वाहन देवता


मुंबईतल्या पारशांचे शौक तीन. घोलवड-डहाणु-बोर्डी येथे चिक्कूंची बाग, कुत्रा किंवा मोटार! आधीच बावाजी, त्यात मोटारीतला किडा, मग काय विचारता! माझे भाग्य थोर म्हणून असा एक अफलातून बावाजी मला लाभला आहे. पेसी साहेब. अगदी अस्सल खानदानी बावाजी. पाच बगीच्यात घर, मुलगा परदेशी, गाडीचे वेड वर थोडासा सटकीलपणा अश्या खानदानी मुंबईकर पारशाच्या सर्व लक्षणांनी युक्त असे पेसी साहेब.


साडे पाच फूट उंची, गोरा वर्ण, तरतरीत नाक, प्रसन्न चेहरा, सोनेरी काड्यांचा चष्मा आणि वयावर मात करणार काळेभोर केस आणि अमाप उत्साह म्हणजे पेसी साहेब. रुबाबदार कपडे, पांढरा किंवा फिकट निळा पूर्ण बाह्यांचा सदरा, कडक इस्त्रीची गडद निळी वा काळी विजार, गळ्यांत रेशमी कंठबंध आणि पायांत चकचकीत काळे बूट. म्हातारा ६७-६८ च्या आंसपांस सहज असेल पण एकूण वावर आणि चपळाई तरुणाला लाजवेल अशी. अत्यंत मिठास भरलेला आवाज, समोर आलेल्या प्रत्येकाला अभिवादन करून त्याची हालहवाल विचारायची लकब. आमच्या कंपनीतला कर्मचारी क्रमांक एक - थेट १९५८ सालापासून म्हणजे जवळपास ४८ वर्षांचा प्रवास. ७-८ वर्षांपूर्वी कारखान्याचे महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले तरी त्यांना कंपनीशिवाय आणि कंपनीला त्यांच्याशिवाय कसे करमणार? ताबडतोब पेसी साहेब सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांचे कामाचे स्वरूप काहीही असो, त्यांचे खरे आवडते काम म्हणजे गाडी.


पेसी साहेबांची गाडी परीक्षा ही एखाद्या वैद्याच्या नाडीपरीक्षेपेक्षा भारी. घरात कार्य निघाले की पहिली अक्षत गणपतीला, तशी कुणालाही गाडी घ्यायची तर पहिली आठवण पेसी साहेबांचीच येणार. आमची त्यांची तर खास दोस्ती. अर्थात खानदानी बावाजीचे सगळेच 'दोस्त' त्यात वय, जात, अधिकार वगरे क्षुल्लक बंधने नसतात. मग समोरचा कुणीही असो. 'पेसी साहेब, जरा वेळ आहे का?' असे विचारताच पटकन जवळ येऊन खांद्यावर हात ठेवून पेसी साहेब म्हणणार, 'बोल ने दोस्त'. माझी आणि त्यांची पहिली ओळख मोठी अविस्मरणीय. साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. मला एक वापरलेली गाडी घ्यायची होती. मी कंपनीत तसा नवीनच होतो. कुणीतरी मला बावाजीचे नांव सुचवले. वर सांगितलेही की बघ जमताय का नाहीतर म्हातारा सर्किट आहे. सरळ हाकलून देईल. मी साहेबांच्या खोलीत संध्याकाळचा जरा बिचकतच शिरलो. आधी वेळ मागून घेतलेली होती. तरीही थोडी धाकधूक होतीच. 'बोल ने, काय काम हाय तुजा?' असे स्वागत करताच मी सांगितले की मला एक गाडी घ्यायची आहे आणि गाडीतले तर काही समजत नाही. मग मी त्यांना वेळ असेल तेंव्हा गाडी बघायला याल का असे विचारताच ते उत्साहाने म्हणाले की येणार का म्हणजे? साला गाडी बघायला काय म्हुरत लागतो? चल मस्त उद्या सकाळीच जाऊ.


दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परळला त्या गाडीच्या मालकाकडे गेलो. उगाच चहा पाण्याचे सोपस्कार टाळून बावाजी थेट मुद्द्यावर आला, "भाव, तुझी गाडी कुठे ते पयला दाखव". मालक गुजराथी होता. पक्का व्यापारी. त्याचे त्याच्या गाडीचे गुणवर्णन चालूच होते.गाडी जवळ येताच बावाजीने एकवार गाडी निरखून बघितली. खाष्ट सासू देखिल 'पाहण्याच्या' कार्यक्रमात सुनेला इतकी बारकाईने बघत नसेल. गाडीला एक प्रदक्षिणा घालून झाल्यावर बावाजी सरळ गाडीच्या समोर उभा राहिला व मालकाला त्याने बॉनेट उघडायला सांगितले. मालकाने ते उघडताच बावाजीने मालकाला आत बसून गाडी सुरू करायला सांगितली. यंत्र दोन मिनिटे घरघरले. गाता गाता गवई बेसुर होताच रसिक श्रोता चुकचुकतो तसे मान हालवत पेसी साहेब ओरडले - 'बंद कर.' 'एकदम फेल! गाडी नको आमाला'. तो गुज्जु अवाक झाला. म्हणाला, 'काय साहेब अहो काय फर्स्टक्लास गाडी आहे, नवीन बॅटरी, नवीन टायर, मऊ सीटस .." त्याला मघेच तोडत पेसी साहेबांनी विचारले, "दोस्त, एक विचारू, पण तू रागावणार तर नाय ने?" "हेहे, कशाला रागावते पर बोला तर खरा" त्याचा दिलासा. मग बावाजी पुढे सरसावत म्हणाला, "दोस्त, एक सांग मला, डोकं नसलेला बायडीला चकाचक साडी घालून नी ज्वेलरी घालून आणली तर तू लगन करेल का तेच्यासंग?" "अरे साला ते सीट नी टायर काय बोलते, तुझा इंजिन तर सडून गेला.  आमचा मेनेजर लोक कंपनीचा काम करेल का रस्तामदी गाडीला धक्का मारेल?" त्या गुजराथ्याची वाचाच गेली. मग माझ्याकडे वळून बावाजी म्हणाला, "दोस्त, तू मला बोलावला ते बरा केला नायतरी बेकारमधे साला फसला असता". तिथून पुढे माझा आणि पेसी साहेबांचा स्नेह वाढत गेला. त्या नंतरच्या आजपर्यंत प्रत्येक गाडीला पहिली चावी पेसी साहेबांनी मारली आणि मगच मी चाकावर बसलो. का कुणास ठाऊक पण त्यांचा माझ्यावर विशेष लोभ आहे. रंगात आले की एक से एक हकीकती ते सांगत असतात.


९४ मध्ये कंपनी नव्या व्यवस्थापनाने म्हणजे आमच्या उद्योग समूहाने विकत घेतली आणि समस्त स्थावर मलमत्तेसह पेसी साहेबही आमचे झाले. त्या व्यवहारात मालमत्तेचाच भाग म्हणून एक जुनी मर्सिडिज आणि एक मूळ जपानमध्ये बनलेली एक होंडा अश्या दोन गाड्याही आल्या. व्यवस्थापनाचे काय वैर होते देव जाणे पण कुणीही साहेब लोक त्या गाड्यांना हात लावत नव्हते. पेसी साहेबांना हे असह्य झाले. बरोबरच होते. आधीच्या पारशी मालकाने खास पेसी साहेबांना लंडनला पाठवून ती मर्सिडिज आणलेली होती. परीक्षा करून, गाडी निवडून ती थेट जहाजावर चढवूनच पेसी साहेब परतले होते. जहाज इथे आल्यावर तिथपासून गाडी तेच चालवीत घेऊन आले होते. साहजिकच त्या गाडीवर त्यांचे पोटच्या पोरासारखे प्रेम होते. शेवटी न राहवून बावाजी एक दिवस तडक  अध्यक्षांच्या कचेरीत शिरले. त्यांनी थेट प्रश्न विचारला, 'सर एक विचारू? तुमचा आणि तुमच्या वाइफ चा झगडा झाला तर तुमच्या बाबालोकना तुमी काय उपाशी मारेल काय? साहेब आ वासून पाहतं राहिले. मग पेसी साहेबांनी त्यांना सांगितले की ती मर्सिडिज त्यांना पोटच्या पोरासारखी आहे. जर व्यवस्थापनाला खर्च करायचा नसेल तर ते खिशातून खर्च करायला  तयार होते पण त्यांना ती गाडी चालू ठेवायची होती. ताबडतोब मोठ्या साहेबांनी चाव्या त्यांच्या हाती देत सांगितले की यापुढे पेसी साहेब त्या गाडीची काळजी घेतील आणि खर्च कंपनी करेल. आनंदीत झालेल्या पेसी साहेबांनी तत्काळ चाव्या घेतल्या आणि बघता बघता गाडी चकाचक केली. पुढे ती गाडी वापरायची नाही असेच ठरले तेंव्हा पेसी साहेबांनी शोधलेल्या एका पारशी सॉलिसिटरने ती विकत घेतली. गाडी जाणार या दु:खापेक्षा पेसी साहेबांच्या चेहेऱ्यावर आपली मुलगी चांगल्या घरी पडल्याचे समाधान होते.


