मेघ राग

रे म प नी नी प म ... रे म म रे .... नीं पं
कित्येक वर्षांपूर्वीची मे महिन्यातली एक दुपार. माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या उत्तरार्धाचा काळ.
मी त्या अवेळी रविकांताच्या अरण्येश्वरातल्या घरी का आलो होतो आणि ती एल्पी रेकॉर्ड लावून ठेवून तो मला एकट्याला सोडून कुठे निघून गेला होता देव जाणे. अमीरखाँनी गायिलेला मेघ राग.... त्या काळात तो तितकासा प्रचलित नव्हता आणि मी तरी कुठे एवढा जाणकार होतो तेव्हा. कोण अमीरखाँ आणि हा कुठला राग चाललाय या जुजबी कुतूहलापोटी ऐकू लागलो.
आणि तो धीरगंभीर आवाज ऐकता ऐकता हरवून गेलो. मी, ती दुपार, निळे आकाश, त्या आकाशात दाटून आलेले ढग व पार्श्वभूमीत अमीरर्खाँच्या आवाजाची जादू हे सोडून काही उरले नाही.
नीं
सा रे म नी प "बरखा रितु आ .." मंद्र पंचमावरची सम -
झूमऱ्याची अतिविलंबित लय, आलापांतला धीमा गडगडाट, मध्येच वीज चमकून जाणे, अजून पावसाचे चिन्ह नाही. काहीतरी होणार आहे ही अपेक्षा, पण काय होणार आहे, कोण येणार आहे ते कळत नाही. उत्कंठा खरी, पण मारव्याची कातर हुरहूर नव्हे, काहीतरी चांगलंच होणार आहे का अशी प्रतीक्षा!
जेमतेम वीस मिनिटांचा सारा खेळ, पण आयुष्यभराचा ठसा उमटवून गेला मनावर. तेव्हापासून मेघ म्हणजे अमीरखाँ हे समीकरण मनात पक्कं बसलं.
तसा मेघ राग मैफ़िलीतसुद्धा सहजासहजी ऐकायला मिळणारा नव्हता, तो काही मियाँमल्हार-गौडमल्हार नव्हता येताजाता कोणीही गावा अशापैकी. एकदा चुकून दिसला सुधीर फडक्यांच्या एका चित्रपटगीतात "आज कुणितरी यावे" च्या तिसऱ्या कडव्यात - "सोडुनिया घर नाती गोती, निघून जावे तयासंगती, कुठे तेही ना ठावे", तिथेही तीच काहीतरी घडण्याची, कोणीतरी भेटण्याची अपेक्षा-उत्कंठा.
मग मधूनच सई परांजपेंच्या चित्रपटातले एक गीत - कोण्या राजकमलचे संगीत आणि येशुदासचा घोटीव पण मखमली आवाज - "कहॉसे आये बदरा...".
असा मेघ भेटत राहिला. पुढे कर्नाटकात शिकायला गेलो, तिथे कळलं की त्यांच्या संगीतातही तो आहे "मध्यमावती" या नावाने.
मग नोकरीला लागलो, संसारात पडलो आणि आकाशात रहाणाऱ्या माझे पाय जमिनीला लागले. अक्षरशः रस्त्यावर आलो म्हणाना. शास्त्रीय संगीतावरचे प्रेम आता पातळ होऊ लागले. त्यातही एकदा रस्त्याने जाताना हाक ऐकू आली "महा भाऽऽऽरत" - अरेच्च्या, इकडे कुठे आला मेघ? नंतर ती हाक येतच राहिली, सगळ्यांना वीट येईपर्यंत. याचेही संगीत राजकमलचेच. कोणी म्हणाले, "अहो, त्यांच्या घराण्याचा तो राग आहे, त्यांच्या सगळ्या संगीतात तो येतोच." असेही असते का? माझा तो मेघ राग आता कोणाच्यातरी घराण्याचाही झाला?
