर एखादा सिक्सथ् फॉर्ममधला रसायनशास्त्राचा विद्यार्थीसुद्धा बाँब बनवू शकेल. बरंय, येतो मी."


---------------------------------


दुसऱ्या दिवशी नटकिन बाजारात गेला. काही दिवसांपूर्वी त्याने एक जुना फोटो त्याची चौकट बदलण्यासाठी दिला होता. तो आणण्यासाठी तो गेला. फोटो तयार होताच. नवी चौकट छान दिसत होती. नटकिनने तो फोटो टेबलावर त्याच्या नेहमीच्या जागी ठेवला.


फोटोत खेडेगावातील एक चर्च दिसत होतं. चर्चच्या पार्श्वभूमीवर रॉयल सेनेच्या बाँब निकामी करणाऱ्या पथकाचा गणवेश घातलेली दोन माणसे बसली होती. त्यांच्या शेजारी एका मोठ्याथोरल्या जर्मन बाँबची रिकामी पेटी होती आणि समोर एका घोंगडीवर तो बाँब बनवण्यासाठी वापरलेले असंख्य सुटे भाग रांगेने मांडून ठेवले होते. फोटोखाली लिहिले होते:

मेजर माईक हॅलोरन आणि कॉर्पोरल सॅम नटकिन ह्या "बाँब गुरूंना" स्टीपल नॉर्टनच्या गावकऱ्यांकडून कृतज्ञतापूर्वक भेट, जुलै १९४३


नटकिनने त्या फोटोकडे अभिमानाने नजर टाकली आणि गुरगुरला "सिक्सथ् फॉर्मर्स इनडीड!"


समाप्त