सोनुचे अजब जग २

ऍलिस इन वंडरलँड मायबोलीत आणण्याचा प्रयत्न.


भाग पहिला             


इथे वाचा.


 भाग २


ससोबांच बिळ म्हणजे एक भूमिगत आडवा रस्ताच होता,लांबच्या लांब.पण ससोबांच्या मागे पळता पळता सोनु धप्पकन एका खोल-खोल खड्ड्यात पडु लागली. बिळ खूपच खोल होतं की सोनु स्लो मोशन मध्ये पडत होती नकळे पण किती तरी वेळ ती नुसती पडतच होती.


मध्येच एकदा खाली पाहुन आपण नक्की कुठे पडतोय याचा अंदाज घेण्याचा तिने प्रयत्न केला पण खाली मिट्ट काळोख होता.मग तिने आजुबाजुला बघायला सुरुवात केली.पूर्ण भिंत भरुन नुसती कपाटेच कपाटे होती.खाऊच्या बरण्या,चित्रांची पुस्तके असं काय काय भरलं होतं त्यांत.खुंट्यांवर काही विचित्र नकाशेही टांगले होते. नकाशांवरुन सोनुला भूगोल आठवला. "बापरे,मी इतकी खोल चाललेय की पृथ्वीच्या  मध्यबिंदुपाशी असेन. कुठला अक्षांश आणि कुठ्ला रेखांश कुणास ठाऊक?" वास्तविक अक्षांश -रेखांश म्हणजे काय याचा सोनुला काही पत्ता नव्हता.पण हुशारी दाखवणं तिला फार आवडायचं , आता ऐकायला कोणी नसलं म्हणून काय झालं.


"बहुदा पृथ्वी पार करुन,पलीकडुन बाहेर येईन मी.तिथली माणसं उलटी चालत असतील नै.खाली डोकं वर पाय. विरोधाभास."


आता मात्र ऐकायला कोणी नव्हतं त्याचं सोनुला बरं वाटलं कारण 'विरोधाभास' हा शब्द नक्कीच चुकला होता. आणि अनोळखी ठिकाणीसुद्धा कोणी आपल्याला हसु नये असं तिला वाटत होतं. "कुठला देश असेल बरं तो , इंग्लंड की अमेरिका?"


मला वाटतं , मला कुणालातरी विचारायला लागेल,ते पण इंग्रजीतून.तसं मला इंग्रजी येतं म्हणा(सोनुच्या शाळेत पहिलीपासुन इंग्रजीही शिकवायचे. "एक्सक्यूज मी मॅडम. व्हॉट नेम कंट्री? बरोबर ना?"  सोनु फाड्फाड इंग्रजी फाडत होती.


काय बाई म्हणेल ती मॅडम,"कुठली ही अडाणी मुलगी ,जिथे राहते तिथलं नाव पण माहिती नाही "


"छे,छे मला कुणी अडाणी म्हटलेलं नाही चालणार. मी गुपचुप कुठल्यातरी दुकानाच्या पाटीवर नांव वाचेन.पण दुकानाच्या पाटीवर देशाचं नाव लिहितात का?"


पडता पडता मध्येच "गुलाबजाम" असं लिहिलेली बरणी तिला दिसली. मोठ्या उत्सुकतेने तिने ती उचलली.(पडता-पडताच) पण ती बरणी रिकामी होती. वैतागुन ती खालीच फेकुन देणार होती पण खालच्या ससोबाला लागलं तर. तिने पडता पडताच खालच्या एका कप्प्यात ती बरणी ठेवली.


माझी मनी इथे असती तर किती मजा आली असती. सोबतही झाली असती पडायला. "मने,कुठे आहेस गं तू? तुला भूक तर लागली नाही ना? तू इथे असतीस तर तुला एखादा उंदीर नक्कीच मिळाला असता खायला. उंदीर नाही तर वट्वाघुळ तरी.तुला माहित्येय ते अगदी उंदरासारखंच दिसत. इंग्रजीमध्ये तर आर ए टी -रॅट म्हणजे उंदीर आणि बी ए टी -बॅट म्हणजे वट्वाघुळ. आणि तू म्हणजे सी ए टी कॅट." परत एकदा फाड्फाड इंग्रजी सुरु झालं.


"पण काय गं,कॅट इटस रॅट सारखं कॅट इटस बॅट असतं का? डज कॅट इट बॅट? डज कॅट इट बॅट ?"


हळु-हळु पडण्याचा वेग वाढु लागला आणि " डज कॅट इट बॅट ,डज बॅट इट कॅट "असं काहीतरी बोलत एका गुंगीतच सोनु खाली आदळली.