पहिला पऊस--एक सु(?)खद अनुभव

आज सकाळपासुनच ढगाळ पावसाळी वातावरण होतं. काल पावसाने हलकासा शिडकावा केला होताच,त्यामुळे मनं सकाळपासुनच पावसाची वाट पहात होतं. कामं उरकता उरकता खिडकीतुन आभळाकडे पाहुन आढावा नकळतच घेतला जात होता.


आज पाऊस येणार


आज पाऊस येणार


गेल्या काही दिवसातल्या सुर्याच्या उष्णतेने लाही-लाही झालेली धरणी या शितल शिडकाव्याची आतुरतेने वाट पहात होती. आणि मीसुद्धा!


नकळत मिलिंदच्या गारवातल्या ओळी गुणगुणु लागले, ग़ा...रवा!!


विज आणि पावसाची मैत्री सर्वद्यात आहेच. त्यामुळे कृत्रिम झाली म्हणुन काय झालं? घरातली विज(सकाळचे अडीच तास सोडुन) ३ ते ४ वेळा पावसाच्या स्वागताला जाऊन आली!


दुपारनंतर छान वारा सुटला. माझी क्लिनीकला जायची वेळ होत आली होती. रेनसुट काढावा की नाही म्हणत मी रेंगाळत होते, इतक्यात वारा आडवा तिडवा वहायला लागला.  ढगांचा गडगडाट,विजांचा कडकडाट असा साग्रसंगीत कार्यक्रम सुरु झाला. मी आनंदुन गेले.


आणि बघता बघता आडवा तिडवा जोरदार पाऊस सुरु झाला. मृदगंध छातीत भरुन घेताना मनाचे समाधान होइना.


गा..रवा


पाऊस जरा कमी झाल्यावर निघाले. विचार केला आज निवांत पाऊस अनुभवत जाऊया! रेनसुट वगैरे चढवुन आमची स्वारी निघाली. सोसायटीतुन बाहेर येऊन रोडला लागतानाच तांबड्या पाण्याचा खळाळता लोंढा स्वागताला तयार! मी त्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघाले,


गा..रवा!


थोडं पुढे येताच एक बहाद्दर स्कुटर हातात घेऊन वाहनांना न जुमानता रस्त्यातुन आडवा पळत चालला होता. कचकचुन ब्रेक दाबताना मागचं चाक लटपटलं.


अरे!!!म्हणत मनात उठ्णाऱ्या चिडक्या तरंगांना मी दाबलं.


गा..रवा!


मग सिग्नलवर पुन्हा पाण्याचा पाट. हिरव्या दिव्याची  प्रतिक्षा करत थंड वाऱ्याचा झोत अनुभवत मीही सुखावत होते, इतक्यात एक आठ-नऊ वर्षांची चिमुरडी (भिकारी म्हणवत नाही) आपल्या दिड दोन वर्षांच्या भावाला छातीशी धरुन त्या पाण्याच्या लोंढ्यातुन पलिकडे जाताना दिसली. तिच्या अंगावर रेनकोट वगैरे नव्हता, लहानग्याच्या अंगावर तत्सम काहीतरी होते. मी माझ्या रेनसुट वरुन एकदा नजर फिरवली.


गा..रवा!


हं....


सिग्नल सुटला (की मी?). आमची स्वारी पुढे निघाली. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला( की रस्त्यावर) डावीकडे गटाराचं काळं पाणी वरच्या झाकणाला न जुमानता रस्त्यावर वहात होतं. त्यांची घाण आणि वासं!!


गा..रवा!


झालं.


आणखी पुढे गेलो तर आमच्या स्वागताला खोदलेला रस्ता, मातीचा ढिग, उरल्या- सुरल्या रस्त्यावर मातीचा निसरडा चिखल!


गा..रवा!


रस्ता काही संपत नव्हता. पुढे रस्त्याच्या एका कोपऱ्यावर छोट्याश्या गोलात वाढवलेली हिरवळ पाहुन मनाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला.


गा..रवा!


मी स्वातःलाच बजावल!


निराशावादी विचार नको. घाण, गटारे, चिखल, माती, गरीबी, दारिद्र्य आणि भिकारी याकडे तु पाहु नको.


छान पहिला पाऊस अनुभव,


सुखद गारवा,


थंड वारा,


मृदगंध व्यापी आसमंत सारा.


सु(?)खद पहिला पाऊस अनुभवावा!!!!!!!