अगदी तसेच नव्हते. एकदा शंकराभरणम नावाचा तेलगू चित्रपट आला होता, त्यात परिस्थितीने कोंडमारा झालेल्या शंकरशास्त्रींची आर्तस्वरातली आळवणी ऐकू आली, "शंकरा, नादशरीरापरा, वेदविहारा हरा, जीवेश्वरा", तो मेघ/मध्यमावतीच होता ना? मेघ रागाचा उत्कंठेचा गाभा इतरांना ज्ञात नव्हताच असे नव्हते. बाबूजींचे सुपुत्र श्रीधर फडके यांनाही तो भावला आणि सुरेश वाडकरच्या आवाजात "येईहो विठ्ठले, भक्तजनवत्सले" हा मेघ त्यांनी जणू माझ्यासाठी दिला.
अशीच वर्षे लोटली आणि मी रस्त्यावर रुळून गेलो तशी एक विचित्र गोष्ट घडू लागली. जिथे-तिथे मेघ दिसू लागला. कोपऱ्याकोपऱ्यावर, एफ़ेम रेडिओच्या सगळ्या चॅनेल्सवर, हल्लीच्या सोणिये-माहीवेवाल्या भ्रष्ट सिनेसंगीतातही मेघाची लक्षणे दिसू लागली.
"तू यार, तूही दिलदार, तूही मेरा प्यार, तेरा मेरे दिलमें है दरबार ..."
"आजा सोणिये, आजा सोणिये ..."
काल-परवा आणखी एकदा मेघाची वीज चमकली -
"दिलविच हलचल कर गयी, अँखियोंसे गल कर गयी, हो .."
मी बावचळून विचार करू लागलो - हे काय झालं? माझा आकाशातल्या ढगात रहाणारा मेघ टाकी गळून रस्त्यावर सांडून गेला की काय? मेघ बदलला की मी बदललो? आता याला तोच मेघ तरी कसे म्हणू? आणि इतक्या वर्षांनंतर हा परका वाटणारा मेघ मला काय दाखवणार आहे?
तेव्हा माझंच मन मला हळुवारपणे म्हणालं, "मित्रा, निसर्ग आणि संगीत ही तुझी एकट्याची मत्ता नाही.  निसर्गाप्रमाणे संगीताचीही कृपा सर्वांवर सर्व काळी सारखीच असते. तेव्हाही होती. तुला हे तेव्हा कळलं नाही, आत्ता कळतंय एवढंच. अरे, ते संगीत खरं, हे खोटं, ते महान, हे क्षुद्र असं काही नसतं. तुला जे मिळालं ते इतरांना मिळालं नाही असं का तुला वाटतंय?
पण आता तुझा तो काळ गेलाय आणि बेट्या, तो तूही गेला आहेस त्याच्याबरोबर.
त्या जुन्या मेघाची आठवण जरूर ठेव, मात्र या क्षणी वातावरणात भरून राहिलेला नादरूप शरीराचा - नादशरीरापर - असा हा  मेघ तू पहा - हाच तुला पुढची सोबत करणार आहे."
मग मी म्हणालो, तो पूर्वीचा मेघ अमीरखॉंबरोबर गेला - सुखेनैव जाऊ दे त्याला, आतापासून हा माझा मेघ !
------------------------------------------------------------
तळटीपः
हा लेख खरा वरच संपलेला आहे, पण दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली ती सांगतो.
पाश्चात्य संगीतात सिंफ़नी असते तिच्यात एकाच वेळी एकापेक्षा अधिक वाद्ये किंवा आवाज एकमेकांबरोबर एकाच वेळी ऐकू येत असतात.
कधीकधी एकच स्वरावली, स्वररचना, वेगवेगळ्या आवाजात/वाद्यांमधून थोड्या थोड्या क्षणांच्या अंतराने येते. याला म्हणतात "फ़्यूग".
तुमच्या ध्यानात आले का, की मनोगताच्या या अखंडित वाजणाऱ्या वाद्यमेळात आताच एक फ़्यूग झाले - वेदश्री, तात्या व मी यांच्या भिन्न आवाजांत?