माझी देवप्रिया!

"चांदणे शिंपीत जाशी" या चर्चेवरून आठवण झाली देवप्रियेची!


 अशीच एक प्रिया!


वाकडे बोलीत जाशी भांडताना सुंदरी
का तुला माहीत नाही प्रेम माझे नंबरी !!१!!


कापतो हा जीव माझा ऐकुनि मुक्ताफळे
भासली  वाणी कडाडे दामिनी या अंबरी !!२!!


एकदा केल्या चुकीला का छळावे लाखदा
गोड तू बोलून दावी पुष्प जैसे उंबरी !!३!!


गे प्रिये आता अशी का पाहशी माझ्याकडे
भासती डोळे तुझे ते तप्त रस्ते डांबरी !!४!!


नाचतो तालावरी बोलावरी  मी डोलतो
सांग तू ही का करावी आज शिक्षा झोंबरी !!५!!


                                                    -साती काळे