आपल्या दृष्टीने गाडी ही एकसंध वस्तू असली तरी बावाजीच्या दृष्टीने त्या अनेक चिजा होत्या. यंत्राचे काम फादर ऍग्नेलला, शॉकॅब्स रसूलभाइकडॆ, एसी चे काम अंधेरीला पोपट्लाल कडे तर किरकोळ सुटे भाग बदलायला सांताक्रुजला गंगारामकडे. पुन्हा विद्युत संबंधी कामे आणि वेगळी तर देखभाल करायला आणि कोणी. कुणी म्हणालाच की एवढा उपद्व्याप? न्यायची गॅरेजला आणि एकदाच काय ते करुण आणायचे; तर त्यांचा सवाल, 'अरे काय बोलते तुमी? सगळा काम एक गॅरेजला कसाला? तुझ्या डोळाला प्रोब्लेम आलातर काय तू हार्ट सर्जन कडे जाणार? अरे मोठा गॅरेजचा नाव मोठा बाकी साला फक्त बिल वाढवते काम तर करतेच नाय. आता याला आव्हान कोण देणार?  यांची गाडी कधी गॅरेजला जात नाही. रविवारी मिस्त्रीला घरी बोलावणार आणि चटई घालून त्याच्या पुढे बावाजी गाडीखाली स्वतः आडवा होणार. काय बिशाद मिस्त्री काम नीट करणार नाही?


याच्या शरीरात रक्ता ऐवजी पेट्रोल वाहत असावे. पण अभ्यास मात्र दांडगा. नुसता आवाज ऐकून सांगणार काय बिघाड असेल ते. एकदा मी सचिंत मुद्रेने त्यांच्याकडे गेलो. म्हणालो, जरा वेळ मिळाला तर माझी गाडी बघाल का? माझ्या गाडीतून कट्ट्कट्ट आवाज येत होते, गॅरेजवाला म्हणत होता की फ़ाउंडेशन बोल्ट्चा आवाज आहे, इंजिन डाउन करावे लागेल. ते ऐकताच बावाजी ताडकन निघाला. म्हणाला दे चावी. साहेब गाडीत बसले. पाच मिनिटात साहेब विजयी मुद्रेने परत आले. "साला तुझा गॅरेजवाला लै हरामी दिसते. अरे सिंपल के आर्म रिप्लेस केला तर काम खतम तर ते तुला -- बनवायला बघते. अरे इंजिन काय असा डाउन करते काय कोण? मग ते खांद्यावर हात टाकत म्हणाले, डोंट वरी, आज गाडी देऊन जा उद्या संध्याकाळी रेडी होएल ते पण लेस देन टू थावजंड मधे अने विथ गेरंटी. तो गॅरेजवाला रास्कल फुकट-- ----. तेला आता बदलून टाक.


