जैसे ऋतुपतीचे द्वार! (२)

कालिदासाने स्त्रियांसाठी खास सकामाः हे विशेषण वापरलं आहे. वसंतात प्रेमभावना, कामभावना द्विगुणित होतात. (वसंते द्विगुणः कामः) हा काळ कालिदासाने चितारल्याप्रमाणे खरोखरंच प्रणयकाळ!


केवळ भारतातच नव्हे, तर साऱ्या उत्तर गोलार्धात वसंताचं प्रणयाशी नातं मानलं गेलं आहे. जपानी भाषेतला एक हायकू हेच सांगतो.


'त्या दूताने देणगी दिली
आधी मोहरलेल्या प्लमच्या फांदीची
त्यानंतर एका पत्राची'


कुणीतरी प्रियकरानं आपल्या प्रेयसीच्या दूताकरवी पत्र पाठवलं व सोबत पाठवली वसंतऋतूत फुललेल्या प्लमची फांदी! त्या दूताने पत्राऐवजी ती मोहरलेली प्लमची फांदीच आधी प्रेयसीच्या हातात दिली कारण ती फांदीच प्रेमपत्राचं काम करणार होती!!


रशियामधल्या लोककथांमध्ये वसंत येतो तो प्रेमीजनांचा मित्र म्हणूनच. एका कथेत असा उल्लेख आढळतो की वसंतात उगवणाऱ्या गवताच्या सहा काड्या उपवर मुलीने हाती घ्यायच्या. दुसऱ्या उपवर मुलीने त्या तिच्या हातात इंग्रजी U चा आकार करून ठेवायच्या आणि तिने अशा गाठी मारायच्या की त्या काड्या सोडल्यावर त्याची एकमेकांत अडकणारी वर्तुळे तयार झाली पाहिजेत. तसं झाल्यास उपवर तरुणीला मनाजोगता पती मिळतो. वसंतातल्या गवतानं दिलेली ती हमीच असते.


आपल्याकडे नाही का? शंकराच्या तपोवनाचं प्रमदवनात (उपवनात) रुपांतर करण्यासाठी कामदेव वसंताचीच तर मदत घेतो.


प्रेमाचा गोडवा सर्वत्र पसरवणाऱ्या या ऋतूचं सारंच कसं मधुमधुर! ऋग्वेदात 'मधु' हा शब्द वापरूनच या ऋतूचं वर्णन केलंय.


'मधुवाता ऋतायन्ते मधुक्षरन्ति सिन्धवः-------- (१.९०.६७)


'वारे सुखकर होवोत, नद्या मधुरजल वाहून नेवोत, औषधी रात्र, उषा, पृथ्वी, स्वर्ग सारं काही सुखकर 'मधु' होऊ दे'. हा श्लोक वाचल्यानंतर 'मधुमास' या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट होतो.


साऱ्या जगताला सुखावणारा, उत्साह वाढवणारा, चैतन्य निर्माण करणारा हा वसंतऋतू! आपल्या विभूति सांगताना भगवान श्रीकृष्णाने ऋतूंमध्ये मी वसंतऋतू आहे ('ऋतूनां कुसुमाकरः') असं सांगितलंय.


भगवंत काय, ब्रह्म काय, किंवा आत्मा काय सारं काही चैतन्यमयच! त्या चैतन्याचा स्पर्श झाल्यावर मन मोहरतं, भक्तिरस फुलून येतो, चेहऱ्यावर तेजस्वी लालिमा पसरतो. वसंतरूपी चैतन्याचा या पृथ्वीला स्पर्श झाल्यावर पानंन् पान मोहरतं, झाडन् झाड फुलून येतं, लाल रंगाची उधळण करणाऱ्या फुलांमुळे साऱ्या धरेच्या मुखावरच लालिमा पसरतो.


ज्ञानेश्वरांनी काय सुरेख म्हटलं आहे पहा! 


जैसे ऋतूपतीचे द्वार I वनश्री निरंतर
वोळगे फळभार I लावण्येसी


या वसंताला शतपथ ब्राह्मणात 'संवत्सराचे द्वार' म्हटलंय. येणाऱ्या संवत्सराचं द्वार इतकं मोहक, सुंदर, उत्साहवर्धक असल्यावर संवत्सर शुभ जाणार हे नक्की.


वेगवेगळ्या कवींची, लेखकांची वसंतवर्णनं वाचताना त्यातला उत्साह, सकारात्मकता ही जाणवतेच पण चंद्रशेखर गोखल्यांनी मात्र वसंताविषयी लिहिताना सतत गतिमान असणाऱ्या कालचक्राची आठवण बोचरी केली आहे.


वाळकं पान गळताना सांगतं
वसंत आता येणार आहे
वसंत ओरडतच येतो
की मी लगेच जाणार आहे.


आयुष्यात वसंतऋतू नेहमीच फुललेला असतो असं नाही, आणि फुललेला वसंताचा बहर कधीना कधी तरी ओसरतोच ह्या वास्तवतेचं कवीनं वरील पंक्तीत चित्रण केलंय. सुखावणाऱ्या वसंतानंतर येणाऱ्या दाहक ग्रीष्माचं भान ठेवायलाच हवं, पण सकारात्मक दृष्टितूनच! वसंत ओसरला तरी तो पुन्हा फुलणारच आहे कारण तो संवत्सराचे द्वार आहे. फुललेल्या वसंताच्या कमानीखालून नव्या वर्षात शुभसंकल्प घेऊन पदार्पण करायचंय!


(समाप्त)


-धनश्री लेले.