मजा ऑफीसातली - १

गुढीपाडवा घरी साजरा करून परत येताना बसमध्ये झोपलेली होते आणि सकाळी ७ च्या दरम्यान मोबू एसेमेस आल्याची ग्वाही देत मंजुळवाणा किणकिणला. घरच्या वास्तव्यात काहीसा दुरावलेला मोबू आता परत माझ्या आयुष्यात महत्त्व जाणवून देता होतो आहे, याची मनोमन खात्री पटली आणि इतक्या सकाळी कोणी आठवण काढली माझी, याचा विचार करत मी निरोप बघितला..
'वेलकम बॅक. खाने के लिए कुछ खास तो तुमने जरूर लाया ही होगा, वो क्या होगा इसके बारेमे सोच रहा हूं. :D' इति रघु !
एक हास्याची लकेर चेहऱ्यावर तरळून गेली माझ्या. हापिसात रोज काही ना काही चटकमटक खायला नेणे आणि स्नॅक्स ब्रेकमध्ये चिडवाचिडवी करत सर्वांनी ते खाणे एक समीकरणच झालं आहे जणू. बाकीचे जणं दरवेळेस नुसते हमी भरतात की उद्या अमकं आणू नि तमकं आणू पण त्यांची धाव बोलण्यापुढे जाणार नाही हे माहिती असल्याने मी ते हसण्यावारी सोडून द्यायचे आणि माझ्या स्वभावानुसार रोज काही ना काही खायला न्यायचे. ह्या सर्वाचाच एक भाग म्हणून की काय हा एसेमेस आलेला.

~~~

"वेदे, व्हॉट यू गॉट फॉर अस?" हापिसात पोहोचत नाही तोवर स्वामीचा प्रश्न !
"अभी तो आई है, जरा बैठने तो दो उसे." मी सोबत आणलेली पिशवी हस्तगत करत रघु म्हणाला !
पिशवीतून एव्हाना रव्याच्या लाडवाची बाटली बाहेर निघाली होती आणि ती बघताच स्वामीचे डोळे आनंदाने लकाकले, पण माझ्याकडे बघत स्वामी,"नो वेदा, डोंट वरी. वुई विल नॉट ब्रेक द रुल. वुइ विल इट इन द स्नॅक्स ब्रेक ओन्ली." असं म्हणत बळेच मान फिरवून कामाला सुरूवात केल्याचा आव आणला त्याने.
रोजच्या कामाला सुरूवात करून भरतला ( टीएल ) मी रजेवरून परत आल्याची माहिती पुरवत, घरी कायकाय धमाल केली ते सांगितलं. माझ्यासाठी काढून ठेवलेल्या कामाची माहिती करून घेतली आणि परत माझ्या जागेवर येऊन कामाला सुरूवात केली. सगळं कसं परत पुर्वस्थितीत येत होतं, सगळेजण नेहमीप्रमाणे खुष दिसत होते. रात्रभराच्या प्रवासाने अंग कणकणलं होतं माझं पण सर्वांचे हसतमुख चेहरे पाहून सगळा शीण कुठल्याकुठे पसार झाला माझा. उत्साहात गाणी गुणगुणत कामाला सुरूवात झाली.

ब्रह्मय्या हापिसात आला तो सरळ माझ्यापाशीच. रघुने बाहेर काढून ठेवलेल्या बाटलीतले रव्याचे लाडू पाहून,"वाह ! ये हुई ना बात !! सबने ले लिए होंगे ना अभीतक? मुझे लगता हैं की ये बचे हुए सारे मेरेही लिए है. हैं ना?"
"नहीं ब्रह्म. अभी किसीको नहीं दिया हैं. मैनेभी नहीं खाया है, कल रातकोही बनाए है 'आई'ने."
"ठीक है. मैं ये मेरे पास रखता हूं. तुमको मॅनेजमेंट करना नहीं करने आएगा इतने सारे लड्डूओंका." असं म्हणत मी 'हो' म्हणतेय की 'नाही' त्याचीही वाट न बघता लाडवाची बाटली ब्रह्मय्यासोबत गुल झाली !!!
स्वामी माझ्याकडे रागाने बघत,"व्हाय यू लेट हिम गो विथ दोज लड्डूज्.. हूह? नाऊ द लड्डूज आर नो मोअर इन आवर कस्टडी.."
माझा चेहरा कावराबावरा.. मीही तर खाल्ले नव्हते ते लाडू. :((
झाऽऽलंऽऽ ! कसला स्नॅक्सब्रेक आणि कसलं काय? स्वामी-ब्रह्मचं बोलभांडण जुपलं लाडवांसाठी. रघु मला काळजीने म्हणत होता,"तुम पहलेही लेलो लड्डू, नहीं तो बादमे एक भी लड्डू नहीं मिलेगा तुम्हे ! " पण त्याने स्वतःसाठी २-३ लाडू काढून घेतले पण एकही लाडू आणला नाही माझ्यासाठी. ब्रह्म, स्वामी, विनय, असित, रघु आणि इव्हन भरतने मिळून अकरा-बारा पर्यंतच सगळे लाडू खलास करून टाकले! मला मिळाली ती फक्त रिकामी झालेली लाडवाची बाटली !!!!!

रिकामी बाटली पाहून सर्वांना लाडू आवडले याने मनाचा एक कोपरा अत्यंत सुखावला जरूर असला तरी माझ्या जीभेच्या आणि पोटाच्या रास्त तक्रारीने मात्र माझा चेहरा मात्र खर्रकन् उतरला. एकतर हे परकं शहर, त्यात मला माझ्या आवडीच्या चवीचं बनलेलं खायला मिळणं दुरापास्त झालेलं. आईने खास माझ्यासाठी बनवून दिलेले जिन्नस पुरवून पुरवून खाईन ठरवलं होतं मी, पण एकटीनेच खाणे स्वभावात नसल्याने हापिसात सर्वांसोबत हसतखेळत, गप्पा मारत खाता येईल म्हणून रव्याचे लाडू हापिसात आणलेले तर मला एक कणदेखिल शिल्लक राहिला नव्हता. ही काय पद्धत झाली का वागायची? मी सर्वांवर चिडले आणि सर्वांशी ऑफीसच्या कामाव्यतिरिक्त बोलणंच बंद केलं.

~~~

मी बोलत नाही म्हणता काहींनी सुटकेचा निश्वास टाकला तर काहींना चुकल्याचुकल्यासारखं वाटायला लागलं. मलातर तुरूंगात जाऊन पडल्यासारखं वाटायला लागलं काही क्षणातच, पण शिस्त म्हणजे शिस्त !

माझ्याशेजारी बसणाऱ्या कुटुंबवत्सल बोलक्या रघुला माझ्या रागाचं मूळ कळायला अजिबात वेळ लागला नाही. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी त्याने गव्हाच्या रव्याचा उपमा बनवून आणला ! :-)

क्रमशः