सोनुचे अजब जग- ३

यापूर्वी वाचा


     सोनुचे अजब जग - भाग १


    सोनुचे अजब जग -भाग २


                         सोनुचे अजब जग - भाग ३


"पण काय गं,कॅट इटस रॅट सारखं कॅट इटस बॅट असतं का? डज कॅट इट बॅट? डज कॅट इट बॅट ?"


हळु-हळु पडण्याचा वेग वाढु लागला आणि " डज कॅट इट बॅट ,डज बॅट इट कॅट "असं काहीतरी बोलत एका गुंगीतच सोनु खाली आदळली.


पडण्याचा कार्यक्रम संपला एकदाचा! आवाज जरी "धप्प" असा झाला तरी सोनुला अज्जिबात लागलं नाही.फ्रॉक झटकत ती आजुबाजुला पाहु लागली.वरती मिट्ट काळोख होता आणि समोर एक लांबलचक रस्ता. रस्त्याच्या टोकावर घाईघाईने जाणारे मगाचचे ससेबुवा अजून दिसत होते.


"शेपूट माझं" असे काहीसे पुटपुटत ते लगबगीने चालले होते.आज्जी जशी "कप्पाळ माझं" म्हणते ना तस्सच. त्याना गाठायला सोनु पळु लागली तर ते दिसेनासेच झाले कुठेतरी. सोनुमात्र एका भल्यामोठ्या हॉलमध्ये येऊन पोचली. हॉल कसला तो एक 'दरवाजेमहालच'  होता.बघावं तिकडे आपले दरवाजेच दरवाजे! आणि सगळे कुलुपं लावून बंद. "अय्या,मग मी आत कुठुन आले,चिवित्रच आहे सगळं."


रांगेत तिने सगळी कुलुपे खेचून उघडायचा प्रयत्न केला, पण छे, एकही उघडेना.शेवटी ती महालाच्या मध्यभागी आली. एवढ्यात तिथे एक काचेचे टेबल उपटले होते,आणि टेबलावर एक छोटीषी सोनेरी चावी. "ह्या इटुकला चावीने ही मोठाली कुलुपं कशी उघडणार बाई ?"


इतक्यात  एका पडद्यामागे लपलेलं एक पिटुकलं दार तिला दिसलं. दार कसलं . पंधरा इंचांची एक छोटीशी झडप होती ती. तिच्या कुलुपाला मात्र आपली सोनेरी चावी एकदम फ़िट्ट बसली. सोनुने झडप उघडुन पहिलं तर समोर एक बिळ, आणि बिळाच्या टोकाला एक सुंदरशी बाग होती. ''या बंद महालापेक्षा त्या बागेत कित्ती मजा येईल ना? पण उपयोग काय? या झडपेतून माझं डोकंपण जात नाहिये पलीकडे. आणि समजा गेलंच डोकं पलीकडे तर माझ्या खांद्यांशिवाय ते काय करिल बिच्चारं एकटं?"


सोनुचे विचार नुसते ऊधळत होते. "मला छत्रीसारखी स्वतःची घडी कशी करायची हे माहीत असतं तर मी नक्की तसं केलं असतं."  सकाळपासून इतक्या चिवित्र गोष्टी घडत होत्या की स्वतःला घडी घालणारी माणसे असु शकतात हे सोनुला कळलं होतं.


"या दरवाजासमोर नुस्तं डोकं फोडण्यात काय अर्थ नाही, चला बघुया टेबलावर एखादी नवी चावी प्रकटते का?"एखादी मोठी चावी किंवा 'अशी घाला स्वतःची घडी' असं लिहीलेलं एखादं पुस्तक तरी नक्किच असणार अशी तिची खात्रीच होती. पण यावेळी टेबलावर एक सुंदरशी बाटली प्रकटली होती, तायडिच्या परफ़्युमच्या बाटलीसारखी गोड. बाटलिवर लेबल होतं "पिऊन टाका".


"वा रे वा ! म्हणे पिऊन टाका. आम्हाला माहित्येय बरं काय करायचं ते. पहिल्यांदा बाटलीवर कुठे 'विषारी पदार्थ, लहान मुलांना हात लाऊ देऊ नका ' असं लिहीलं नाही ना ते पहायचं अस्तं म्हटलं!"


आईने दिलेले सल्ले बहुतांशी उपयोगी असतात हे सोनुला अनुभवाअंती (चांगलंच) कळलं होतं. म्हणजे मेणबत्तीवर जास्त वेळ बोट धरलं तर पोळतं, चाकुशी नीट  खेळलं नाहीतर हात कापतो वैगेरे,वैगेरे.


पण या बाटलीवर असं काही लिहीलं नव्हतं. हळुच सोनुने एक थेंब चाखुन पाहिला. ओ हो! काय भन्नाट चव होती. कॅडबरी, बासुंदी ,गुलाबजाम बरोबरच कैरी आणि चिंचेचीसुद्धा चव होती त्या थेंबात.तिने ती बाटली अधाशासारखी पिउन टाकली.


                                     ---- क्रमशः