बुरखा

फरक फक्त एवढाच
तुझ्यात नि माझ्यात,
की मला सोडलं जात नाही
वाऱ्यावर तुझ्यासारखं
तलाक, तलाक, तलाक म्हणून


एरवी
तुझी दुःखं, तुझी वेदना,
तुझी मारपीट, तुझी मुस्कटदाबी,
तुझा आक्रोश, तुझ्या किंकाळ्या,
तुझ्यावरचे अत्याचार,
तुझ्यावरचे बलात्कार
भिनत जातात माझ्या आत
कारण ते सारे
भेटतात मला
जसेच्या तसे
एकही रंगछटा
न बदलता


मी ऐकून आहे की
तुला म्हणे आंदोलन करायचंय
बुरख्याच्या प्रथेविरुध्द
अशी वेड्यासारखी वागू नकोस
अगं मी तर विचार करतेय
आंदोलन करण्याचा
की सगळ्या धर्मात बुरखा असावा
म्हणजे प्रत्येक स्त्रीला
नीटपणे लपवता येतील
ओघळणारे अश्रू,
सुजणारे डोळे,
अंगावरचे वळ,
आणि चेहऱ्यावरची वेदना
बुरख्याच्या आत