कशासाठी? पैशासाठी! -२-


कशासाठी? पैशासाठी! -२-


पण नटकिनची रात्र मुळीच चांगली गेली नाही. "हे काय झालं आणि आता यातून बाहेर कसं पडायचं?" हेच रात्रभर त्याच्या डोक्यात चाललं होतं. त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं -टेनिस क्लबमध्ये हे फोटो पोहोचलेत. सेक्रेटरींनी तातडीची बैठक बोलावली आहे, मि.सॅम्युएल नटकिन यांच्या सभासदत्वाचा फेरविचार करण्यासाठी. त्याच्या बॉसकडेही हे फोटो पोहोचलेत. सहकाऱ्यांमध्येही चर्चा चालू आहे. किती मानहानी! तोंड दाखवायला जागा रहाणार नाही. सर्वात वाईट म्हणजे लेटिसच्या पहाण्यात हे फोटो आले तर त्या धक्क्याने तिचा बिचारीचा प्राण सुद्धा जाईल. तो मनाशी म्हणाला काही झालं तरी लेटिसला वाचवलं पाहिजे. पहाटेपहाटे त्याचा जरा डोळा लागला पण त्यापूर्वी तो मनाशी जवळजवळ शंभराव्यांदा तरी म्हणाला की "माझा पिंड हे असं वागण्याचा नाही. हे काय होऊन बसलं!"


सकाळी बरोब्बर आठाच्या ठोक्याला फोन वाजला. नटकिन कामावर जायला तयारच झाला होता. त्याची ८:३१ ची नेहमीची गाडी त्याला पकडायची होती. त्याने फोन उचलला. पलीकडून आवाज आला "मग काय विचार केलास? फोटो हवेत न?"
नटकिन कसंबसं म्हणाला "हो, प्लीज"
"मग तुला ते विकत घ्यायला लागतील. म्हणजे आमचा खर्च तर निघाला पाहिजे न? शिवाय तुझ्यासारख्यांना जरा धडाही शिकवला पाहिजे."
नटकिननं आवंढा गिळला आणि म्हणाला
"किती पाहिजेत तुम्हाला?"
"एक हजार पौंड."
नटकिन अवाक झाला. म्हणाला
"पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत!"
"अरे मग उभे कर. कर्ज घे. घर गहाण ठेव. काहीही कर पण पैसे हवेतच. आज रात्री आठ वाजता मी तुला पुन्हा फोन करीन." एवढं बोलून त्यानं फोन बंद केला.


नटकिनने वर जाऊन बायकोचा निरोप घेतला आणि कामावर जायला निघाला पण त्याने त्याची नेहमीची ८:३१ ची गाडी पकडली नाही. त्याऐवजी तो एका उद्यानात जाऊन तिथल्या एका बाकावर बसला. त्याला विचार करायला जो निवांतपणा हवा होता तो त्याला गाडीत किंवा कचेरीत मिळाला नसता.


कुणाला एवढे पैसे उसने मागायचे म्हटलं तरी कारण काय सांगायचं? जुगारात हरलो म्हणावं तर त्याच्या मित्रमंडळीत सर्वांना माहीत होतं की तो जुगार खेळत नाही. त्याचं मद्यपानही कधीतरी थोडी वाईन पिण्यापलीकडे कधी गेलं नव्हतं आणि त्याच्या बाबतीत बाईच्या भानगडीची तर कोणी कल्पना सुद्धा करू शकत नव्हतं. कसे पैसे उभे करायचे? काय करू? काय करू? विचार करकरून नटकिनच्या मेंदूचा भुगा झाला होता.


शेवटी साडेनऊला तो बाकावरून उठला आणि एका सार्वजनिक टेलिफोनवरून त्याने आपण प्रकृतिअस्वास्थ्यामुळे आता कचेरीत येऊ शकत नाही पण  दुपारच्या सुट्टीनंतर आपण कचेरीत येऊ शकू असे बॉसला सांगितले. त्यानंतर तो बॅंकेकडे निघाला. त्याच्या डोक्यात त्याने ब्लॅकमेलसंबंधी ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी घोळत होत्या. त्याच्या मनात आलं आपण एकटे असतो, थोडे तरूण असतो तर ह्या लोकांना अद्दल धडवली असती, निदान त्या दिशेने काही तरी हालचाल केली असती. पण आता हे शक्य नाही. कारण हे करताना आपल्याला काही झालं तर लेटिसचं काय होईल? छे छे. तिची काळजी आपण घेतलीच पाहिजे.