असे कीती किस्से सांगू? मांत्रिकाला जसे कर्णपिशाच्च वश असते आणि ते त्याच्या कानांत येऊन सांगते तसे बावाजीला यंत्रपिशाच्च वश आहे. सगळे दोष, सगळ्या गोच्या याला कशा समजतात कोण जाणे. एखाद्या त्रिकालज्ञानी ऋषी-मुनीच्या थाटात ते गाडीचे भूत-वर्तमान-भविष्य सांगतात. गाडी विकायला आलेला कितीही काहीही सांगो. पेसी साहेब स्वतः:चे समाधान होईपर्यंत एक शब्दही बोलणार नाहीत. प्रथम गाडीला एक प्रदक्षिणा, मालकाला बोनेट उघडून गाडी चालू करायला सांगून आवाज ऐकायचा मग गाडी बंद करून पुन्हा चालू करायला सांगायची मग बोनेट मध्ये डोकॆ घालून पाहणी करायची. हे सर्व सोपस्कार संपून जर साहेब चक्कर मारायला चाकावर बसले तर समजायचे की गाडी ५०% मंजूर! मग गाडीची एक फेरी मारून झाली की एखाद्या न्यायाधीशाच्या थाटात ते निकाल देणार. "तुमचा गाडी तसा ओके हाय पण पण ते रेडीएटर ओरिजिनल नाय. आणि हा. ते गाडी एकवार लेफ़्ट ला ठोकलाय!" झालं. मालकाची वाचाच बंद. आधी नाही म्हणणारा मालक मग हळूच गुळमुळत सांगायचा की नाही तस अपघात वगरे नाही पण आमची सौ. शिकत होती तेंव्हा एकदा डावीकडे गेली आणि झाडावर आपटली पण फार जोरात नव्हती..वगरे वगरे.  हे सांगताना त्याच्या चेहेऱ्यावर 'ही गोष्ट याला काय ठाऊक?' असे भाव तर पेसी साहेबांच्या चेहऱ्यावर 'कसा पकडला? अरे माझा शब्द कधी खोटा निघतच नाही' असे भाव असायचे.


पेसी साहेब अगदी खास बावाजी असतात तसे महा मिश्किल. एकदा ते कुणाशी तरी दूरध्वनीवर बोलत होते. " मॅडम, पेसी स्पिकिंग पेसी "पलीकडे बहुधा ऐकू गेले नसावे वा नीट समजले नसावे. लगेच बावाजी बोलले "माझा नाव पेसी, तुम्ही पेप्सी पीते ने, तेच्यातला पी काड तर होते ते पेसी" कुणाला काही मजेशीर प्रश्न विचार तर कुणाची खेच असा आनंदात जगणारा आणि स्वतः:ला व इतरांना कायम हसत ठेवणारा पेसी कुणी खोटे बोलला वा लबाडीने वागला तर मात्र रुद्रावतार धारण करायचा. एकदा एक एस्टीम बघताना इंजिनमधून वेगळाच आवाज येत होता. बावाजीने विचारताच त्या दलालाने ठोकून दिले "काही नाही, टायमिंग बेल्टचा आवाज आहे". बाप रे बाप. बावाजी असा काही भडकला की विचारू नका. त्याच्या अंगावर धावून जात पेसी साहेब ओरडले' अरे तू काय बापाला........" गेट आऊट. पयला भाग आणि पुन्हा नको येव. "टायमिंग बेल्ट" काय? अरे ते काय फियाट हाय काय? स्काउंड्रल. अशा लोकाशी डिलिंग नाय. गाडी फ़्री दिला तरी नको.


एकदा एका पारशी डॉक्टरणीची तीन वर्ष जुनी पण खरोखरीची केवळ ७००० किमी चाललेली होंडा ती काढत असल्याची खबर बावाजीला लागली. मुंबईत जर वापरलेली गाडी घ्यायची तर पहिली पसंती पारशांच्या गाडीला. त्यात पुन्हा पारशी डॉक्टरणीची गाडी म्हणजे दुर्मिळ योग. बावाजी थेट मालकिणी कडे पोहोचला. मात्र साहेब परत आले ते पडलेल्या चेहेऱ्याने. काय पेसी साहेब, सौदा जमला नाही का? असे विचारताच ते पटकन उत्तरले, नाय दोस्त गाडी नाय पायजे. अरे पारसी होऊनशान पण पैसा कॅश मागते! पार्ट चेक अने पार्ट कॅश बोलली. अरे पारसी लोक तर फेअर डील करते. प्रोपर पेपर, प्रोपर टॅक्स अने चेक पेमेंट शिवाय पारसी बोलणारच नाय पण हे बाई रोकडा मागते. अरे असा कसा चालेल? साला डॅम इट, अरे पारसी कम्युनिटीचा काय होनार? घ्या. एका पारशीणीने असा व्यवहार केला तर साहेबांना आपल्या जातीचे कसे होणार याची चिंता लागली. घरातल्या माणसाने चोरी करावी तसे ते अस्वस्थ झाले होते.


पेसी साहेबांच्या नातीची, जेनिफरची नवज्योत होती. अर्थातच आग्रहाचे आमंत्रण होते, आम्ही दाखल झालो कुलाब्याच्या अगदी टोकाला समुद्राच्या अलीकडे असलेल्या अग्यारीमध्ये. बघतो तर काय! गल्लीत वाहतूक खोळंबून लोकांना त्रास होवू नये म्हणून साहेबांनी चक्क वाहतूक खात्यातले दोन हवालदार कामाला लावले होते. आंत माणसे जमली होती.  सगळे एकजात गोरेपान, टापटीप कपड्यातले बावाजी. आणि त्याहीपेक्षा लक्ष वेधून घेत होत्या आत लावलेल्या गाड्या. सगळ्या लखलखीत! एक पोचा नाही की एक डाग नाही.आतल्या गाद्यांवर टर्किश टॉवेलची आच्छादने, तिही पांढरी शुभ्र. पुढे हिरवळीवर गेलो तर स्वागताला पेसी साहेब, त्यांची मुलगी दिनाज आणि जावई फरहाद जातीने उभे होते. आजपर्यंत कायम साहेबी पोशाखात पाहिलेले पेसी साहेब शुभ्र पारशी पोशाख आणि डोक्यावर काळी मखमली टोपी या वेषात ओळखूच येत नव्हते. समारंभ पारशाचा पण गर्दी अठरापगड माणसांची. बरोबरच आहे, ८०% लोक तर आमच्या कंपनीतलेच होते. अगदी दहावर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या जुन्या पर्यवेक्षकापासून ते संचालकांपर्यंत. जेवताना साहेब आणि जावई जातीने हजर होते. स्कॉचचा आग्रह जोरदार होता. माझी पत्नी, मुलगा कचेरीतल्या लोकांशी ओळख करून घेत एका मेजावर स्थीरावले. रीटा ने त्यांचा ताबा घेतला होता, आता मला निचिंती. मी मित्रमंडळींबरोबर बोलू लागलो, गप्पा सुरू झाल्या. इतक्यात यजमान जावईबापूंनी - फरहादने मला गाठले. अरे, हे काय, तू एम्प्टी हॅण्डेड? नॉट फेर हां. चल चल ग्लास उचक. मध्येच पेसी साहेब अवतरले, मला हात धरून बाजूला घेऊन गेले. मी चक्रावलो. साहेब कुठे नेताय? पाठीवर एक थाप देत म्हणाले, ते तर ग्रेट सरप्राइज हाय. चल. डोला. बंद कर, चल क्विक. गुड! आता हात पुढे कर, चल फटाफट, बाहेर समदा गेस्ट उभा हाय. कमॉन. हाताला थंडगार स्पर्श होताच मी डोळे उघडले आणि अवाक होऊन बघतच राहिलो. हातात चक्क 'कॅफ्री' चा टीन होता. मोठ्या खुशीने डोळा मारत पेसी साहेबांनी विचारले, काय? दिला का नाय सरप्राईज. अरे मला मायते तू न्हेमी तर पिते नाय, पीते तेवा फक्त बिअर पीते. आणि मागे तू बोलला होता ने का तू यू के गेला तवा कॅफ्री टेस्ट केली तर बोलला की असा बिअर जगात नाय पायला. मग लास्ट वीक माझा ब्रदर इन लॉ लंडन हून आला तेला सांगून खास तुजासाठी कॅफ्री मागवला. लास्ट विकलाच आणला तर तुला बोलला नाय, कारण मला तुला सरप्राईज द्यायचा होता. म्हणून तर इन्वाईट करताना तुला बोलला, यू मस्ट कम! जा मजा कर. इतके बोलून मी आ मिटायच्या आंत पेसी साहेब गायब.


बाहेर धमाल चालली होती. आमचे लोक अगदी सहलीला आल्यागत मजा करत होते. जोडीला बावाजी!.  मध्येच बावाजीने समोरून आलेल्या गोपीनाथ पती-पत्नीला हॅलो कले. गोपीने आपल्या पत्नीची ओळख करून दिली. हे तुझा वाइफ का? वेरी नाईस गर्ल असे म्हणत बावाजी आमच्या कडॆ वळत हळूच म्हणाला 'अरे साला लास्ट टाइम तर हा दुसरा कोणाला घेऊन आला तवा पण असाच बोलला के मीट माय वाइफ! हे अर्थातच गोपी व त्याच्या पत्नीला व्यवस्थित ऐकू जात होते. गोपीची बायको त्याच्या कडॆ बघत होती तर गोपीची पार विकेट गेली होती. नो नो, पेसी साहेब, काहीतरी गोंधळ होतोय असे म्हणत तो काहीतरी सांगू लागला आणि एव्हाना आम्हाला समजले ही बावाजीची खास स्टाइल आहे. सगळे जण असे काही हसले की विचारू नका. मग गोपी आणि त्याची पत्नीही त्यांत सामील झाली. तिकडे आग्रह सुरूच होता. भिडस्त देसायाने बावाजीने दिलेला ब्लॅक लेबलचा ग्लास नको म्हणताच बावाजी ने त्याच्या हातात बळेच पेला कोंबत मोठ्याने विचारले की अरे साला ते दिवसी तर फरयाज ला तर टाइट होईपर्यंत पीला ने आता नाय कशाला बोलते? अरे बायको बरोबर म्हणून घाबरते तर नाय ने तू? डोंट वरी मी सांगेन तिला, ती काय बोलेल नाय. देसाई दाम्पत्याचे चेहरे गोरेमोरे तर इकडे जनता हसून हसून लोळत होती. मी म्हटले, पेसी साहेब हे तर आपल्या कंपनीचे संमेलन वाटते आहे. मोठ्या खुशीत हसत ते म्हणाले, अरे ते तर माझा फ़ॆमिलीच आहे ने बाबा. ते सगळा लोक हवाच. दोस्त, माझी वाइफ तर राहिला नाय, पोरगा स्टेटसला गेला ते येते के नाय माहीत नाय. पोरगी तेच्या घरला गेली. मग तुम्ही लोक माझा फेमिली नाय तर कोण? अरे जिंदा हाय तर मजा करा. आज मी इनवाइट केला, नी सगळा लोक इतका लांब आला, बस मी खूश! आता आपला किती दिवस ऱ्हायला? अरे जेनिफरचा मेरेज थोडाच मी बघणार हाय? मग आता नवजोतलाच सगळेंना बोलावला.


लोकांची इतका वेळ खेचणारे पेसी साहेब एकदम गंभीर झाले. त्यांना असे पाहायची आम्हाला सवय नाही. क्षणभर शांतता पसरली. पुढच्याच क्षणी मी त्यांच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत त्यांच्याच आवाजात म्हणालो, अरे काय पेसी साहेब, काय बोलते असा? हे तर 'ओरिजीनल रोल्स रॉईस' इंजिन हाय, असा थोडी बंद पडणार? साला ते काय कोरियन इंजिन हाय काय?  सगळ्यांनी मनापासून दाद दिली, हास्याचा फवारा उडाला, त्रिवार पेसी साहेबांच्या नावाचा उद्घोष झाला आणि तो आनंदोत्सव पुन्हा नव्याने रंगला.