तो बँकेपर्यंत गेला आणि बँकेच्या दारात त्याने कच खाल्ली. कर्जासाठी कारण काय सांगायचं? एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मागितल्यावर उंचावलेल्या भुवया पण त्याला कल्पनेत दिसल्या. त्याला वाटलं इथे काही आपलं काम होणार नाही, लंडनमध्येच आपल्या समस्येचं काही समाधान होऊ शकेल. तो १०:३०च्या गाडीने लंडनला गेला. कचेरीत जायला अजून बराच अवकाश होता. नटकिन फार व्यवस्थित माणूस होता. एवढी मोठी रक्कम नुसतीच खिशात ठेवणं बरं नाही असं त्याला वाटलं. त्यानं त्यासाठी एक छोटीशी कॅशबॉक्स घेतली. अजूनही बराच वेळ होता. त्याचा सदुपयोग करण्यासाठी त्याने गुलाबासाठी लागणाऱ्या खताचा एक डबा घेतला. लेटिसचा वाढदिवस जवळ आला होता, तेव्हा लागणाऱ्या केकसाठी आईसिंग शुगर घेतली. मग त्याला आठवलं की हल्ली एक उंदीर स्वयंपाकघरात त्रास देत होता, म्हणून उंदीर पकडण्याचा पिंजराही घेऊन टाकला. शिवाय घरात असावी म्हणून फ्यूज वायर, किटली दुरुस्त करण्यासाठी सोल्डरिंग आयर्न, विजेरीतले सेल्स आणि अशाच घरात नेहमी लागणाऱ्या वस्तू घेतल्या. कचेरीत जायची वेळ आता झालीच होती. बरोबर दोन वाजता तो आपल्या टेबलावर होता आणि कंपनीच्या हिशेबाचे काम करत होता. त्याच्यासारखा माणूस कंपनीच्या खात्यातून अनधिकृतपणे पैसे काढण्याचा विचार करेल ही गोष्ट अशक्य कोटीतलीच होती.


रात्री आठ वाजता फोन आला. नटकिनने तो हॉलमध्ये जाऊन उचलताच तो परिचित आवाज आला.
"पैशाचा बंदोबस्त झाला का?"
नटकिन चाचरत म्हणाला "हो, पण तुम्ही ते फोटो आणि निगेटिव्ह्ज पाठवून द्या न. आपण सगळं झालं गेलं विसरून जाऊ."
"तुला काय वेडबीड लागलंय की काय?"
"नाही, पण ह्या सगळ्या प्रकाराचा मला किती मनस्ताप होतोय तुम्हाला कल्पना नाही."
आता मात्र तो आवाज एकदम कठोर झाला. "वाटेल ते बडबडू नकोस. मी सांगतोय ते नीट ऐक आणि त्याप्रमाणे कर. जास्त गमज्या केल्यास तर मी काहीही विचार न करता ते फोटो तुझ्या बॉसकडे आणि बायकोकडे पाठवीन."
"नाही, असं करू नका. सांगा काय करायचंय ते."
"उद्या जेवणाच्या सुट्टीत टॅक्सीने अल्बर्ट ब्रिज रोडला जा. तिथून...." त्या आवाजाने त्याला कुठे, कसे ते पैशाचे पार्सल घेऊन जायचे यासंबंधी तपशीलवार सूचना दिल्या. शेवटी म्हणाला
"एक सल्ला. पोलिसांच्या भानगडीत पडू नकोस. परिणाम वाईट होतील."  सॅम्युएल नटकिनपुढे आता काही पर्यायच नव्हता. त्याला आता जरा एकांत हवा होता म्हणून तो थोडा वेळ गॅरेजमध्ये जाऊन बसला.


दुसऱ्या दिवशी जेवणाच्या सुट्टीत नटकिन पार्सल घेऊन सांगितलेल्या ठिकाणी गेला. नेमक्या ठिकाणी पोहोचायच्या जरा आधी एक माणूस फटफटीवरुन आला. त्याने डोळ्याला काळा चष्मा आणि डोक्यावर शिरस्त्राण घातले होते त्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसतच नव्हता. काही तरी पत्ता विचारण्याच्या निमित्ताने नटकिनच्या अगदी जवळ येऊन तो हळूच म्हणाला, "नटकिन, मी ते पार्सल नेतो." आणि क्षणार्धात ते पार्सल घेऊन तो फटफटीवरून तीरासारखा निघून गेला. नटकिन आ वासून त्याच्याकडे बघत राहिला. ह्या सगळ्या प्रकारातून सावरायला त्याला काही सेकंदं लागली. मग तो सरळ आपल्या कचेरीत गेला.


क्रमश: